आणखी किती वैष्णवींचे बळी जाणार ?
पुण्यातील वैष्णवी हगवने आत्महत्या की हत्या ? प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड गाजत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत असून प्रत्येकाला आपल्या घरातील मुलीबद्दल चिंता वाटायला लागली आहे.या प्रकरणातील जवळपास सर्व आरोपींना अटक झाली असून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहे.या दुःखद घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून भविष्यात यावर केवळ सरकारच नाही तर समाजाकडून सुद्धा काय प्रतिक्रिया येतात यावर या प्रकरणाचे गांभीर्य ठरणार आहे. प्रत्येक प्रकरणात सरकारला दोषी धरून चालणार नाही.जी काही कायदेशीर कारवाई करायची आहे ती सरकार करणारच आहे.परंतु समाज म्हणून ज्या गोष्टी आपण करायला पाहिजे त्यावर सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे.ज्या गोष्टी आपल्या हातात आहे त्या आपण निश्चितपणे रोखू शकतो किंवा बदलवू शकतो; परंतु आपण केवळ आपल्याच कुटुंबापुरता मर्यादित विचार करीत असल्यामुळे आणि अशी प्रकारे घडल्यानंतर केवळ हळहळ व्यक्त करण्यापलीकडे दुसरे काहीच करीत नसल्यामुळे पुन्हा पुन्हा अशी प्रकरणे घडतात आणि नंतर पश्चाताप करण्याशिवाय आपल्याला पर्याय राहत नाही.
महाराष्ट्र हे सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ राज्य आहे असे मानले जाते, परंतु महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या घटनांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा डागाळली जात आहे.ही गोष्ट महाराष्ट्रीयन नागरिक म्हणून आपल्यासाठी चांगली नाही. त्यामुळे अशा प्रकरणात केवळ सरकारच्या भरवशावर राहून चालणार नाही तर एक जागृत नागरिक म्हणून आपणही निदान चार शब्द अशा दुःखद घटनांच्या बाबतीत व्यक्त केले पाहिजे. सर्वांचा आवाज जर संघटितपणे समोर आला तर असे दुष्कृत्य करणाऱ्या लोकांना जरब निर्माण होईल.त्यामुळे प्रत्येकाने केवळ बघ्याची भूमिका न घेता आपल्या प्रत्येकावरही अशा प्रकारची पाळी येऊ शकते हा विचार करून त्या दृष्टीने अशा प्रकरणात आपली भूमिका व्यक्त केली पाहिजे.अशा प्रकरणात जागृत नागरिक म्हणून आम्ही एकसंघ आणि एकजूट असणे अत्यंत आवश्यक आहे.अशी प्रकरणे घडू नये म्हणून जोपर्यंत अशा समाजविघातक कुटुंबांना सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत केल्या जाणार नाही, त्यांच्यासोबतचे सर्व संबंध तोडले जाणार नाही व त्यांना कठोरातील कठोर शिक्षा केली जाणार नाही तोपर्यंत अशी दुष्कृत्ते थांबणार नाही.
हुंडाबळी संदर्भात सरकारचे अनेक कायदे आहेत. त्याचबरोबर या विषयावर अनेक सामाजिक संघटना व समाजसेवक सातत्याने लोकांचे प्रबोधन करीत असतात.आमच्या संत महापुरुषांचे दाखले देवून लग्न समारंभ कसे केले पाहिजे,लग्नावर वायफळ खर्च करू नये, हुंडा देणे घेणे बंद करावे यासाठी महाराष्ट्रभर प्रबोधनकार मंडळी लोकांचे प्रबोधन करीत असतात. महाराष्ट्र सरकारनेही काही वर्षांपूर्वी सामूहिक विवाह योजना सुरू केली होती.अनेक सामाजिक संघटना सुद्धा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करीत असतात.जेणेकरून लोकांचा पैसा,वेळ वाचावा आणि तोच पैसा शिक्षण,आरोग्य,शेती,व्यवसाय यासाठी खर्च करता यावा.सत्यपाल महाराज व त्यांच्यासारख्या अनेक प्रबोधनकाराकडून मागील ५० वर्षापासून सातत्याने हे प्रबोधन सुरू आहे.त्याचे काही चांगले परिणाम सुद्धा दिसून आले आहे.अनेक तरुणांनी सामूहिक विवाह,कोर्ट मॅरेज किंवा अतिशय साध्या पद्धतीने हुंडा न घेता आपले लग्न लावलेले आहेत. परंतु काही धनदांडगे लोक आपल्या संपत्तीचा बडेजाव दाखवण्यासाठी पैशाचे विकृत प्रदर्शन करतात. अतिशय चुकीच्या प्रथा,पद्धती सध्या लग्नात सुरू झालेल्या आहेत. टीव्हीवरील मालिका पाहून आता आपल्याकडे सुद्धा संपत्तीचे प्रदर्शन करणारे भपकेबाज लग्न लावण्याचे फॅड आलेले आहे.प्री-वेडिंग सारखा अतिशय घाणेरडा प्रकार काही वर्षापासून आपल्याकडे वाढलेला आहे.या प्रकारातील धक्कादायक वास्तव समोर आले असून प्री-वेडिंग नंतर झालेल्या लग्नामध्ये 35 ते 40 टक्के लग्न दोन-तीन वर्षात तुटलेली आहे असे संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे.त्यामुळे अशा समाजविघातक व मुलामुलींचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या घातक प्रथा बंद होणे आवश्यक आहे.
केवळ कायदे करून हा विषय सुटणारा नाही.त्यासाठी समाजाचे प्रबोधन अत्यावश्यक आहे.समाजाची मानसिकता बदलविणे गरजेचे आहे.अशा घटना तथाकथित सुशिक्षित व श्रीमंत घराण्यात जास्त घडून येत असल्याचे दिसून येते.महिला आयोगाने घटना घडल्यानंतर अँक्शन घेण्याऐवजी वर्षभर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून या संदर्भात जनजागृती केली पाहिजे.महिला आयोगाच्या अध्यक्षा समाजात फिरून जागृती करताना दिसत नाही.प्रबोधनकार मंडळी जीव तोडून प्रबोधन करतात परंतु लोकांना ते ऐकायला वेळ नाही.फालतू गोष्टींमध्ये आपला वेळ व्यर्थ गमावणारे लोक प्रबोधनात्मक सामाजिक चळवळीकडे दुर्लक्ष करतात.त्यामुळे त्यांच्या विचारात परिवर्तन घडून येत नाही व बुरसटलेल्या विचारांमध्ये अडकून ते आपल्या सुनांवर अन्याय अत्याचार करतात.प्रचंड पैशाची मागणी करतात आणि ते पैसे मिळाले नाही की मग वैष्णवी हगवणे सारख्या कित्येक वैष्णवींना आपले प्राण गमवावे लागते.त्यात कोणाचा जीव जातो,लहान बाळांना आपली आई गमवावी लागते आणि संपूर्ण कुटुंब अस्तव्यस्त होऊन जाते.त्यामुळे सरकारने गावागावात या विषयावर प्रबोधन करण्यासाठी काहीतरी निर्णय घ्यावा.कारण कायदे कितीही केले तरी लोक चोरून सगळ्या गोष्टी करतात.जोपर्यंत तुमच्या विचारात परिवर्तन होणार नाही तोपर्यंत हुंडाबळी थांबू शकणार नाही.त्यामुळे संपूर्ण समाजाने अतिशय गांभीर्याने या प्रश्नावर चिंतन आणि मंथन करणे अत्यावश्यक आहे.नाहीतर भविष्यात बऱ्याच वैष्णवींचे बळी जाणार आहे.
प्रेमकुमार बोके
अंजनगाव सुर्जी