जुनं नव्यात केवळ भावनिक समाधानाचा मेळ

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

जस जस दिवसाचं एक एक पान उलटत जातं आणि शेवटच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत येऊन ठेपतंं तस तस सरत्या वर्षाचा निरोप घेण्याची वेळ येते. कुणाचाही निरोप घेताना मन संमिश्र भावनांनी भरलेलं असतं. अगदी तसंच सरत्या वर्षाचा निरोप घेतानाही मन गलबलून येतं. या वर्षात काय काय केलं, काय चुकलं, काय शिकलो, काय अपूर्ण राहिलं किंवा काय समाधान देऊन गेलं याचा ताळेबंद मनात चालूच असतं.


निरोप घेणं इतकं सोपं नसतं, मग ते कुणाचंही असो…असं असलं तरी सरत्या वर्षाला निरोप देणं गरजेचं असतं. कारण या वर्षाने आपल्याला अनेक आठवणी, आनंद आणि बरच काही दिलेलं असतं. या सर्व आठवणींची शिदोरी घेऊन नव्या वर्षात पदार्पण करायचं असतं. मागे वळून पाहताना जाणा-या वर्षाला निरोप देताना मनात संमिश्र भावनांचा कल्लोळ असतो. तयारी वर्षा अखेरची सरत्या वर्षाला निरोप देताना कुणी सहकुटुंब, मित्र परिवार वा नातेवाईक यांच्या बरोबर वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येतात. कुणी पार्ट्यात मदमस्त होतात, तर कुणी इतर कार्यक्रम ठेवतात. पण हेतू मात्र एकच असतो.
खरं तर आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं. आपले सण-उत्सव हे ऋतुमानाप्रमाणे आपण साजरे करतो‌. गुढीपाडव्याला झाडांची जुनी पालवी गळून नवीन पालवी फुटते. सर्वसृष्टी नवचैतन्याने बहरून जाते. त्यावेळेला माणसाच्या मनामध्ये निसर्गाकडे पाहताना आनंदाचा बहर येतो. आजकाल हे आपण विसरत चाललो आहोत आणि १ जानेवारीपासून आपण नवीन वर्ष साजरे करू लागलो आहोत.


सरत्या वर्षाला जेव्हा आपण निरोप देतो, तेव्हा मनामध्ये नवीन आशा-आकांक्षा जन्म घेतात. नव्या उमेदीने त्या साकार करण्याची इच्छा मनात जागृत होते. ज्या वेळेला जुन्या वर्षात घडलेल्या अप्रिय घटना विसरून आपण नवीन वर्षात पदार्पण करतो, त्या वेळेला नवीन सकारात्मक ऊर्जा आपल्या सुप्त मनात कार्य करू लागते. पण नववर्ष साजरे करण्याची परंपरा हजारो वर्ष जुनी आहे. १५३ ईसापूर्व रोममध्ये याची सुरुवात झाली. तेव्हा लोक १ मार्चला नवीन वर्ष साजरे करायचे. ४६ बीसी मध्ये ज्युलियस सीझरच्या सौर-आधारित कॅलेंडरमध्ये १ जानेवारी रोजी साजरा केला जाऊ लागला. रोमन साम्राज्यात ही प्रथा मोठ्या प्रमाणावर स्वीकारली गेली. १५८२ मध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर लागू झाल्यानंतर १ जानेवारी हा नवीन वर्षाचा प्रारंभ म्हणून साजरा केला गेला. नवीन वर्षाचा उत्सव प्रथम किरिबाटीमध्ये साजरा करण्यात आला आणि आता हा उत्सव हळूहळू पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकू लागला.


दरवर्षी ३१ डिसेंबरच्या रात्री लोकं जुन्या वर्षाला निरोप देतात आणि रात्री १२ वाजता अनेक आशा आणि स्वप्नांसह मोकळ्या हातांनी नवीन वर्षाचं स्वागत करतात. प्रत्येक सरतं वर्ष जातांना आपल्याला भरपूर काही शिकवून जातं आणि नवीन वर्ष येतांना आपण त्या शिकवणीतूनच नवीन संकल्प घेऊन नवीन स्वप्नांची शिदोरी बांधत असतो.
खरं तर येणारे नवीन वर्ष आपल्यासोबत नवीन आनंद, नवीन स्वप्न आणि भरपूर उत्साह घेऊन येत असतं. त्यामुळे जगभरातील लोक नवीन वर्षाचं वेग-वेगळ्या हटके पद्धतीने स्वागत करताना दिसतात. आता सरतं वर्ष हे मावळतीला चाललं आहे आणि नवं वर्ष उंबरठ्यावर आहे. मागील वर्षाचे हिशेब मागे राहिले आहेत, त्याची जागा नवीन वर्षाच्या संकल्पांनी घेतली जाणार आहे.


नववर्षाच्या पूर्वसंध्येला जवळजवळ प्रत्येकच घरातले दिवे मध्यरात्रीपर्यंत सुरू असते. त्यामुळे देश रात्रीसुध्दा जागा असतो असं म्हणायला हरकत नाही. सरत्या वर्षाला निरोप देत असताना कटू-गोड आठवणींची सोबत असते. हे वर्ष खूप काही देऊन आणि शिकवून जाते. त्यामुळे हे सरतं वर्ष अनेक प्रकारे प्रेरणादायी आणि आश्चर्यकारक ठरते. याच आश्चर्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केल्या जातं. हा सोहळा जेवढा नेत्रदीपक असतो, तेवढाच मनाला सुखावणारा आणि नवी उमेद देणारा ठरतो. सरतेशेवटी एवढंच म्हणावंस वाटते.
सरत्या वर्षाला निरोप देऊ
जीवनगाणे नव्याने गाऊ

शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
  कमळवेल्ली,यवतमाळ

भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९

 हे वाचा – शारीरिक शिक्षणाचे महत्त्व..!

Leave a comment