Thursday, January 22

 ‘हिंद की चादर’ – धर्मस्वातंत्र्य व मानवतेचा संदेश देणारा ऐतिहासिक उपक्रम

BOK

धर्म, सत्य आणि मानवतेसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे नववे शीख गुरु श्री गुरु तेग बहादूर सिंह जी यांचे बलिदान भारतीय इतिहासात अजरामर आहे. “हिंद की चादर” म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर जी हे केवळ शीख समाजाचेच नव्हे, तर संपूर्ण भारतवर्षातील धर्मस्वातंत्र्याचे महान रक्षक होते. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शीख समाज, सिंधी समाज, बंजारा समाज आणि लुबाणा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वाखाली अमरावती येथे भव्य “हिंद की चादर” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दि. 23 नोव्हेंबर रोजी अमरावतीतील राजकमल चौक येथे झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात श्लोक मेहला नववाच्या पठणाने झाली. त्यानंतर भावपूर्ण शबद कीर्तन सादर करण्यात आले. उपस्थित जनसमुदायाला गुरु तेग बहादूर जी यांच्या जीवनकार्याचा, त्यागाचा आणि धर्मरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचा इतिहास सविस्तरपणे सांगण्यात आला.

गुरु तेग बहादूर जी – धर्मस्वातंत्र्याचे महान रक्षक

गुरु तेग बहादूर सिंह जी (1621–1675) हे शीख धर्माचे नववे गुरु होते. त्यांनी जबरदस्तीने धर्मांतराच्या विरोधात उभे राहत काश्मिरी पंडितांच्या धर्मरक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांनी कोणत्याही एका धर्मासाठी नव्हे, तर सर्व धर्मांच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. दिल्लीतील चांदणी चौक येथे त्यांनी दिलेले बलिदान आजही मानवतेचा, सहिष्णुतेचा आणि धैर्याचा सर्वोच्च आदर्श मानले जाते.

अमरावती येथील या ऐतिहासिक कार्यक्रमाला खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, डीसीपी श्री गणेश शिंदे, (गुरुद्वारा गुरुसिंग सभाचे अध्यक्ष,) अमरजोत सिंग जग्गी, (गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभाचे कार्यकारी अध्यक्ष,) रविद्रसिंग सलुजा,  (मुख्य संपादक, प्रतिदिन अखबार) नानक आहुजा, (पूज्य पंचायत, कावर नगर) अ‍ॅड. वासुदेव नवलानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 ‘हिंद की चादर’

कार्यक्रमाचा एक विशेष भाग म्हणून विशेषतः तयार करण्यात आलेल्या प्रचार वाहनाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले. यावेळी संजिता महापात्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती, यांची उपस्थिती होती.

 “हिंद की चादर” हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम नसून, तो समाजात ऐक्य, सहिष्णुता आणि इतिहासाबद्दलची जाणीव निर्माण करणारा व्यापक प्रयत्न आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकाराचे विशेष कौतुक करावे लागेल. नागपूर येथे होणाऱ्या “हिंद की चादर” कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी विविध समन्वय बैठकांचे आयोजन करून प्रशासन व समाज यांच्यात उत्कृष्ट समन्वय साधला.

अमरावती येथे आयोजित “हिंद की चादर” कार्यक्रमाने गुरु तेग बहादूर जी यांच्या विचारांना नवसंजीवनी दिली. धर्मस्वातंत्र्य, मानवता आणि सत्यासाठी उभे राहण्याची प्रेरणा या कार्यक्रमातून जनतेला मिळाली. विविध समाजघटकांचा सहभाग आणि शासनाचे सक्रिय सहकार्य यामुळे हा उपक्रम एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी पर्व ठरला.

गुरु तेग बहादूर जी यांचा संदेश आजही तितकाच समर्पक आहे  “सर्व धर्मांचा सन्मान करा, अन्यायाविरुद्ध उभे रहा आणि मानवतेचे रक्षण करा.”

लेखक: डॉ. निक्कू खालसा

सचिव, गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभा, अमरावती

संकलन-  जिल्हा माहिती अधिकारी अमरावती.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.