
गवई कुटुंबाचा भांडाफोड.! : आरएसएसशी जवळीक की आंबेडकरी चळवळीशी दगाफटका?
नुकतेच काल-परवापासून एका वृत्तपत्रातील कात्रण सर्वत्र झपाट्याने पसरत आहे ज्यात कमल गवईच्या फोटोसह बाजूला कमल गवई पाहुणी म्हणून आरएसएसच्या कार्यक्रमात जाणार असल्याची एक बातमी पाहायला मिळतेय…
आरएसएस ही सर्वार्थाने आंबेडकरी चळवळ व समूहाला कशी व किती मारक असणारी संघटना आहे हे वेगळे सांगावयास नको, आंबेडकरी समूहातील पोरा-सोरांना चळवळीतले काही कळो अथवा न कळो पण आरएसएस आपली शत्रूसंघटना व भाजप आपला शत्रूपक्ष असल्याचे भल्याने कळते, याच धर्तीवर स्वतःला आंबेडकरी चळवळीचे नेते वगैरे असल्याची भलावणं करणाऱ्या गवईविषयी आंबेडकरी चळवळीच्या विसंगत वागत असल्याची बातमी पाहून आंबेडकरी चळवळीतील काही सुजाण लोकांनी समाजमाध्यमांवरून आक्षेप नोंदवायला सुरुवात केली असता, समाजाचा आपल्याविरोधात जाणारा कल पाहून कमल गवईने कमालीची पलटी मारली व लगेच या बातमीविषयक हरकत दर्शविणारे एक हस्तलिखित प्रसिद्ध करून या सुबुद्ध समाजाला चकवा देण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला आरएसएस कडून कुठल्याही पद्धतीचे अधिकृत निमंत्रण नसून ही बातमी खोटी आहे अशी धांदरट व बावळट पोरालाही सहज फोलपणा लक्षात येण्याजोगी वलग्ना केली. कमल गवईच्या या म्हणण्याला फोल ठरविण्यास अतिशय सामान्य तर्क कामी येऊ शकतो, की कुठलाही आयोजक पुढच्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्याचं साधं बातमीच्या कोपऱ्यात नाव टाकण्यास इच्छुक नसताना प्रमुख पाहुणी म्हणून आंबेडकरी चळवळीतील केवळ नामशेष राहिलेल्या कमल गवईचेच नाव कुणी उगाच का छापेल?
भरीस-भर म्हणजे आपल्या आईने पलटी मारलेली असताना सुद्धा त्याहून मोठा बालिशपणाचा नमुना दाखवत राजेंद्र गवईने आरएसएस च्या कार्यक्रमात आपल्या आईने जाणे कसे संयुक्तिक आहे याचा दाखला देण्यासाठी उताविळपणात आपल्या वडिलांपासून समग्र गवई कुटुंबाची आरएसएस, भाजप पक्ष व त्यातील नेत्यांसोबत कशी व किती जवळीक होती आणि अद्ययावत आहे हे ओघाओघाने सांगून आपलीच पंचाईत करून घेतली.
इतक्या वर्षांपासून दीक्षाभूमीवर घडी घालून बसलेल्या गवई कुटुंबाने मान, पैसा व पदाच्या लालसेने आरएसएस सारखी केवळ आंबेडकरद्रोहीच नव्हे तर राष्ट्र व संविधानद्रोही असणाऱ्या संघटनेला मांडीवर घेऊन दीक्षाभूमीचा कोट्यवधींचा निधी गिळंकृत तर केलाच पण संघासारख्या विषारी सापालाच खुद्द सांस्कृतिक अतिक्रमण करण्यास अमंत्रण दिले. आजवर दीक्षाभूमीसंबंधाने घेण्यात येणाऱ्या प्रत्येक निर्णयात संघ सामील असल्याच्या आंबेडकरी जनतेच्या गृहितकाला खुद्द राजेंद्र गवईने आपल्या वक्तव्यातून पुष्टी दिली आहे. मात्र गवई कुटुंबाची ही दुटप्पी भूमिका काही नवीन नाही, चळवळीला ढाब्यावर बसवून केवळ आपली पत प्रतिष्ठा व हितसंबंधांचे जतन करण्यासाठी आळीपाळीने कधी काँग्रेस तर कधी भाजप, संघाच्या कुशीत रमणारे गवई कुटुंब वेळोवेळी उघडे पडले आहेत.काही का असेना यानिमित्ताने गवई कुटुंबाचा भांडाफोड झाला हे चळवळीच्या अनुषंगाने किमानअंशी हिताचेच झाले…

-रोशन किसनराव गजभिये,
अमरावती