सायबर गुन्हेगारी व त्यावर उपाय.!

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

सायबर गुन्हेगारी व त्यावर उपाय.!

बऱ्याच दिवसांपासून आपल्या मोबाईलवर फोन डायल केल्यावर रिंग टोन वाजते ती ही की ” आपल्याला बनावट ई.डी., पोलीस यंत्रणेवरून कॉल्स येत असतील तर त्याला बळी पडू नका. म्हणजे काय तर ह्या चोरटयांनी पोलीस यंत्रणेला सुद्धा सोडले नाही, असो.


सायबर गुन्हेगारांनी आपल्या मानसिकतेचा संपूर्ण अभ्यास केला आहे. त्यांना माहित आहे आपले नागरिक हे लवकरच भाऊक होतात, लगेच विश्वास ठेवतात. त्यांना भावनिक ब्लॅकमेल केले की ते लगेच त्यांच्या जाळ्यात अडकतात. आता इथे थोडे आपल्याला लगेच विश्वास ठेऊन चालणार नाही तर आपण लगेच सतर्क झाले पाहिजे.


मोफत ह्या अफूच्या गोळीवर आपण नियंत्रण ठेवले पाहिजे. आपल्याला मोफत म्हटले की तोंडाला लगेच पाणी सुटतं आणि ह्या मोफतच्या जाळ्यात आपण लगेच अडकतो आणि आपली सायबर शिकार होते. ह्या जगात मोफत काही मिळत नाही ह्यावर आपण ठाम असले पाहिजे.


हे सायबर गुन्हेगार बँकेतून बोलतो असे बिनधास सांगतात. काही माहिती मागतात जसे खाते क्रमांक, नाव आदी.  खूप घाई दाखवतात. खाते बंद होईल असे सांगतात. तेव्हा आपण थोडा विचार केला पाहिजे की, बँकेला काय गरज आपल्या बँक डिटेल्सची  ? ते तर बँकेला माहीतच असतात. कृपया करून कोणाला ही बँक डिटेल्स  देऊ नका. खाते बंद होत असतील तर सरळ सांगा बँकेत भेट देतो म्हणून आणि त्याउपर ही पिच्छा सोडत नसेल तर बिनधास्त सांगा होऊ दया बंद नंतर बँकेत भेट देतो असे सांगा.


सर्वात महत्वाचे म्हणजे कसलाही ओ.टी.पी. कोणालाही देऊ नका किंवा सांगू नका. ओ.टी.पी. हा आपल्या तिजोरीची चाबी असते. आपण एकदा का ओ.टी.पी. दिला की त्याच्या हाती आपण तिजोरीची चाबी दिली असे समजा.
दुसरे महत्वाचे म्हणजे पोलीस, सी.बी.आय., इन्कम टॅक्स, ई.डी. ह्या धमकीला अजिबात घाबरू नका. थोडे विचार करा आपण काही केले नाही आणि काही घडले नसेल तर घाबरण्याचे काही कारण नाही. लगेच तिथे भेट देतो म्हणून सांगा.
कुठलीही लिंक आली असेल तर ती ओपन करू नका. ही लिंक ओपन केले की आपण जाळ्यात अडकतो व आपले डिटेल्स त्यांच्या पर्यंत पोहचतात. कुणालाही रु.१०/-, रु. २०/- अगदी शुल्लक रक्कम, फीज, प्रवेश फीज पाठवू नका. ही राशी पाठविली की आपले बँक डिटेल्स चोरट्याना  पोहचतात.


हल्ली सायबर गुन्हे वाढले आहेत. त्यावर आपण वरील प्रमाणे काळजी घेणार तर आहोच. परंतु ह्याचे मूळ कारण शोधले पाहिजे की तरुणाई इकडे का ओढल्या जाते.  ह्याला एकमेव कारण आहे ते म्हणजे बेरोजगारी आणि उपासमारी. रोजगार नसल्यामुळे तरुण भरकटतात व नको त्या मार्गाला लागतात. बघाना कॉल्स करणारे हे तरुण आणि तरुणी असतात कारण त्यांना रोजगार नाही  व दुसरा म्हणजे माणसाचा लालचीपणा. आपण खूप लालची आहोत ही माणसाची मानसिकता चोरटयांनी ओळखली आहे आणि ह्याला हमखास आपण बळी पडतो  हे चोरट्याना माहित आहे. लालचे अभावी माणूस अधिक मिळेल ह्या लालचीपणाला तो बळी पडतो. माणसाला सगळे फुकट पाहिजे असते. ही चोरटयांनी माणसांची मानसिकता ओळखली आहे. ह्या फुकटच्या मागे पळता पाळता तो आपले हक्काचे सुद्धा गमावून बसतो.


चोर, भामटे, दरोडेखोर हे अगोदर ही होते आणि आजही आहेत व भविष्यात सुद्धा राहणार आहेत. फक्त आता चोरी व दरोडा पडण्याचे प्रकार बदलले आहेत. अगोदर घरफोडी व्हायची आता एव्हढी मेहनत व जोखीम घेण्याची चोरट्याना आता गरज नाही. चोर सुद्धा नेहमीच एक पाऊल आपल्या पुढेच असतात. ते सुद्धा स्मार्ट झालेले आहेत. हे असेच त्रिकालाबाधित चालू राहील. जो पर्यंत तरुणांना त्यांना हक्काचा रोजगार मिळणार नाही व आपली मानसिकता बदलत नाही की, हे माझे नाही हे मी घेतले नाही पाहिजे हा विचार जो पर्यंत रुजत नाही तो पर्यंत हे असेच चालणारच. ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. तेव्हाच ह्या अशा घटनांवर नियंत्रण येऊ शकेल.
आपण ह्याचे मूळ शोधले पाहिजे. मुळात चोर चोरी का करतात हे शोधले पाहिजे. काही कारणांपैकी एक कारण आहे ते म्हणजे रोजगारांच्या संध्या नसणे. जर सन्मानाने रोजगार मिळाला तर चोरी कोणी करणार नाही. आता रोजगाराच्या संध्या जवळपास संपलेल्याच आहेत आणि आहे त्या कंत्राटी पद्धतीच्या आहेत. कंत्राटी पद्धत म्हणजे कंत्राटदाराचा भरगोस नफा आणि कामगारांचे शोषण होय. कामगाराला तुटपुंजा रोजगार मिळतो. त्याचे ह्या तुटपुंज्या पगारात काहीतच होत नाही. तो कर्जबाजारी होतो व अशा गुन्हेगारी कडे वळतो.


जवळपास सर्वच सरकारी रोजगार बंदच झालेले आहेत. लोकसंख्या भरमसाठ पणे वाढत आहे. तर दुसरी कडे युवकांना रोजगार मिळत नाही आहे. अशा परिस्थितीत युवक हे अश्या काही कुलूपत्या काढणारच. कोणाला तरी ठगवणार. कारण की हा मार्ग सोपा आहे. ह्या प्रकारात तर काही गुन्हेगार शेवट पर्यंत सापडत नाहीत. ते  तपास यंत्रणेला सुद्धा आव्हान असतं.
असे म्हटले जात होते की, संगणीकीरण हा सर्वात आर्थिक सुरक्षिततेचा मार्ग आहे. परंतु सायबर गुन्हेगारांनी ह्यावर सुद्धा जोरदार हमला केला आहे आणि आपण आता सर्वजण दहशतीत वावरतो आहोत. ह्यावर एकच मार्ग आहे की, कोणावर ही विश्वास ठेऊ नका, ओ.टी.पी. पासवर्ड, ए.टी.एम. कार्ड अनोळखी व्यक्तीला देऊ नका. जरा सतर्कता बाळगा. नक्कीच आपण सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण आणू शकू. जरी काही गडबड झाली तर कुठलीही लाज न बाळगता ताबोडतोब सायबर यंत्रणेला कळवा म्हणजे ते लवकर कार्यवाही करू शकतील. घटना घडल्यावर लगेच कळविणे हे फार आवश्यक असते. कारण की गुन्हेगारांना कमी वेळ मिळतो व आपले गेलेले पैसे मिळविण्यास सोपे जाते.

अरविंद मोरे,
नवीन पनवेल (पूर्व) मो. ९८२०८२२८८२.

Leave a comment