Sunday, October 26

गावखेड्याची दिवाळी: आठवणींनी उजळलेलं ग्रामीण सणाचं सौंदर्य

“गावखेड्याची दिवाळी – ग्रामीण सण, ओटे, रांगोळ्या आणि पारंपरिक आनंदाचे चित्र”

नवरात्रं पार पडलं की दसरा दणदण करत यायचा.दसऱ्याच्या दिवसी घराला आंब्याच्या पानांची तोरणं दोऱ्यात ओवून बांधायची‌. चार,पाच झेंडूच्या फुलांईचा हार करायचा.आपटयाची पाने तोडायले जाऊन ती घरी आणायची.व संध्याकाळी जेवणं झाली म्हणजे घरातली म्हातारी माणसं प्रशस्त आंगनात सुताचा तडव आथरून दसऱ्याच्या सोनं देण्याची वाट बघायची. बाजूला पानपुळा सुपारी अडकित्ता असायचा.येणाऱ्या, जाणाऱ्यांची ख्यालीखुशाली ईचारून पानसुपारी खाण्याचा आग्रह करायची.किती दिलदार लोकं होती ही.दसरा पार पडला म्हणजे पंधरा दिवसावर दिवाई रोरो करत यायची.


आमच्या गावाकडच्या दिवाईत मस्त व आगळीवेगळी मजा होती राजेहो. घरातल्या सगळ्या सातऱ्या वाकया,गोधडया धान्य, मिरच्या साजऱ्या उन्हात वाऊचिऊ घालायचं काम चालायचं.महिन्याभरा पूर्वीच गवंडयाच कुटार गारा करून त्यात तुडवून,कालवून साजरू मूरू द्या लागायचं मग मुरल्यावर फावड्यानं तुडवा लागायचं.नंतर भीताईले साजरा गीलावा करायला लागायचा. त्यासाठी लागणारी पांढरी माती गावातल्या पिढ्यानपिढ्या वतनदारी व देशमुखी असलेल्या बाप्पुराव बुढयाच्या खटल्यातल्या गढीची असायची.लोकाईनं झाकटीत गढीची पांढरी फटक माती चोरू,चोरून एवढी मोठी झाडापेक्षा ही उंच गढी पार बुळात चेंदा घातली होती. त्या पांढऱ्या मातीनं भिता अशा काचा सारख्या अंधारातही चमचम चमकत.आम्हाले सराटे,ईवे हातात देऊन ओसरीचे पोपळे काढा लागत.आंगमेहनतीचे कामं करा लागत.

“काढा रे पोट्टे हो भीतीचे तयकुटाचे पोपळे” बस न्याहरी पर्यंत निरानाम हाच धंदा असे. सकाऊनची न्यायरी मस्त झाली की डबल कामाले भिळो. तेव्हा घरोघरी नळ योजना काही अस्तित्वात नव्हती.त्यामुळे धर्मायाच्या हौदावरचं कावडीनं खांद्यावर पाणी आणून ते साजरं फफुळळयावर तमरेटानं शिपा लागायचं. मारवाडयाच्या दूकानावर मिठ्ठू छाप निळ्या रंगाची पाच रूपयांच्या पुळ्या भेटत.त्या ईकत घेऊन,व बकेटभर पाण्यात भिजवून साबुदाण्याचं जरासक पाणी चुन्याची बुगदी असं सारं एकत्रित करून ते फडक्यानं साऱ्या भीताईले द्यावं लागायचं.सारे हातानं हात दुखून यायचे. तेव्हा असे ब्रश फ्रश ईकायला नव्हते,होतेही तं ते सुविधा फक्त शहराच्या ठिकाणी मोठ्या लोकाईपुरतीच मर्यादित होती. धाग्या,दोऱ्यात कातीव असलेले मातीचे ओटे शेणामातीच्या गीलाव्यानं साजरे सारवल्या जायचे .

या थंडगार ओट्यावर बुडेबाडे,लेकरंबाकरं मस्त दिवसभर फाऱ्या टाकून मस्त गप्पा मारत बसायचे. प्रत्येक घरच्या म्हाताऱ्या माणसाचं बसायचं हे हमखास ठिकाण होतं.हे ओटेही मस्त धाराकोरा एका लाईनमधे असत. याच ओट्यावर बसून महिला मंडळी एकमेकींच्या डोक्शातल्या उवा,लिखा काढात सुखादुखाची देवाणघेवाण व कामाधंदयासाठी एकमेकीना मदत करू लागायच्या.एकमेकीचे येणीफणीने साजरे केसं ईचरून द्यायच्या. बिल्लोर भरणारा किंवा आरशे-डाबल्यावालाही घडीभर याच थंडगार सारवलेल्या ओटयावर बसून थंडगार तवलीत पाणी घेऊन घटाघटा घश्यात रिचवायचा व शापीनं घाम पुसून पुढच्या मार्गाले चालू लागायचा.

वसुबारसनं दिवायीची सुरूवात व्हायची.या दिवशी ढोरकी गावाजोळच्या नदीकाठच्या गोठानावर साऱ्या गावातले ढोरं, वासरं ,म्हसाळा एकत्र करून झाडाखाली बसवायचा.लोकं आपापल्या बैलगाडीत हिरव्या गवताचे भारे ,कडबा कापून व बैलबंडीत भरून गुराढोरांना आणून टाकायचे. या दिवशी गुराढोरांचं पूजन केल्या जायचं.आमची आजी दोन रूपयाचा गेरू दुकानातून ईकत आणायले लावायची तोच गेरू एका वाटीत भिजवून जनावरांच्या शिंगाला पाठीला लावल्या जायचा. हेच गावच्या माणसाची धनसंपत्ती असल्याने त्यामुळे या गोधन पूजनाला गाव-खेड्यात वेगळचं महत्व होतं.

त्यांनतरचा महत्वाचा दिवस म्हणजे धनतेरसचा दिवस उगवायचा. आमच्या एटायातली समोरच्या घराजवळची बखालीन बुढी मस्त ताजे झेंडूची फुलं व खायला येलाच्या कुयऱ्या,हेटयाची फूलं , कोणताही मोबदला न घेता शेजारधर्म म्हणून तशीच आणुन द्यायची.मिसयच्या भाकरी,व लालभडक तयलेल्या लाल तिखटासोबत सोबत ह्या कुयऱ्या हेटयाची फूलं जबरदस्त न्याहरी व्हायची.तोंडी लावाले सोबत शेतातली ताजी बोरूची फुलं असायची. ही बोरूची फुलं कापसाच्या वावरात अजूनही गावाकडे हमखास सापडतात. घरच्या वावरातील पाट्यातून निघालेली गवाराच्या शेंगांची भाजी आई मस्त पाट्यावर तीळ टाकून वाटायची. तीच्या हातच्या भाजीले वेगळीच चव होती.गरमागरम चुलीवर शेकलेल्या दोन भाकरी लाल आंबट तमाटया सोबत कशा पोटात जायच्या तं पत्ता लागायचा नव्हता.

घरोघरी गाईवासरं असल्याने घरचचं दूध ताक भरपूर असायचं. मोठ्या ताटलीत शिया भाकरीचा काला मोळून वरून मीठ टाकून थंडगार ताकाचा काला पोरंसोरं पोट भरून खायची.जीव मस्त थंडगार व्हायचा.पोरसोरं घराजोळ बाभुयच्या गर्द सावलीत दिवसभर खेळायची. धनतेरसच्या दिवसी संध्याकाळी वहीखात्याची,घरात असलेल्या सोन्या, नाण्याची,पैशांची पुज्या केली जायची. दिवाळीच्या दिवशी गावात भल्या पहाटे मंगल वाद्ये वाजायची. त्या सनई चौघडयांच्या तालासुरात दिवाईचा प्रचंड उत्साह अंगात संचारायचा.दिवायीच्या आंगोळीले आंगाले उटणं चोळायचं. म्हणजे आमच्या भाषेत त्याले किक्स्सा म्हणत.


तो आम्ही घरीच तयार करायचो.ज्ववारीचं पीठ, विशिष्ट सुगंध असलेल्या वाळयाच्या गवताच्या मुळ्या टाकून घरीच किक्सा तयार केल्या जायचा. वाटीत तेल, पाण्यात भिजवून आंगाले चोळायचा. त्याचा सुगंध दिवसभर मनाला आल्हाददायक वाटायचा.बटलोईत चुलीवर गरम केलेल्या पाण्यानं मस्त न्हाणीत बुढी खरंखरं साजरी खापरानं पाठ खासून देऊन लाईफबॉय साबणानं आंघोळ करायची. चूलीवरचं लाकडावरचं मस्त कडक कडक गरम पाणी मस्त वाटायचं. तेव्हा आजच्या सारखी पिअर्स किंवा मोती सारखी महागडी साबणं नसायची.लोकांची स्वस्तात मस्त दिवाई असायची. म्हणजे ‘काजयानं डोया साजरा करणं’ त्यातलाच हा प्रकार असायचा.

कमी पैशात चांगलं जीवन जगण्याची ही पद्धत बहुतेक आजच्या चंगळवादी पिढीलाही बहुतेक झेपणार नाही.बाबा सायकल व झोरा घेऊन बाजूच्या मोठ्या गावातून दिवाईचा आठवडी बाजार घरी आणायचे. आम्ही थैलीतल्या पुड्या,पाडया चाचपडून अंदाजानं बघायचो. अंदाज आला नाही म्हणजे उघडून बघायचो.दिवाई निमित्त बजारातून एखादा नवा सदरा ईकत घ्यायचे. स्वस्त का असेना पण पोटाले चिमटा घेऊन घ्यायचे पण आईवडीलांना दिवायीत स्वता कधी नवे कपडे घातलेले मी तरी माझ्या आयुष्यात कधीही बघीतलेलं नाही. फक्त आपल्या लेकरांना आंगभर कपडा सणासुदीच्या दिवसी घालायले भेटावा यासाठी त्यांची ही तळमळ असायची. महागडी फटाके बहुतेक नसायचीच.बाराही महिने पैशाची चणचण असायची.

फारतर टिकल्याईच्या एकदोन आठान्याच्या डब्ब्या असायच्या. बंदुकीचा पत्ता नसायचा. रस्त्यावरचा एक मोठा लोखंडी गोटा हातात घेऊन आम्ही त्यानं त्या टिकल्या टचाटच फोडायचो.फट आवाजानं पोरं सुखाऊन जायची. एकमेकांच्या तोंडाकडे पाहून मस्त खिदळायची मनसोक्त हासायची.तेही सुख फक्त दिवायीच्या दिवशी बघायले मिळायचं. दुसऱ्याच्या दारातला फुसका, वात नसलेला फटाका आणुन त्यातली बारूद काढून कागदावर पेटवायची व दिवाईचा आनंद साजरा करायचा. दिवायीच्या दिवशी जनावरांचा गोठा सारवून चक्क केल्या जायचा. शिडी लावून भिता सारवल्या जायच्या.घरात पडलेल्या छिद्रासाद्राची डागडूजी केल्या जायची.इटकरं,बडगरं टाकून ती छिद्र बुजवल्या जायची.आमच्या आजीचा बराच म्हणजे अर्धा अधिक दिवस गायवाडयात जायचा. म्हणून हे लोकं तंदुरुस्त असायचे.खतावर ,माडीवर , इंधनाच्या कोपऱ्यापासून दिवे लावल्या जायचे.

जुने लोकं यालाच लक्ष्मी मानत असल्यामुळे ही प्रथा अजूनही खेड्यापाड्यात जोपासल्या जाते.पायटीच घरातल्या सुनवायऱ्या उठून सडासारवण करायच्या, मस्त अंगणात रांगोळ्या घालायच्या मन अगदी प्रसन्न व्हायचं.आता ते सुख बंगल्यातही बघायला मिळत नाही.दिवायीच्या दिवशी पहाटेच ढोरं,वासरं शेताकडे,गायरानात चरायले जायची.ती संध्याकायी धूळळा उडवत गावात आली म्हणजे खरी दिवाळी भासायची. जिकडे तिकडे सुंदर दिवनाल्या लावलेले दिवे मस्त एका ओळीत दिसायचे. मंदिराच्या ओट्यावर दिवाबत्ती करायची.तुळशीपुढे दिवा लागायचा.अंधार पडलेल्या प्रत्येक घरांमधून मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात सयपाकाचा सुंगध वाऱ्याच्या दिशेनं मोहल्लयात घुमायचा. ढोरा वासरांच्या गळ्यातील घूंगरांची किणकिण बागूल करतांना कानावर मस्त वाटायची.एखादी वयस्क म्हतारी घरासमोरील पांढऱ्या स्वच्छ ओट्यावर बसून नातु पणतू वागवत येणाऱ्या, जाणाऱ्यांची ख्यालीखुशाली ईचारायची.

दिवाईच्या दिवशी भल्या पहाटे वाजंत्री वाजवत गावची दिवाळी पहाट उजळायची. एवढ्या झाकटीत आंगावरचं फेकून मुलं कावरी,बावरी होऊन दार उघडून बघायला ओट्यावर यायची. नंतर काकडा आरती वाजवत यायची. सारा दिवस कसा आंनदात जायचा.लवकरच भल्या पहाटे जळतनावर तपवलेल्या बटलोईतून पटापट आंगोळा करून,नवे कपडे घालून ग्रामपंचायतीच्या ओट्यावरून आम्ही चक्कर मारायचो. कधी सदरा नवीन रहायचा तर पॅन्ट जुनाच असायचा असं तो तितंबा रहायचा. नवं घातलं म्हणून पोरंसोरं पाठीवर नऊ बुकक्या मारायची.दुपार होता सायकलवर दिवा घेऊन शेतात जायचो. सोबत बांधून आणलेल्या कांदा भाकरीसोबत न्याहरी करायची.शेतात अंधार पडायच्या आधी दिवा लावायचो.व परत बैलगाडीच्या रस्त्यानं जोरात सायकल चालवत घरी यायचो. संध्याकाळी आंगणात पाणी शिंपडून आंगण स्वच्छ करून अंधार पडायच्या आगोदर पुंजाने खतावर नेल्या जायची.

घरोघरी लक्ष्मीपूजन होऊन लख्ख दिव्यांच्या उजेडात सारा गाव झगमगाटात चमकायचा. फटाक्यांच्या आवाजानं लहान मुले प्रचंड घाबरायची. संध्याकाळी पुरणपोळीचं जेवण होऊन सारवलेल्या ओटयावर बैठका जमायच्या.एकमेकांना खयाली,खुशाली विचारली जायची. बराच वाळखोळ चर्चा बाता झाल्या म्हणजे झोपायचा वखद व्हायचा.गाव परत अंधारातल्या गुलाबी थंडीत गुडूप,सामसूम व्हायचा. आजच्या सारखी लाईटींग, रोशनाई श्रीमंतांच्या घरीही नसायची मस्त नैसर्गिक कुंभारानं घरी आणून देलेल्या उजयण्या,पणत्या घरादारावर शोभून दिसायच्या. सपरीत ओट्यावर,भिंतीवर असलेल्या कनोडयातून त्या तेल टाकून लावल्या जायच्या.साधासोपा अनारसे,कानोले,चिवडा,शंकरपाळे,रव्याचे लाडू असा फराळ असायचा.गावचा ढोरकी लयाळया नावाच्या गवतापासून दिवा ठेवण्यासाठी नदी काठावरून झाकटीतच गवत कापून आणायचा. त्या गवतापासून झेंडवाई तयार करायचा.तो झेंडवाईत ठेवलेला दिवा साऱ्या गावातून फिरवून

‘आली आली दिवाळी गाई म्हशी ओवाळी, एकाचे एकतीस पाचाचे पन्नास येल मांडवावर जावो.घरचा घरधनी राज करो.‘ असं साऱ्या गावभर प्रत्येक घरांमधून म्हणायचा. त्याच्या हातात मोठी काठी व तेलाची कॅटली असायची.त्या बदल्यात लोकं त्याला तेल, ज्वारी बाजरी, फराळाचे पदार्थ त्याला द्यायचे.ही एक एकमेका प्रती असलेली जिव्हाळ्याची नाती होती.गावचा कुंभार,सुतार, न्हावी,बलूतेदार सुखी असायचा‌.सालगडयाले खटल्यात नवा पायजामा सदरा भेटायचा. त्या बदल्यात त्याला धान्यही भेटायचं. घरोघरी रांगोळया,शेणाचे सडे व गावातून भल्या पहाटे मंदिरातून निघालेल्या काकडयाचा निघालेला भक्तीसूर सारं वातावरण पवित्र करायचा. जो तो दार उघडून आपल्या ओटयावर उभं राहून काकडा आरतीला भक्तीभावाने हात जोडून नमस्कार घालायचा.

दुसऱ्या दिवशी घरच्या ढोराईच्या शेणापासून नरकासुर (म्हसोबा )आजी बनवायची. त्याच्या भल्या मोठ्या पोटाच्या बेंबीत वाटीभर ताक टाकायची. त्यात छोटे छोटे वगारं करून त्यांना ताक पाजायची. कापसाच्या शेतीचा देखावा करायची. समोर गोधनाचा,ढोरावासरांचा देखावा करायची. दिवाळी झाली रे की लेकीबाळीची लेकरं बाकरं घेऊन एसटीनं नाही तर मिळेल त्या वाहनानं माहेरी येण्याची गडबड सुरू व्हायची.घर भरल्या गोकुळासारखं डच भरून जायचं.एवढं की रात्री झोपण्यासाठी जागा अपुरी पडायची‌. जेवणं खावणं झाल्यावर थंडीच्या दिवसात कापसाच्या गंजीवर गाद्या टाकाव्या लागायच्या.समोरच्या डोंबाजीच्या झोपडयातून ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ असं रेडीओतून मस्त गाणं लागायचं.

त्या टिपूर चांदण्यात ते गाणं ऐकून कानपट्टीले गावातल्या जत्रीत घेतलेली मस्त मफलर बांधून आंगावर गोधडी घेऊन झोपतांना मन अगदी प्रसन्न व्हायचं.लेकीबाळींना आपापल्या परीनं उधारपाधार कपडालत्ता घेतल्या जायचा.काहीच दिवस राहून परत लेकीबाळींना निरोप दिल्या जायचा. सोबत एसटी स्टँडवर पोहचून देतांना पोरीला काहीतरी सोबत द्यायला शेतातल्या धान्याची भलीमोठी थैली हातात रहायची. पावणे रावणे वारासार होईपर्यंत कशातच मन लागायचं नसायचं. पै-पावणा गावी गेल्यावर रिकामं झालेलं घर खायला धावायचं.लेकराबाकराईनं,ढोरावासराईनं व दुधदुभत्यानं भरलेल्या घरात दिवाई दणदण वाटायची.शेतीवाडया, रानपाखरं दिवसभर चिवचिवायची. सारा आसमंत दिवाळीच्या सुगंधानं दरवळून व न्हावून निघायचा.

विजय जय्सिंग्पुरे

-विजय जयसिंगपुरे, अमरावती
भ्रमणध्वनी -९८५०४४७६१९.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.