
अमर्त्य सेन हे जागतिक कीर्तीचे मानवतावादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ आहेत.त्यांचा जन्म सन : १९३३ सालातील नोव्हेंबर महिन्याच्या तीन तारखेला झाला. आज दि.३ नोव्हेंबर २०२५ ला असलेल्या त्यांच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि अभिष्ठचिंतन॥
नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना ‘अमर्त्य’ अर्थात अमर हे नाव दिले होते. अमर्त्य सेन यांचे माध्यमिक शिक्षण ढाक्का येथील सेंट ग्रेगरी हायस्कूलमध्ये झाले आणि नंतर त्यांनी विश्वभारती आणि कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून शिक्षण घेतले.सन : १९५३ मध्ये त्यांनी कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून अर्थशास्त्रात बी.ए. पदवी मिळवली. उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले आणि केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजमधून सन : १९५९ मध्ये त्यांनी एम.ए.आणि पी.एच.डी. पदव्या प्राप्त केल्या.अवघ्या २३ व्या वर्षी सेन जादवपूर विद्यापीठ कोलकाता येथे प्राध्यापक होते .नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले आहे.त्यापैकी प्रमुख विद्यापीठे अशी आहेत . जादवपूर विद्यापीठ (Jadavpur University) – कोलकाता, भारत (१९५५-१९५८),दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स/दिल्ली विद्यापीठ (Delhi School of Economics/Delhi University) – भारत (१९६३-१९७१),लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (London School of Economics) – इंग्लंड (१९७१-१९७७), ऑक्सफर्ड विद्यापीठ (Oxford University) – इंग्लंड (१९७७-१९८८),हार्व्हर्ड विद्यापीठ (Harvard University) – अमेरिका (१९८८-१९९८, आणि २००४ पासून ‘लॅमाँट युनिव्हर्सिटी प्रोफेसर’ .ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज (Trinity College, Cambridge) – इंग्लंड (मास्टर ऑफ ट्रिनिटी कॉलेज, (१९९८-२००४)त्यांनी याशिवाय एम.आय.टी. (MIT), स्टॅनफोर्ड, बर्कले आणि कॉर्नेल यांसारख्या विद्यापीठांमध्ये अतिथी प्राध्यापक म्हणूनही अध्यापन केले आहे.
अर्थशास्त्राबरोबरच त्यांनी तत्त्वज्ञान विषयाचाही सखोल अभ्यास केला.गरिबी, आरोग्य, शिक्षण,मानवी विकास आणि एकूणच मानवी कल्याण याभोवती त्यांचे कार्य केंद्रित आहे. त्यांच्या ‘कल्याणकारी अर्थशास्त्र’ (Welfare Economics) आणि ‘सामाजिक पर्याय सिद्धांतातील’ (Social Choice Theory) योगदानासाठी त्यांना १९९८ सालचा अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले होते.त्यांनी समाजातील दारिद्र्य आणि कल्याणाचे मोजमाप करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देशांक (Indices) निश्चित केले. सन : १९८१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘Poverty and Famines: An Essay on Entitlement and Deprivation’ या ग्रंथात त्यांनी दुष्काळ केवळ अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे होत नसून अन्नवाटपाच्या यंत्रणेतील समन्वयाच्या अभावाने होतो, असे प्रतिपादन केले.त्यांनी १९९० मध्ये ‘युनायटेड नेशन्स ह्युमन इंडेक्स’ (United Nations Human Index) या प्रणालीच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले. सन : १९९८ ते २००४ या काळात ते केंब्रिज येथील ‘मास्टर ऑफ ट्रिनिटी कॉलेज’ या पदावर काम करणारे पहिले भारतीय होते.
‘द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन’
(The Argumentative Indian) आणि ‘डेव्हलपमेंट ॲज फ्रीडम’ (Development as Freedom) हे त्यांचे काही गाजलेले ग्रंथ आहेत.भारतातील नालंदा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी स्थापन केलेल्या मार्गदर्शन समूहाचे ते पहिले अध्यक्ष होते. त्यांनी अमेरिकेतील हार्व्हर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयांचे प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे.२०१२ मध्ये अमेरिकेने त्यांना नॅशनल ह्यूमॅनिटी मेडल देऊन सन्मानित केले, हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले बिगर-अमेरिकन होते.त्यांचे विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी विकास आणि सामाजिक न्याय यावर प्रभाव टाकत आहेत.सेन यांचे कार्य केवळ आर्थिक नव्हे, तर नैतिक आणि तत्त्वज्ञानात्मक आहे, ज्यामुळे त्यांना जागतिक अर्थशास्त्रात आदराचे स्थान आहे. त्यांनी दारिद्र्य, आरोग्य, शिक्षण, मानवी विकास आणि एकूणच मानवी कल्याणाच्या विषयांवर सखोल अभ्यास आणि संशोधन केले. विशेषतः दुष्काळ आणि गरिबीच्या कारणांवर त्यांनी केलेले संशोधन,ज्यामुळे दुष्काळ प्रतिबंधासाठी व्यावहारिक उपाय विकसित झाले, हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.नोबेल पारितोषिक जिंकणारे अमर्त्य सेन हे पहिले आशियाई अर्थशास्त्रज्ञ आहेत.या पुरस्काराव्यतिरिक्त त्यांना सन : १९९९ मध्ये भारतरत्न (भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार) या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
भारतरत्न आणि नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांचे कार्य प्रामुख्याने कल्याणकारी अर्थशास्त्र आणि सामाजिक न्याय यावर केंद्रित आहे. त्यांचे योगदान केवळ आर्थिक सिद्धांतांपुरते मर्यादित नसून, त्यांनी केलेल्या कामाचा सामाजिक सेवेच्या दृष्टीने मोठा परिणाम झाला आहे.त्यांच्या सामाजिक सेवेतील मुख्य योगदान फार मोठे आहेत .
अमर्त्य सेन यांनी अकाल (दुष्काळ) केवळ अन्नधान्याच्या कमतरतेमुळे नव्हे, तर लोकांच्या ‘हक्कांच्या’ (Entitlements) ऱ्हासामुळे येतात हे दाखवून दिले. त्यांच्या या संशोधनाने सरकारे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना दुष्काळाला तोंड देण्यासाठीच्या धोरणांवर पुनर्विचार करण्यास लावले. त्यांनी दारिद्र्य मोजण्यासाठी नवीन पद्धती विकसित केल्या, ज्यामुळे गरिबांच्या स्थितीबद्दल अधिक उपयुक्त माहिती मिळण्यास मदत झाली.सेन यांनी मांडले की, मानवी विकास आणि कल्याणाचे मूल्यांकन केवळ उत्पन्नावर आधारित नसावे, तर लोकांच्या’क्षमते’ (Capabilities) वर आधारित असावे. याचा अर्थ लोकांना काय करण्याची आणि काय बनण्याची स्वातंत्र्य आणि संधी आहे. शिक्षण, आरोग्य, चांगले पोषण आणि राजकीय स्वातंत्र्य यांसारख्या मूलभूत मानवी क्षमतांच्या विस्तारावर त्यांनी भर दिला, कारण या क्षमतांमुळे व्यक्तींना स्वतःच्या जीवनाची निवड करणे शक्य होते.त्यांनी सामाजिक निवड सिद्धांतामध्ये (Social Choice Theory) महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि न्याय, समानता व वैयक्तिक अधिकारांचे प्रश्न हाताळले.त्यांनी लैंगिक असमानतेवर (Gender Inequality) आवाज उठवला आणि काही गरीब देशांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रिया कमी का आहेत याचे स्पष्टीकरण दिले, ज्याला ‘मिस्सिं विमेन’ (Missing Women) म्हणतात .
अमर्त्य सेन यांच्या मते, शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य सेवांमधील सुधारणा हे आर्थिक विकासासाठी अत्यावश्यक सामाजिक सुधारणा आहेत. शिक्षणाच्या कमतरतेमुळे दारिद्र्य वाढते, असे त्यांचे मत होते.
अमर्त्य सेन यांनी त्यांच्या संशोधनाद्वारे आणि तत्त्वज्ञानाद्वारे शासकीय धोरणे आणि जागतिक विकासाच्या संकल्पना अशा प्रकारे बदलल्या की, ज्यामध्ये गरीब, वंचित आणि दुर्बळ घटकांचे कल्याण केंद्रस्थानी आले. त्यांच्या कार्यामुळे जगाला मानवी विकास आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून पाहण्याची नवी दिशा मिळाली.
ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार (अर्थशास्त्र) व भारतरत्न या पुरस्कारांसह नॅशनल ह्यूमॅनिटी मेडल (National Humanities Medal), अमेरिका (२०१२),जर्मन बुक ट्रेडचा शांतता पुरस्कार (Peace Prize of the German Book Trade) (२०२०)प्राप्त झालेला आहे.
नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन हे सध्या हार्वर्ड विद्यापीठात (Harvard University) थॉमस डब्ल्यू. लॅमॉन्ट युनिव्हर्सिटी प्रोफेसर आणि अर्थशास्त्र व तत्त्वज्ञान विषयाचे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.ते हार्वर्ड सोसायटी ऑफ फेलोजचे (Harvard Society of Fellows) वरिष्ठ सदस्य (Senior Fellow) देखील आहेत.पूर्वी त्यांनी केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजचे ‘मास्टर'( १९९८-२००४) आणि नालंदा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणूनही (२०१२ पासून) काम केले आहे.अशा या श्रेष्ठ व ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना त्यांच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि अभिष्ठचिंतन ॥
अमर्त्यजी सेन । हार्दिक शुभेच्छा ।
मनस्वी सदिच्छा । जन्मदिनी ॥
-प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
समता गौरव पुरस्कार प्राप्त,साहित्यिक
अमरावती :८०८७७४८६०९.
● हे वाचा – आयुष्याच्या वाटेवर,अनुभव संपन्न कविता संग्रह