कमांडर : एक काळजीवाहू साथीदाराची संथ एक्झिट.!

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

कमांडर : एक काळजीवाहू साथीदाराची संथ एक्झिट.!

आज गावात निळं रॉकेलसुद्धा येत नाही, आणि रॉकेलवर चालणारी कमांडर गाडी तर फार लांबच गेली आहे. एकेकाळी गावातल्या प्रत्येक रस्त्यावर, पायवाटांवर, घाटातून, नदीच्या पात्रातून गर्जना करत जाणारी महिंद्राची कमांडर आता जणू आठवणींच्या धुरळ्यात हरवून गेली आहे. ए.सी.च्या गाड्या, चकचकीत एस.यू.व्ही., आणि आधुनिक मोटारगाड्यांच्या गर्दीत कमांडर हा एक इतिहास होऊन बसली. पण हा इतिहास फक्त एका गाडीचा नाही, तो आहे ग्रामिण भारताच्या जीवनशैलीचा, स्वाभिमानाचा आणि जिद्दीचा.

कमांडर ही गाडी म्हणजे फक्त एक वाहन नव्हतं, ती होती एक माणूस. गावातल्या प्रत्येक घराला या गाडीशी काहीतरी वैयक्तिक नातं होतं. कोणाचं लग्न, कोणाचा आजारी माणूस, कोणाचा बाजार कमांडरचं योगदान ठळकपणे दिसायचं. ती केवळ प्रवासासाठी नव्हती; ती होती गावाचे सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक व्यवहार जुळवणारी एक अविभाज्य कडी.

महिंद्राने जेव्हा कमांडर तयार केली, तेव्हा ती डोळ्यांसमोर ठेवलेली होती भारताची खरी ओळख ग्रामिण भारत. 2000 सी.सी. चे दमदार डिझेल इंजिन, 62 हॉर्सपॉवरची ताकद, मजबूत चेसिस आणि अत्यंत सोपी रचना या सगळ्यामुळे ही गाडी दुर्गम भागातही विश्वासार्ह ठरली. रस्ता असो वा नसो, पावसाळा असो वा उन्हाळा, कमांडर चालायचीच.

गाडीची रचना इतकी सोपी होती की, रस्त्यात कुठेही बंद पडली तरी कोणताही गावातला मेकॅनिक तिला पुन्हा सुरू करायचा. इंजिन ओपन करणं, फिल्टर काढणं, डिझेलची पाईप लाईन तपासणं  सगळं पारदर्शक आणि उघड. एखाद्या घरगुती ओळखीप्रमाणे ती सुलभ होती. आणि म्हणूनच कमांडर म्हणजे गावातली सर्वात विश्वासार्ह साथ.

हे वाचा – लग्नाची गाठ, खर्चाचा फाट

या गाडीचा एक वेगळाच रोमान्स होता. समोरचा ड्रायव्हर तिरका बसलेला, स्टेअरींग मागे लपलेला, उजव्या बाजूला थोडं बाहेर आलेलं शरीर, आणि गाडी भरगच्च भरलेली असतानाही त्याच्या चालवण्यात एक सहजता. हे दृश्य आजही डोळ्यांसमोर उभं राहिलं तरी एक हसू येतं. कंडक्टर गाडीच्या खालून ओरडत “चलो..!” म्हणायचा आणि त्याच वेळी मागे एखादा उत्साही तरुण हाताने लटकलेला  हा होता प्रवासाचं खऱ्या अर्थाने ‘थ्री-डी’ अनुभव.

कमांडरची अधिकृत सीटिंग क्षमता दहा जणांची होती, पण प्रत्यक्षात त्यात बसणारे किती? कधी कधी वीसही ओलांडत! ड्रायव्हरच्या बाजूला चार, मधल्या सीटवर सहा, मागच्या डाल्यांमध्ये आठ, आणि वर स्टेपनीवर एक, इतकंच नव्हे तर त्याच्या गॅपमध्ये खोसलेली बारीक बाई किंवा दोन बारकी मुलं. या गाडीत कोणताही प्रवासी परका नव्हता, सगळे जण एकमेकांचे होते, एकमेकांच्या शरीराशी खेटून बसलेले  खरं एकत्रित प्रवास.

ग्रामिण भागात कमांडर ही फक्त लोकल गाडी नव्हती; ती एक ‘मोबाईल समाज’ होती. गावातल्या मुलांनी कमांडरमध्ये बसून शाळा, महाविद्यालयं, बाजार पाहिला. कोणी तिला पाहून पहिल्यांदा गाडी कशी चालवायची हे शिकलं, तर कोणी पहिल्या प्रेमाचं पत्र कमांडरच्या गाभाऱ्यात बसून लिहिलं. कोणी आजारी वडिलांना तिन्हीसांजेला दवाखान्यात नेलं, तर कोणी पहिलं लग्न कमांडरनेच जुळवून दिलं.

पण काळाच्या ओघात सगळं काही बदलत गेलं. सरकारी नियम, प्रदूषणाच्या अटी, नवीन टेक्नॉलॉजी आणि शहरांच्या दिशेने झुकणारं प्रशासन यामुळं कमांडर मागे पडत गेली. नवे वाहननिर्माते अधिक आकर्षक गाड्या घेऊन आले, ज्यात आराम होता, ए.सी. होता, आवाज कमी होता, पण ‘जीव’ नव्हता. कमांडरचा आवाज, तिचं थरथरतं स्टेअरींग, गिअरचं घरघरतं वाजणं या सगळ्यात एक रांगडे सौंदर्य होतं, जे आधुनिक गाड्यांत कधीच दिसणार नाही.

आज फार क्वचित एखाद्या खेड्यात कमांडर दिसते. तिचा रंग उडालेला असतो, सीट फाटलेल्या असतात, पण अजूनही ती ताठ मानेने उभी असते. एखाद्या जुन्या शिलेदारासारखी. ती आजही चालते, जरी तिच्या डिझेलच्या गंधामुळे एखाद्या शहरात तिला परवानगी मिळत नसेल. पण तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही.

भविष्यात कदाचित कमांडर फक्त संग्रहालयात पाहायला मिळेल. तीही ‘एका काळी चालणारी गाडी’ म्हणून ओळखली जाईल. पण तिच्या स्टेअरींगमागे बसलेला ड्रायव्हर, तिच्या गाभाऱ्यात लटकणारा कंडक्टर, आणि तिच्या सीटवर बसलेली गावकरी जनता  यांच्यासाठी ती सदैव जिवंत राहील.

कमांडर ही केवळ गाडी नव्हती, ती होती आपल्या गावाची, आपल्या माणसांची आणि आपल्या आठवणींची सावली. तिचं जाणं म्हणजे एका पिढीचा निरोप. पण तिचा इतिहास, तिचं स्थान आणि तिची भावना कायम आपल्यासोबत राहील यात शंका नाही..!

बंडूकुमार धवणे

संपादक

Leave a comment