Sunday, October 26

चला शिक्षक होऊ या : शिक्षक दिन २०२५ विशेष लेख

चला शिक्षक होऊ या : शिक्षक दिन २०२५ विशेष लेख

५ सप्टेंबर हा दिवस आपल्या भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो कारण हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्वज्ञ व आदर्श शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. डॉ. राधाकृष्णन  हे उत्कृष्ट शिक्षकतज्ञ, तत्वज्ञानी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्वान होते.

ते शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय होते. जेव्हा त्यांच्या काही शिष्यानी व मित्रांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्याची परवानगी मागितली. त्यावर डॉ. राधाकृष्णन यांनी नम्रतेने सांगितले की, ” माझा वाढदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी जर तुम्हाला माझा गौरव करायचाच असेल, तर तो दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करा.” त्या दिवसापासून म्हणजे ५ सप्टेंबर १९६२ पासून भारतात शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा सुरु झाली.

   आजही ५ सप्टेंबर हा दिवस आपल्या  शालेय जीवनातील आठवला तर आपल्याला आपल्या पैकीच सवंगडी शिक्षक, शिक्षिका झालेल्या आठवतात. जो कोणी शिक्षक व्हायचा तो अगदी आपल्या शिक्षक / शिक्षकांची नकल करायचा. हे सर्व काही खूप चांगले वाटायचे. मनाला वेधून ह्यायचे. विद्यार्थी पँट शर्टमध्ये, मुली साडी मध्ये खूप चांगले वाटायचे. काही महाभाग तर चपराशी सुद्धा व्हायचे.

ते शाळेची घंटा वाजवायचे. नोटीस घेऊन यायचे. थोडक्यात काय तर जे आपल्या शाळेच्या परिसरात घडायचे ते सर्व जसेच्या तशी नक्कल करायचे. खूपच भारी वाटायचे. एव्हढेच काय तर लहान मुलं घरी येऊन आपल्या शिक्षक / शिक्षिकेची हुबेहूब नक्कल करायचे. ते फळ्यावर लिहायचे, हातात छडी घ्यायचे. अगदी शिक्षक जसे करतात तसे करायचे. ते स्वतःच बडबड कार्याचे. हे पण बघायला मोहक वाटायचे.

थोडक्यात काय तर विद्यार्थी हे शिक्षकांचे अनुकरण करायचे. ते प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ह्या अनुकरणातून शिकायचे. म्हणजे काय तर जो शिकण्याचा व शिकविण्याचा उद्देश होता तो सफल व्हायचा. म्हणजेच काय तर विद्यार्थी कृतीतून शिक्षण घेत होते, घडत होते आणि इथूनच नेतृवा गुणांची शिकवण मिळायची. सर्वच विद्यार्थी आपल्या शिक्षकाला आदर्श मानायचे. त्यांचे ते रोल मॉडेल असायचे. कोणालाही विचारले की तू भविष्यात काय होणार तर तो हमखास शिक्षक होणार असे सांगायचे.

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

त्याकाळी शिक्षकांना खूप आदर असायचा. तेव्हाचे शिक्षक खूपच आक्रमक असायचे ते रागवत पण होते. शिक्षा पण करत होते. परंतु विद्यार्थ्यांच्या घरच्यांची कधीही ना असायची ते तर म्हणायचे त्याला अजून बदडा. म्हणजे काय तर शिक्षकांवर एव्हढा विश्वास असायचा. शिक्षक जे काही करतील ते आपल्या  मुलांसाठी योग्यच करतील असा पालकांना दृढ विश्वास होता.

हे पण खरे आहे शिक्षणाला महत्व दिले म्हणून आज सर्वजण सुज्ञ झाले आहे. शिक्षणामुळे खूप मोठी क्रांती झाली. आजपण शिक्षणाचे महत्व आहेच. 

शिक्षण हा आपला मूलभूत अधिकार आहे. आपल्या भारत देशाच्या घटनेत १४ वर्षा पर्यंत अपत्यांना शिक्षण देणे पालकांचे कर्तव्य आहे. आज सर्वत्र शिक्षणाला खूप महत्व देत आहेत ही खरोखर चांगली बाब आहे. आपले मूल देशातच प्रगती करत नाही आहेत तर ते विदेशात जाऊन सुद्धा क्रांती करत आहेत.

शिक्षणामुळे सर्वांना सामान संधी मिळत आहे. अगदी गरिबातील गरीब अति दुर्गम भागातील विद्यार्थी सुद्धा जिल्हाधिकारी (आय.ए.एस.) झाला आहे. ही शिक्षणाची ताकद आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अगदी बरोबरच म्हणतात. ” शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.” हे अगदी खरे आहे आणि ते वेळोवेळी आपल्या जीवनात सिद्ध आले आहे ह्याची सर्वांना प्रचिती सुद्धा आली आहे.

आपला भारत देश खूपच महान आहे आणि खरोखर ही हिऱ्यारत्नांची खाण आहे. आपल्या देशाचे ही खूप सुंदरता आहे की जे अगोदर शिकले, ज्ञानी झाले त्यांनी तर शिक्षणाचे महत्व सांगितले मग ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो, डॉ पंजाबराव देशमुख असो. पण जे शिकले नव्हते त्यांनी सुद्धा आपल्या समाज प्रबोधनातून शिक्षणाचे महत्व सांगितले आणि समाजाला पटवून दिले.

मग ते संत गाडगेबाबा असो की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असो. ह्या महान समाज सुधारकांनी शिक्षणाचा प्रचार, प्रसार आपल्या कीर्तनातून, पोवाड्यातून केला. शिक्षणाची खूपच मोठी जनजागृती केली व आज तो काही तळागाळातील वर्ग आज वरती आला आहे, जागृत झाला आहे तो ह्याच महान समाज सुधारकामुळेच होय. या महान समाज सुधारकांना शिक्षणाचे महत्व कळले होते.

शिक्षणाने मानवाची प्रगती होते. ही आपल्या समाजसुधारांनी पटून दिले आहे त्यांनी आपले जीवन आपल्यासाठी खर्ची घातले आहे. वेळप्रसंगी त्यांनी हालअपेष्टा, अपमान सुद्धा सहन केला आहे. ह्याचे ताजे जाते जागते उदाहरण म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आहे. ह्या दाम्पत्यांनी शिक्षणासाठी खूपच मेहनत घेतली आणि त्यामुळे विशेष करून आज जी काही महिलांची प्रगती झाली आहे, उच्च पदावर कार्यरत आहे ती फुले दाम्पत्याची देणं आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तर फक्त दिड दिवस शाळेत गेले आणि त्याची एव्हढी मोठी धनसंपदा आहे. या महान शिक्षण क्रांतिकारकास  शिक्षणाचे महत्व कळले होते. अति दुर्गम ग्रामीण भागात असून विपरीत परिस्थितीत त्यांनी आपली ग्रंथसंपदा वाढविली होती. त्यांचा आदर्श घेऊन आपण सध्याच्या सुस्थित शिक्षणात बरेच यश मिळवू शकतो.

कर्मवीर भाऊराव पाटील यांना सुद्धा शिक्षणाचे महत्व कळले होते त्यांनी सुद्धा गरीब मुलांच्या शिक्षणासाठी शाळा महाविद्यालये उघडून शिक्षणात मोठी क्रांती केली व गरिबांची मुले शिक्षण घेऊन आज मोठं मोठ्या पदांवर कार्यरत आहे. ते केवळ ह्या थोर शिक्षण क्रांतिकारक कर्मवीर भाऊराव पाटलांमुळेच.

देश स्वातंत्र्य झाला तेव्हा आपल्या देशाची जनता मोठ्या प्रमाणात निरक्षर होती आणि आज जी काही उच्च विद्याविभूषित मंडळी दिसत आहे ते केवळ त्यावेळी जी शाळा, महाविद्यालये उघडलीत  त्यामुळेच.

शिक्षण म्हणजे तर गुरु, पालक, मार्गदाता, संस्कार करणारा, पिढी घडविणारा, समाज घडविणारा व एव्हढेच काय तर देश सुद्धा घडविणारा असतो. एव्हढे मोठे स्थान, जबाबदारी ही शिक्षकावर असते. शिक्षक म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व, शिक्षक म्हणजे प्रमाण आणि शिक्षक म्हणजे जबाबदारी आणि शिस्त होय.

शिक्षक  म्हणजे काय तर दुसरे तिसरे काही नसून  शिस्त होय.

ते अगदी बरोबर म्हटले आहे, माणूस हा जन्मापासून तर मृत्यू पर्यंत विद्यार्थीच असतो. तो शिकत असतो. तो मोठ्या पासून शिकतो, तो लहानांपासून सुद्धा शिकतो. एखाद्या आजोबा आपल्या नातवाकडून सुद्धा शिक्षण घेऊन शकतो आणि नातवाचे आजोबा सुद्धा शिक्षक असू शकतात.

आपण आपल्या जीवनाचे शिक्षक असतो. जसा एक शिक्षक विद्यार्थ्याला घडवितो, संस्कार करतो तसे आपण सुद्धा आपल्या जीवनाचे स्वतः शिक्षक असतो. प्रत्येका मध्ये एक शिक्षक दडलेला असतो. हा आपल्यामध्ये सुद्धा दडलेला शिक्षक आपल्याला शिस्त लावत असतो. तो आपल्याला शाळेत जा म्हणत असतो,  अभ्यास कर म्हणत असतो, ग्रंथालयात जाऊन पुस्तक वाच, वर्तमानपत्र वाच, व्यायाम कर असे सांगत असतो.

व्यसन करू नको, रात्रीचे मित्र करू नका, वाईट सवयी लावू नका, एव्हढाच काय तर चांगले सकस संतुलित आहार खा असे सांगत असतो हा आपला आंतरिक शिक्षक कळत न कळत शिस्त लावत असतो. ज्यांचा हा शिक्षक जागरूक त्याचे जीवन सफल, यशस्वी व आदर्श झाले आहे. नाही तर मग पिंजऱ्यातील मास्तर डॉ. श्रीराम लागू हा तमासगिरीच्या मागे जाऊन आपले आयुष्य त्याने बरबाद केले. किती मोठा बोध आपण ह्या पिंजरा चित्रपट मधून घेऊन शकतो.

आज शिक्षक दिना निमित्त संकल्प करूया की आपण स्वतः शिक्षक बनूया. ह्या आंतरिक शिक्षकाला जागरूक करूया. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अतः दिप भव. ज्याचा आंतरिक शिक्षक जागृत त्याचे आयुष्य एकदम उज्वल.  शिक्षक दिनाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा !

Arvind More

अरविंद सं. मोरे, नवीन पनवेल (पूर्व) मो. ९४२३१२५२५१


• नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”
लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

QR 1


Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.