
इंदूर : नियमित व्यायाम, शिस्तबद्ध जीवन आणि आरोग्याबद्दल जागरूकता हे सर्व असूनही एका तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याने इंदूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. खातीपुरा परिसरातील 32 वर्षीय संदीप या तरुणाचा जिममधून परत आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
मंगळवारी संध्याकाळी संदीप नेहमीप्रमाणे जिममध्ये व्यायाम करून घरी परतला. घरी आल्यानंतर त्याने अंडा हाफ फ्राय खाल्लं. त्यानंतर काही क्षणांतच त्याला छातीत दुखायला लागलं, जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. कुटुंबीयांनी तत्काळ त्याला रुग्णालयात नेले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगितलं आहे.
संदीप गेल्या सहा वर्षांपासून नियमित व्यायाम करत होता. फिटनेस आणि आहाराबाबत तो अत्यंत शिस्तप्रिय होता. त्याचा अकाली मृत्यू अनेकांसाठी धक्कादायक ठरला आहे. कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या मते, जिमनंतर तळलेले किंवा पचायला जड पदार्थ त्वरित खाल्ल्याने शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा तर्क वर्तवला जात आहे.
संदीपच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी त्याच्या मुलीचा जन्म झाला होता. या अचानक मृत्यूने घरातील आनंदाचे वातावरण क्षणात शोकाकुल झाले.
तज्ञांच्या मते, व्यायामानंतर शरीरातील रक्तप्रवाह आणि हृदयाची गती वेगाने बदलत असते. अशावेळी त्वरित तेलकट किंवा जड अन्न सेवन केल्यास हृदयावर ताण येऊ शकतो. त्यामुळे जिमनंतर किमान ३० ते ४५ मिनिटे हलका, द्रवपदार्थांचा आहार घेणे आणि शरीराला शांत स्थितीत आणणे आवश्यक आहे.
● हे वाचा –Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र