
जिद्दीची जादूची पेटी!
शंभर वर्षांपूर्वीची वैद्यकीय दुनिया आजच्या तुलनेत अगदी निराधार होती. विशेषतः अकाली जन्मलेल्या बाळांच्या बाबतीत तर परिस्थिती अत्यंत भीषण होती. ती बाळं इतकी लहान, अशक्त आणि कुपोषित असायची की त्यांचं जगणं जवळजवळ अशक्य मानलं जायचं. डॉक्टर आणि नर्सेस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत, पण त्यांच्या हातात कोणतंही प्रभावी साधन नव्हतं. त्या काळात जन्म झाल्यानंतर उष्णता टिकवू न शकणाऱ्या बाळांपैकी तीन बाळं तर सरळ गमवावी लागायची. आणि या भयंकर परिस्थितीला, वैद्यकीय क्षेत्राने “हे नैसर्गिक आहे” असं मान्य केलं होतं.
सगळेजण तेच मान्य करत असताना एक डॉक्टर मात्र या समजुतीशी पूर्णपणे असहमत होते डॉ. एतिएन टार्नियर. एके दिवशी त्यांनी शेतात कोंबडीला तिच्या अंड्यांना उब देताना पाहिलं, आणि त्याच क्षणी एक साधा पण विलक्षण प्रश्न त्यांच्या मनात उभा राहिला जर कोंबडी उब देऊन अंड्यातील जीव वाढवू शकते, तर बाळांना उब दिली तर काय होईल? त्यांना जाणवलं की उष्णतेचं संरक्षण म्हणजे केवळ कोंबडीचं काम नाही; ते मानवी बाळांसाठीही जीवदान ठरू शकतं.
या विचारातून १८८० मध्ये त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉ. पियरे बुडिन यांनी पहिली छोटी, उबदार, काच झाकण असलेली पेटी तयार केली. आत गरम पाण्याची बाटली ठेवली की पेटी उबदार राहायची, आणि बाळाचं नाजूक शरीर सुरक्षितपणे वाढू लागायचं. हे आजच्या इन्क्युबेटरचं पहिलं रूप होतं. प्रयोग यशस्वी होऊ लागले. अशा पेटीत ठेवलेली बाळं जगू लागली, बळकट होऊ लागली आणि निरोगी वाढू लागली.
पण तरीही वैद्यकीय अधिकारी या उपकरणाकडे फारसं गांभीर्याने पाहत नव्हते. त्यांना वाटलं की हे खूप महाग, फार अव्यवहार्य आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे – “अकाली बाळं मरतात, हे निसर्गाचं नियम आहे.” कोंबडी आणि माणसांचं काय नातं असं विचारणारे देखील होते. अशा विरोधात इन्क्युबेटर रुग्णालयांमध्ये बसवणं जवळजवळ अशक्य होतं.
याच वेळी त्यांच्या सहकाऱ्यांपैकी एक डॉक्टर पुढे आले डॉ. मार्टिन कौनी. त्यांनी ठरवलं की वैद्यकीय मंडळी पटत नाहीत, तर उपाय जनतेपर्यंत नेऊ. त्यांनी थेट १८९६ च्या बर्लिन वर्ल्ड एक्झिबिशनमध्ये सहा इन्क्युबेटर ठेवले. बर्लिन चॅरिटी हॉस्पिटलने सहा लहान अकाली बाळं दिली, कारण त्यांचं काही होणारच नाही अशी त्या डॉक्टरांची खात्री होती. पण जगाला जे पुढे दिसलं ते एक चमत्कार होता. त्या सहा बाळांनी इन्क्युबेटरमध्ये टाकताच निरोगी वाढायला सुरुवात केली. लोक चक्क पैसे देऊन या छोट्या बाळांना पाहायला येऊ लागले, कारण अशा बाळांना जगताना पाहणं त्यांच्यासाठी अकल्पित होतं.
डॉ. कौनी यांनी हा प्रयोग अमेरिकेतही नेला. तिथेही मेळावे, वर्ल्ड फेअर्स, पॅन अमेरिकन एक्स्पोजिथे जिथे शक्य तिथे त्यांनी इन्क्युबेटर दाखवला आणि एकामागून एक बाळं वाचवली. कोनी आयलंडमध्ये तर त्यांनी तब्बल चाळीस वर्षे ही सेवा चालू ठेवली. या काळात त्यांनी ८,००० अकाली बाळांची काळजी घेतली आणि त्यापैकी ६,५०० बाळं जिवंत राहिली. मृत्यूदर फक्त २५% वरून थेट ८५% झाला.
शेवटी वैद्यकीय क्षेत्राला मान्य करावंच लागलं हा शोध, ही पेटी, ही उब म्हणजे एक चमत्कार आहे. आज जगातील प्रत्येक रुग्णालयात इन्क्युबेटर आहे, आणि लाखो बाळं त्यामध्ये सुरक्षित वाढत आहेत. पण या इतिहासामागे उभं आहे एका जिद्दीचं धैर्य ज्याने पारंपरिक विचारांवर अवलंबून न राहता, एक नवीन मार्ग तयार केला.
या संपूर्ण कथेतून एक महत्त्वाचा संदेश समोर येतो. अडचणी सर्वांनाच येतात. काहीजण त्या अडचणींसमोर हात टेकतात, “नशीब असं आहे” म्हणून बसून राहतात. पण काहीजण असा विचार करत नाहीत. ते ठरवतात—समस्या कुठल्याही असल्या तरी, “जे करावं लागेल ते करायचंच.” असे लोकच अडचणींवर मात करतात, मार्ग निर्माण करतात आणि अनेकांना जीवनाचा नवा अध्याय देतात.
● हे वाचा – Ravishkumar : रवीश,तू जीवंतपणीच इतिहास झालाय !