अंगण : पूर्वीची जीवनशैली आणि हरवलेली माणुसकीची उब

42OK

अंगण : पूर्वीची जीवनशैली आणि हरवलेली माणुसकीची उब

अंगण सांगे घराची कळा
पूर्वी कितीही छोटी घरे असली तरी त्यांच्यात एक साम्य होते, ते म्हणजे प्रत्येक घराला छोटंसं का होईना पण अंगण असायचं.आता काळाच्या ओघात अंगण नावाचं घर नामशेष होत चाललं आहे.जी काही थोडीफार अंगणे उरली आहेत त्यांनी ही आपापली सीमा कुंपणात बंदिस्त करून घेतली आहे.म्हणजे त्यात मोकळेपणा असा उरलेला नाही.पूर्वी अंगणं सजायची माणसांनी आणि बहरायची प्राजक्ताच्या सड्यांनी.


उन्हाळा सुरू झाला कि वाळवणं करायची लगबग असायची अंगणात.भल्या पहाटे चुलांगण पेटून त्यावर आधन ठेवलं जायचं आणि मग तो चिक हटणं असो नाही तर मग सोऱ्याने कुरडया करायच्या असो. सगळं अंगण आया बायांनी भरून जायचं,कुणाला वेगळं आमंत्रण द्यायची कधीच आवश्यकता वाटत नसायची. अंगणासाठी सीमा ठरलेली नसायची.तशीच ती सीमारेषा माणुसकीसाठी ही नसायची.

रात्रीच्या उकाड्यात तर अंगण हीच हवेशीर जागा असायची झोपायला.त्या वेळी कधीच अंगणात झोपायची लाज वाटत नव्हती.अंगण माणसांना कुशीत सामावून घ्यायचं,दिवसभर दमल्या भागल्या जीवांना जणू काही ते प्रेमाने झोपी लावायचं.घरातला निम्मा पसारा सावरणारं अंगण म्हणजे जणू दुसरं घरच होतं त्यावेळी.त्या पसाऱ्याची कधीच लाज वाटली नाही.

हिवाळ्यात तर अंगण रात्री शेकोटी पेटून त्या भोवती बसणाऱ्या माणसांचा सांगाती व्हायचं.शेकोटी तर उब द्यायची पण त्या पेक्षा जास्त उब अंगणच देत असायचं.कितीही वेळ तिथं बसलं तरी मन मात्र भरायचं नाही.कुणाचं अंगण चांगलं म्हणून जणू काही छुपी स्पर्धाच असावी त्या काळी.म्हणून तर प्रत्येक अंगण गृहिणी स्वतः हातानं निगुतीने सारवून घेणार.म्हणजे अंगणातल्या प्रत्येक भू भागावर त्या घराच्या गृहिणींचा मायेचा हात फिरलेला असणार.मग अशी अंगणे किती प्रेम देत असतील.

43OK


रात्रीच्या वेळी अंगणात झोपून मोकळ्या आकाशातील तारे मोजणे आणि ते पाहणे म्हणजे एक विलक्षण अनुभव.आजीने सांगितलेला सप्तर्षी त्यात शोधून काढायचा खेळही मजेशीर होता बरं का.सुट्टीत आलेली आत्या, मामा, काकांची मुलं अंगणात जेव्हा रात्री आनंदाने लोळायची आणि दिवसभर खेळायची तेव्हा अंगणही लेकुरवाळं होऊन जायचं. पावसाळ्यात हेच अंगण छोटंसं तळं होऊन जायचं आणि त्यात आपल्या मालकीच्या होड्या आपण सोडत असू.अंगणात बांधलेली गाई गुरं यांना ही अंगणाबद्दल जिव्हाळा वाटायचा,आपलेपणा वाटायचा.

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा

अंगण लहानपणी खेळाचे मैदान व्हायचं.तरुणपणात बसायचं ठिकाण व्हायचं आणि वृद्धपणात वेळ घालवण्याचे साधन व्हायचं. बालपण,तारुण्य, म्हातारपण अशा आपल्या सगळ्या अवस्था आपल्या डोळ्यांनी पाहणारा साक्षीदार म्हणजे आपलं अंगण होय.इतकंच काय पण शेवटच्या श्वासानंतर ही विसाव्याची जागा म्हणजे अंगणच होय.घरात जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू व्हायचा तेव्हा घराअगोदर अंगणच दुःखी व्हायचं,त्याची ही रया जायची.

आनंदाच्या क्षणी अंगणही आनंदी व्हायचं, लेकीच्या हळदीसाठी अंगणात मांडव टाकला जायचा आणि अवघं अंगण जणू हळदीने न्हावून निघायचं. अंगणातच जेवणावळी व्हायच्या.अंगणातच स्वयंपाक असायचा. अंगणाचे ही आकार असायचे बरं.काही अगदीच चौकोनी, काही निमुळती,काही गोलाकार तर काही त्रिकोणी.पण अंगण ते अंगणच होत.

आताच्या काळात घरं छोटी होत चालली तिथं अंगणाला जागा कुठं असणार.खरं तर माणसांची मनं छोटी झाल्याचेच हे लक्षण आहे.आता अंगण माणसांनी सजत नाहीत आणि हसण्या खेळण्याचे आवाज ही ऐकू येत नाही.असेल छोटं अंगण तर ते ही चार भिंतीनी बंदिस्त करून टाकलं आहे.शेणा मातीने सारवलेल्या अंगणाने कधीच कुणाला पाय घसरून पडू दिले नाही, पण आत्ताच्या चकचकीत फरशीने मात्र कित्येक जणांना तोंडघशी पाडलंआहे. अशा बंदिस्त अंगणाचा जणू काही श्वास गुदमरतो आहे.

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!


असे अंगण काय आपल्याला मोकळा श्वास देणार.पूर्वी माणसं घरापेक्षा अंगणातच जास्त रमायची.असे करताना त्यांना अजिबात कमीपणा वाटायचा नाही. पण आताच्या फ्लॅट संस्कृतीत घराचे दार उघडं ठेवणं ही अडाणीपणा समजला जातो, तिथं अंगणात बसणे म्हणजे काय समजले जाईल देव जाणे..!

– सुजाता नवनाथ पुरी
अहमदनगर.
8421426337
———————————————————————————-

  • नम्र निवेदन
    “निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”
    लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
    या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
QR 1


गावात अंगण होतं मातीचं, पण आपुलकीचं….

Avatar photo

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.