लग्नाची गाठ, पण खर्चाचा फाट.!

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

लग्नाची गाठ, पण खर्चाचा फाट.!

लग्न  हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. दोन मनं, दोन कुटुंबं आणि दोन जीवनं एका गाठीत अडकतात. हे नातं विश्वासाचं, प्रेमाचं आणि समजुतीचं असावं अशीच प्रत्येकाची अपेक्षा असते. पण आजच्या घडीला लग्न म्हणजे प्रेमापेक्षा अधिक खर्चाचं प्रतीक बनत चाललं आहे.

लग्न म्हणजे दोन जीवांचं एकत्र येणं, आयुष्यभरासाठीचं नातं. पण आजकाल लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचं नव्हे, तर एक मोठा खर्चाचा सोहळा बनलेला आहे. भपकेबाज मंडप, डोळे दिपवणारी रोषणाई, पाचपद्री जेवणं, डिझायनर कपडे, कर्णकर्कश आवाजातील डी जे, हळदी समारंभ आणि वधू वराची सेलिब्रिटीसारखी एंट्री या साऱ्यामागे लाखो रुपये खर्च केले जातात. हे सर्व खरंच आवश्यक आहे का?

पूर्वी लग्न म्हणजे घरच्या घरी वऱ्हाडं जमवून, मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरं होणारं एक आनंदाचं कार्य होतं. आज मात्र लग्न म्हणजे शेकडो पाहुणे, थाटामाट, महागडे मंडप, सेलिब्रिटीसारखं फोटोग्राफी शूट, आणि हजारो रुपयांचे ड्रेस, जेवणाचे भरगच्च मेन्यू, फटाक्यांची आतषबाजी – असा एक भपक्याचा बाजारच झाला आहे.

या सर्व गोष्टींचा एक मोठा तोटा म्हणजे आर्थिक ओझं. मध्यमवर्गीय आणि खालच्या आर्थिक वर्गातील कुटुंबं केवळ समाजात नाक उंच ठेवण्यासाठी, लोक काय म्हणतील या भीतीने किंवा इतरांच्या लग्नाशी तुलना करत करत लाखो रुपयांचा खर्च करतात. अनेकदा कर्ज काढून, जमापुंजी फोडून, काही वेळा सोनं गहाण ठेवूनसुद्धा हा खर्च उचलला जातो. परिणामी, लग्नानंतर नव्या जोडप्याच्या आयुष्याची सुरुवात ही कर्जाच्या ओझ्याखालीच होते.

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

आपण जेवढा खर्च करतो, त्याच्या निम्म्याचंही समाधान त्या सोहळ्याने मिळत नाही. अनेक कुटुंबं कर्ज काढून, उधारी करून मुला-मुलीचं लग्न मोठ्या थाटात करण्याचा अट्टाहास करतात. नंतर वर्षानुवर्षं त्या कर्जाचा ताण झेलतात. एकीकडे मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत, घरखर्च भागत नाही, आणि दुसरीकडे चार तासांच्या लग्नसोहळ्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात.

खरं तर लग्नाचा खर्च हा विचारपूर्वक आणि आपल्या परिस्थितीनुसारच करायला हवा. घरच्या घरी, आप्तेष्टांच्या उपस्थितीत साधं, प्रेमळ आणि आनंदी लग्नदेखील लक्षात राहणारं असतं. आज समाजात अशी अनेक उदाहरणं आहेत की, जिथे जोडप्यांनी लग्न सोपं ठेवून उरलेले पैसे शिक्षण, आरोग्य, किंवा गरजूंसाठी मदत म्हणून समाजोपयोगी कामात वापरले.

आपण आता बदलले पाहिजे. समाजात एक नवा आदर्श निर्माण करायला हवा ‘साधं पण साजरं लग्न’. आपलं प्रेम, आपली माणसं, आणि आपल्या जीवनाची सुरुवात यात खरा आनंद आहे, भपक्यात नाही. लग्न, मेहंदी, हळद यावरचा वाढता अवास्तव खर्च थांबवायचा असेल, तर प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. कारण बदल हा आपल्या निर्णयांतूनच सुरू होतो.

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा


आज आपण स्मार्टफोन, कपडे, घरं, अगदी शिक्षणासाठीसुद्धा ‘बजेट’ ठेवतो. मग लग्नासाठी का नाही. खरं तर साधं, सुरळीत आणि अर्थपूर्ण लग्नसुद्धा तितकंच सुंदर आणि लक्षात राहणारं असतं. आप्तेष्टांमध्ये, आत्मीय वातावरणात, घरच्या घरी किंवा छोट्या मंगल कार्यालयात पार पडलेलं लग्न हे अधिक आनंददायी ठरतं. उरलेले पैसे मुलांच्या भविष्यासाठी, गुंतवणुकीसाठी किंवा समाजोपयोगी कार्यासाठी वापरता येतात.

आज अनेक सुशिक्षित जोडपी ‘कोर्ट मॅरेज’ करून, त्यानंतर साधा सत्कार करत आहेत. काही जोडपी लग्नाचा खर्च टाळून सामाजिक संस्थांना मदत करत आहेत. ही बदलाची सुरुवात आहे  समाजात नवा दृष्टिकोन निर्माण करणारी.

आपण पाहिजे तिथे खर्च करूच शकतो, पण तो खर्च विवेकाने आणि गरजेनुसार हवा. समाजात प्रतिष्ठा साधेपणातूनसुद्धा कमावता येते, ही जाणीव होणं आवश्यक आहे.

म्हणूनच, आता वेळ आली आहे – “थाटमाटाच्या लग्नसंस्कृतीला बाय बाय करायची!”
आपलं लग्न हे प्रेमाचं, समजुतीचं आणि जबाबदारीचं प्रतीक असावं, हौसेचं नव्हे, हव्यासाचं नाही..!

बंडूकुमार धवणे

संपादक

Leave a comment