कुंकवाचा धनी…!
पेढी नदीच्या काठावर वसलेलं एक गाव होतं, डोंगर-दऱ्याच्या माथ्यावरुन सूर्यनारायण डोकावत होता, कोंबड्याची बाग ऐकून शेवंता उठली, डोळे पुशीत तिनं चुलीत लाकडं लावली अर्धा कप चहा घेतला, तोवर कमलाचा आवाज आला "शेवंते कुठे आहेस वं! झालं नाही का बाप्पा"...
शेवंतानं झपाट्यानं आपलं कामं उरकवलं.
"हो तुम्ही व्हा समोर, मी येतोच मागूनं"
असं म्हणत शेवंतानं आपली शिदोरी बांधली, अन निंघाली कमलासोबत कामाले.
कमला तिच्या सोबत बोलत होती, पण शेवंताच्या डोक्यात ईचाराचं कावूर माजलं होतं.
"काय वं शेवंते, दोन दिवसांच्या भांड्याचा होका आहे, चालशीन काय वं ?
शेवंताची तंद्री तुटली
हो हो ,माय चालू नाही तं सांगू कोणाले मले थोडं राणीवाणी घरात बसता येते, रातंदिस काम केल्या बिगर तीन-तीन पोरी थोड्याच उजयाच्या राहिल्या.
"बालीच्या बापाले कायी कराले लाव नं, तो काय निरा पसरलाच रायते काय ?"
जाऊ देनं माय!, काय करतं कर्माचे भोग हाये...