
अमृतसर एक्स्प्रेसचा थरार : दोन डबे मागे राहिले, प्रवाशांचा जीवघेणा अनुभव
पालघर : रविवार दुपारी डहाणू रोड स्थानकाजवळ मुंबई-अमृतसर एक्स्प्रेसमध्ये घडलेली घटना प्रवाशांसाठी अक्षरशः थरारक ठरली. दुपारी साडेदीडच्या सुमारास ही गाडी डहाणू स्थानक ओलांडून थोड्याच अंतरावर गेली असता अचानक कपलिंग तुटले आणि गाडीचे दोन डबे मागे राहिले. इंजिनासह अठरा डबे वेगाने पुढे धावू लागले. क्षणभर प्रवाशांना काहीच कळेना; गाडी दोन भागांत विभागल्याचे लक्षात आल्यानंतर डब्यांमध्ये आरडाओरड सुरू झाली. भीतीपोटी काही प्रवाशांनी थेट खाली उड्या मारल्या.
सुदैवाने त्या वेळी एक्स्प्रेसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे गाडी काही अंतरावर थांबवण्यात आली. परंतु तोपर्यंत प्रवाशांचा जीव अक्षरशः अडकल्यासारखा झाला होता. काही क्षणांसाठी डहाणू परिसरात रेल्वे अपघात झाल्याचीच चर्चा रंगली.
या घटनेचा फटका पश्चिम रेल्वेच्या डाउन मार्गावरील संपूर्ण वाहतुकीला बसला. लोकलपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांपर्यंत रांगा लागल्या आणि तब्बल पाऊण तास रेल्वे वाहतूक ठप्प झाली. प्रवाशांना ताटकळत थांबावे लागले. उन्हाचा तडाखा, प्रवासातील गैरसोय आणि अपघाताची भीती – या तिहेरी संकटामुळे प्रवासी अक्षरशः हैराण झाले.
दरम्यान, कपलिंग तुटल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि तांत्रिक पथक घटनास्थळी धावले. जवळपास अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर डबे पुन्हा जोडण्यात आले. त्यानंतर अमृतसर एक्स्प्रेस प्रवाशांना घेऊन पुढे रवाना झाली.
या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीती व नाराजी पसरली आहे. “आम्ही रेल्वेत प्रवास करताना सुरक्षित आहोत की नाही?” असा प्रश्न प्रवाशांनी विचारला. रेल्वे प्रशासनाने भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने खबरदारीचे उपाय करावेत, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
अमृतसर एक्स्प्रेस डबे सोडून पळाली