
कपाळगोंदण: स्त्री जीवनातील संघर्ष आणि सौंदर्य यांचे ललित प्रतिक
कला ही आत्माविष्काराची पहिली पायरी आहे, प्रत्येक माणसाच्या अंगी एकतरी कला असावी. माणसाला कधीही उपाशी ठेवत नाही. कला निराशामय काळोखातील एक प्रकाशमान बिंदू आहे, जो माणसाला वादळातील पणतीप्रमाणे सतत संघर्ष करत जगण्याची प्रेरणा देतो. अशा सुंदर लालित्यपूर्ण लेखन करणाऱ्या पुसद जि यवतमाळ येथील लेखिका निशा डांगे यांची कपाळ गोंदण ही ललितलेख असलेली साहित्य कलाकृती नुकतीच वाचनात आली. लेखिकेने स्त्री जीवनातील अनेक सुखदुःखाच्या हिंदोळ्यावरील आलेले अनुभव या कलाकृतींमधून मांडले आहेत.
कपाळ गोंदण या कलाकृतीतील ललित साहित्याच्या अनुषंगाने मुखपृष्ठावर साकारलेल्या भटकंती करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका स्त्रीच्या प्रातिनिधिक चित्राने स्त्री जीवनातील अनेक गोष्टींना अधोरेखित केले आहे. ही कलाकृती स्त्री जीवनाला केंद्रस्थानी ठेवून तिच्या भोवती रिंगण घालून लेखिकेने समाजातील स्त्री व्यक्तिमत्वाची ओळख करून दिली आहे. साधारणतः वीस बावीस वर्षाची तरुणी, कपाळावर ठसठशीत लाल गोल कुंकु, त्याच्याखाली चंद्रकोर, पाठीशी लेकरू, डोक्यावर लहान मुलांसाठी खेळणी असलेली टोपली, असा संदर्भ या मुखपृष्ठावर आपल्याला पहावयास मिळतो.
टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःच्या लेकराला पाठीशी बांधून इतराच्या लेकरालाही आनंद देणारी कोणी असेल तर ती आई आहे. भटकंती करून खेळणी विकायची त्यातून जी काही कमाई होईल त्यातून आपली उपजीविका करायची हेच जणू काही कपाळी गोंदून घेतलेले असते. समाजातील बेलगाम भिरभिरणाऱ्या नजरांना रोखून धरण्यासासाठी कपाळावर लालभडक कुंकवाचे सुरक्षाकवच, सुईच्या तीक्ष्ण टोकाने कपाळावर चंद्रकोर गोंदतांना झालेल्या वेदना पाठीवरच्या लेकराच्या टीचभर पोटाची खळगी भरण्याच्या वेदनेपुढे शमल्या असाव्यात आणि म्हणूनच चेहऱ्यावरचे स्मीत हास्य कष्टातून मिळालेल्या समाधानाचे प्रतिक असावे असे मला वाटते.
कपाळ गोंदण या ललित लेखमालेतील शीर्षक ललित लेखातून अठराविश्व दारिद्र्याचं कपाळी गोंदण कोरुनही भळभळत्या जखमांना उराशी बांधून भटकंती करून स्वकष्टाने उपजीविका करणाऱ्या समाजातील स्त्रीचे जीवन व्यतीत केले आहे. जीवनाचा मार्ग अतिशय खडतर आणि अनेक संकटांचा असूनही हसतमुखाने त्याला सामोरे जाण्याची, कोणत्याही परिस्थितीत आनंदने जगण्याची कला शिकण्याचा संदेश या लेखातून दिला आहे आणि ही कला स्त्रीने आपल्या कपाळावर गोंदून घेतली तर जीवन सुखी होईल हेच कपाळ गोंदण लेखिकेला येथे अभिप्रेत असावे असे मला वाटते आणि म्हणूनच लेखिकेने या लेखात समस्त स्त्री वर्गाला उद्देशून सुंदर काव्यपंक्तून सुखी जीवनाचा मंत्र दिला आहे –
जरी भाळी कोरल्यात दारिद्र्याच्या रेषा गं I सये कष्टाने भराव्यात नशिबाच्या भेगा गं II
जिंदगानीच्या वाटेने बाई चालावं जरा हासून, काळ्या दुःखाचा काळोख कितीही येवो दाटून.
रक्ताळलेल्या पायातला हळूच काढावा काटा गं, सये कष्टाने भराव्यात नशिबाच्या भेगा गं I
कपाळ गोंदण या ललित लेखसंग्रहातील वांझोटी भिंत या लेखातून लेखिकेने स्त्रीच्या सोशिकपणाचे, निपुत्रिकतेचे, अभागीपणाचे अतिशय हृदयदायक उदाहरण दिले आहे. स्त्रीचा सोशिकपणा व्यक्त करतांना तिला घराच्या भिंतीची उपमा देवून लेखिका लिहितात की –
ही मुकी भिंत एकटीच तर पुरावा असते ! “मुकी पण पक्की” तोंडाने कधीच काही बोलणार नाही अगदी कुणी लाथा, बुक्क्या मारून मारून तिला खाली पाडले तरी सुद्धा ! मार खाऊन निपचित पडेल पण तोंड उघडेल तर शप्पथ !
वांझोट्या भिंतीने बोलू नये, उरात गाडलेलं गुज खोलू नये-
कदाचित स्त्रीच्या नशिबी सटवीने हेच तर लिहिलेले नाही ? आणि हेच तर कपाळ गोंदण नाही ? असाही प्रश्न लेखिकेच्या मनात निर्माण होतो. कपाळ गोंदण या ललित लेखसंग्रहातील आयुष्याच्या वळणावर या लेखातून लेखिकेने स्त्री जीवनाचा एकलेपणा व्यक्त केला आहे. स्त्रीने स्वतःला सावरून जीवनात एकटेपणा जरी आला तरी त्यातून उभं रहायचं शिकलं पाहिजे , जीवन फुलवता आलं पाहिजे आणि म्हणूनच लेखिका या लेखात मांडतात की –
कालचक्र गतिमान होऊन आयुष्याच्या उतरंडीवरून केंव्हा घरंगळत गेले कळलेच नाही. ऋतूमागून ऋतू सरलेत, परंतु आयुष्याच्या प्रांगणात प्रेमाचा वसंत कधी फुललाच नाही. आताशा ऋतू बदलाचा फारसा फरक पडत नाही. रणरणत्या उन्हात तप्त वाळवंटात निवडुंग जसा फुलतो तसे फुलायला मी शिकले.
कला माणसाचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलते, कला सकारात्मक प्रेरणेचा, उर्जास्त्रोतांचा महासागर आहे. जेव्हा माणसाची अंत:प्रेरणा जागृत होते तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या सकारात्मक उर्जेतून कला विकसित होते. कलेतून मनुष्य स्वतःचा भावाविष्कार साकारतो. माणसाच्या सुप्त गुणांचे प्रकटीकरण म्हणजेच कलेचा आविष्कार !
अशा लालित्यपूर्ण शब्दांची मांडणी करून लेखिकेने कला आत्माविष्काराची पायरी या लेखातून कलेचे वर्णन केले आहे. कपाळ गोंदण या ललित लेखसंग्रहात एकूण चौतीस लेख असून सर्व लेखातून स्त्रीवादाची मांडणी केलेली दिसून येते. माझ्या खिडकीतून, दर्पणमोह, काळीजवेणा, गर्दीतले शब्द, नदी आणि स्त्री अशा लेखातून लेखिकेची लेखन शैली मनाला मोहून टाकणारी आहे, विलक्षण कल्पनाशक्ती, उपमालंकाराची वैविध्येपूर्ण मांडणी, मार्मिक शब्दांची सांगड, कुठेही ओढताण नाही, वाचकाला खिळवून ठेवण्याचे कसब लेखिकेने लीलया हाताळले आहे. लेखात अधून मधून दिलेल्या काव्यपंक्तीतून दिसणारे शब्दांचे सौंदर्य हे लेखिकेच्या मनाच्या सौंदर्याचे दर्शन घडवतात. स्त्री जीवनातील सोशिकपणा, संयमीपणा, समंजसपणा व्यक्त होतांना स्त्री जीवनाला एका समांतर रेषेत आणण्यासाठी लेखिकेन आपल्या लेखातून अतिशय सुंदरपणे प्रयत्न केलेला दिसून येतो. ललित लेखनाचा सुंदर नमुना म्हणून या लेखसंग्रहाकडे बघता येईल. प्रत्येक स्त्रीने वाचावी आणि संग्रही ठेवावी अशी ही कलाकृती आहे.
रसिकांच्या मनात शब्दचांदणे रुजवणारे सुप्रसिद्ध गझलकार, ललित लेखक, जेष्ठ साहित्यिक स्व. मधुसूदन नानिवडेकर यांच्या पावन स्मृतीस अर्पण केलेली, सौ. नम्रता मुळे, वसई यांच्या डिंपल पब्लिकेशन संस्थेने प्रकाशित केलेली ही ललित लेखसंग्रह कलाकृती वाचकांच्या मनावर अधिराज्य करणारी आहे. आपल्या कल्पकतेने कलाकृतीला वाचकाच्या नजरेस भरावे असे सुंदर मुखपृष्ठ साकारून प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार संतोष घोंगडे यांनी साहित्य वर्तुळात या कलाकृतीला एक नवी ओळख दिली आहे.जेष्ठ कवी, साहित्यिक प्रा. अशोक बागवे यांनी ब्लर्बच्या माध्यमातून या कलाकृतीची पाठराखण केली आहे. लेखिका निशा डांगे यांच्या लेखीनीला, लालित्यपूर्ण शब्द सौंदर्याला हजारदा सलाम आणि पुढील नवनिर्मितीस खूप खूप शुभेच्छा.!

-प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क – ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
कलाकृती परिचय:
कलाकृती – कपाळगोंदण
साहित्य प्रकार – ललित लेखसंग्रह
कवी – निशा डांगे , पुसद
संपर्क क्रमांक – ८४२१८ ७५४८७
प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन, वसई (पालघर)
मुखपृष्ठचित्रकार – संतोष घोंगडे
——————————
——————————