Monday, October 27

“…आणि रामा कलेक्टर झाला” – संघर्षातून शिखरावर जाण्याची प्रेरणादायक कहाणी

“…आणि रामा कलेक्टर झाला” – संघर्षातून शिखरावर जाण्याची प्रेरणादायक कहाणी

अशोक पवार लिखित ‘…आणि रामा कलेक्टर झाला ‘ ही कादंबरी नुकतीच वाचून झाली. या कादंबरीला आयकर उपायुक्त श्री विष्णूजी औटी साहेब यांची प्रस्तावना लाभलेली असून ज्येष्ठ साहित्यिक व आमचे गुरुवर्य संजयजी पठाडे सर यांची पाठराखणरुपी शुभेच्छा लाभलेली आहे. कादंबरीचे बोलके मुखपृष्ठ हे अरविंदजी शेलार यांनी तयार केलेले आहे .

ही कादंबरी इतकी वाचनीय आहे की, कादंबरीचे वाचन चालू असताना कधी-कधी डुल्याचा संवाद वाचताना बऱ्याच वेळा हसायला येते. परंतु पुढच्याच क्षणात वाचता-वाचता अपोआप डोळ्यातून अचानक कधी पाणी वाहू लागते हेही कळत नाही. कादंबरी वाचताना वाचन मध्येच बंद करावे असे कधीही वाटतं नाही. माझी तर ऐवढी मोठी कांदबरी मन लावून पुर्णपणे वाचन केलेली पहिलीच कांदबरी आहे.

सतत दुष्काळाशी सामना करत असलेल्या गावातील अतिशय गरीब कुटुंबातील एक तरुण, शिक्षण अर्धवट सोडून पोटासाठी शेजारच्या गावातील एका हमालासोबत पोट भरण्यासाठी मुंबईत जातो. ज्याच्या सोबत गेलेला असतो मुळात त्याचेच राहण्याचे ठिकाण हे फुटपाथ असते. मित्रासोबत जाऊन जिद्द, मेहनत, आणि चिकाटीच्या जोरावर दिवसभर हमाली करून रात्री शाळेत जाऊन शिकतो आणि थेट कलेक्टर पदावर जाऊन पोहचतो. त्या रामाचा हमालापासून कलेक्टर पदापर्यंत पोहोचण्यासाठी वाट्याला आलेला संघर्ष, रामाने पचवलेला अपमान, जवळच्या काही लोकांनी दिलेला त्रास. या सर्व संकटांवर मात करून खेडेगावातील रामा कलेक्टर बनतो. या प्रवासात त्याला गणासारखा गरीब गोडाऊनमधल्या कामगारानेसुध्दा ‘कोशिस करु..!’ असे दिलेले अस्वासनही त्याला बरीच हिम्मत देऊन जाते, तसेच रामासारखी इतरही काही मुलं गरिबीशी संघर्ष करत शिकत असतात त्यातील राहुल व सुहाससारखे जिवाभावाचे मित्र रामाला मिळतात त्यामुळे त्यांच्या कडूनही काही अभ्यासासंदर्भात माहितीही रामाला मिळत जाते.

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा

आजकाल सर्वत्र केवळ पैसा कमविण्यासाठी उभ्या केलेल्या शिक्षण संस्था दिसत असताना गरीबांच्या मुलांना कामधंदा करून रात्री का होईना शिकता यावं म्हणून उभ्या केलेल्या निस्वार्थी लोकांच्याही संस्था पोटतिडकीने काम करत आहेत हेसुद्धा लेखकाला या कादंबरीमधून सांगायचे असावे असे मला वाटते. परीस्थितीने गरीब असणारे काही विद्यार्थी की, जे रात्रशाळेत शिकून आपले ध्येय पूर्ण करुन मोठ्या पदावर काम करत असतात त्यातील काहीजण रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना मोठ्या तळमळीने विना मोबदला स्वखुशीने येऊन मार्गदर्शन करतात. तसेच विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदतही करतात. निस्वार्थपणे दुसऱ्यांसाठी काहीतरी करणारे आजही समाजात अनेक लोक आहेत. जसे की, अभिजीत सरांसारखे नेहमी संपर्कात राहून बहुमोल मार्गदर्शन करत राहतात.

तो कोण कुठला दुसऱ्या जिल्ह्यातील सातारचा मुकादम स्वतः शिकलेला नसूनही गरीबांच्या तसेच कोणतीही जात-पात न पाहता मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी मदत करतो. दिवसभर हातगाडी ओढत ओढत दमल्यावर रात्री फुटपाथवर पेपर टाकून अभ्यास करत झोपण्यापेक्षा आपला मित्र रंगाच्या ईमानदारीमुळे गोडाऊनमध्ये एका जागेवर अंगमेहनत सोडून हिशोबाचे काम लागल्यामुळे आणि राहण्याची सोय झाल्याने रामाच्या अभ्यासाला मदत होते. दोघांच्याही कामाच्या हुशारीमुळे जुबिनभाई व नवीनभाई दोघेही खूप खूश होतात व दिवसभर काम करून रामा रात्रशाळेत जातो हे गोडाऊन मालकाच्या मुलीला कळल्यावर ती मुलगी रुशी पप्पाला म्हणते की, असे ॲडमिशन घेणारे भरपूर असतात पण सगळेच कुठं शेवटपर्यंत शिकतात या वाक्यामुळे रामा दुखावला गेला असला तरी तिच मालकाची मुलगी रुशी UPSC ची पुस्तके आणायला रामाला प्रेमाने स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन जाते आणि तेथे UPSC ची तयारी करत असलेल्या तिच्या मैत्रिणीशी जेव्हा गाठ पडते तेव्हा रामाची ओळख करून देताना रुशी सांगते की, हे माझ्या पप्पांच्या मित्राचा मुलगा आहे. हाही UPSC चा अभ्यास करत आहे. या वाक्याने रामाचे मन खूप सुखावते. पुढे रामाला अभ्यासात व्यत्यय नको म्हणून रुशी रामाचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत अमेरिकेला जाते.

आपल्या गोडाऊनमधील काम करणारा रामा जाम हुशारीच्या जोरावर नक्की मोठा साहेब होणार या आशेने व आपली मुलगी रुशी आणि याचा काही तसा काय नसेल ना ? जर असेल तर या आशेने रामा आजारी पडू नये म्हणून दुसऱ्या चांगल्या खाणावळमधून पदर खर्चाने काळजी पोटी चालू केलेला डबा म्हणा किंवा दिल्लीला जाण्यासाठी पदरचे पैसे देणे म्हणा.. यातून मात्र जुबिनभाईमध्ये असणाऱ्या माणुसकीचे दर्शन घडते. ऐन परिक्षेच्या काळात गावावरुन रामाला आलेल्या फोनमुळे रामाचा नाराजीचा, उतरलेला चेहरा पाहून रुशीने गूपचूप सदर घटनेची माहिती रंगाकडून घेऊन परीस्थिती पहाता त्याचे अभ्यासावरुन लक्ष उडू नये म्हणून काळजीपोटी व रामाचा स्वाभिमान दुखावला जाणार नाही याची काळजी घेत तीने रामाचा भाऊ डुल्याच्या पायाच्या ऑपरेशनसाठी दवाखान्याचा खर्च रामाला माहिती न होता रंगाच्या बँकखात्यावर पाठविणे म्हणा यातून रुशीतील उदारवादी गुणांचे दर्शन घडते.

अमेरिकेत गेलेली रुशी परत आल्यानंतर रामाला मुलाखतीमध्ये कमी गुण मिळाल्यानंतर आपल्यामुळेच तर हे झाले नसेल ना म्हणून पुन्हा वरवर फोन करणे किंवा गोडाऊनला जाणे टाळते या सर्व गोष्टी लेखकाने खूपच रंजक पद्धतीने मांडलेल्या आहेत.

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

रुशी व रामा यांच्यातील अबोल प्रेमाचे दर्शन वाचकाला खिळवून ठेवणारे आहे. रुशी अमेरिकेत शिक्षण पूर्ण करुन आली म्हणून तिने मैत्रिणींसाठी ठेवलेल्या पार्टीसाठी रामाला प्रेमाने घरी बोलावते. परतुं मैत्रिणींकडून रामाला अपमानास्पद मिळालेल्या वागणुकीमुळे रामा नाराज होऊन निघून गेल्यानंतर तिसुद्धा खूप दुःखी होते. हा प्रसंग लेखकाने खूपच रंजक पद्धतीने मांडलेला आहे.

रामाचा मित्र रंगा हा जरी शिकलेला नसला तरी तो रामाला शिक्षणासाठी सारखा प्रेरित करीत राहतो. नाहीतर आयुष्यभर हमाली करावी लागेल याचीही आठवण करून देत राहतो. कामाचा थकवा निघून जावा म्हणून रंगा जरी थोडीफार दारू घेत असला तरी रामाला नेहमी या सवयीपासून तो दूर ठेवत होता आणि दूरच राहण्याचा सल्लाही देत होता. रामाही त्याने सांगितलेल्या गोष्टी गांभीर्याने घेत होता आणि UPSC च्या ध्येयापासून आपले मन दुसरीकडे वळू देत नव्हता. भले त्याच्यावर कुणाचे भरमसाठ प्रेम जडले असो, गावाकडची जत्रा असो, कुणाचं लगीन असो की जागरण गोंधळ या गोष्टींकडे लक्ष न देता किंवा घरची गरीबी, आई-वडील, आजी आणि लहान भावंडं याचं प्रेम, त्यांची काळजी यातून क्षणात बाहेर येऊन भिंतीवरील आपले अंतिम ध्येय असलेला बोर्ड वाचून पुन्हा जोरात अभ्यासाला लागत होता..

रामाला कलेक्टर पदापर्यंत पोहचण्यासाठी अनेक निस्वार्थी लोकांनी मदत केली परंतु गरीबीमुळे कुठलाही खाजगी क्लास न करता रामा पहील्याच प्रयत्नात मुलाखतीपर्यंत जाऊन पोहोचतो. रामाची हुशारी पाहून विलासराव गायकवाड हे आपल्या मुलीशी स्वतः ओळख करून देतात. अन् तिही स्वार्थापोटी कायमस्वरूपी जवळ जाण्याचा प्रयत्न करते व तिचे वडीलसुध्दा या गोष्टीसाठी तिला एक प्रकारे मदतच करतात. परंतू रामाला तोंडी परीक्षेत अपयश आल्यानंतर ते रामाशी पुन्हा कधीही संपर्क करत नाही. लोक मानसाला नाही तर त्याच्या पद, प्रतिष्ठा, पैसा यालाच सन्मान देतात या मानवी वृत्तीवर लेखकाने प्रकाश टाकलेला दिसतो.

लेखकाने कादंबरीमध्ये वापरलेली भाषा ती मला माझ्या गावातील वाटते. रामाच्या गावाकडील भैरवनाथ जत्रेसाठी अंगणात बांधलेला बोकोड, गटेवाडीच्या पाहुण्याला दिलेलं आवात्न, देवाची पालखी, रघुवीर खेडकर यांचा तमाशा, शोभेची दारू, बर्र्बाट, जेवनाअगोदर लागणारं औषध, राजदूत गाडी, मोबाईल, राज्या, बबन, डुल्या, रंगा ही पात्रे काल्पनिक असली तरी ती पात्रं मला माझ्या गावातील आहेत असेच वाटते. कारण माझं गावही त्याच परिस्थितीत उभं आहे. जी लोकं मला परिस्थितीमुळे काही करता आले नाही किंवा शिकता आले नाही किंवा जे शिक्षण अर्धवट सोडणार आहेत असे म्हणतात त्यांनी ही कादंबरी नक्की वाचायला हवी. त्यांना ही कादंबरी पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल असे मला वाटते.

‘…आणि रामा कलेक्टर झाला’ ही कादंबरी साहित्य क्षेत्रात एकदम लवकरच उंचीवर स्वतःचे अढळ स्थान निर्माण करेल हा विश्वास वाटतो. लेखक अशोक किसन पवार लिखित ‘…आणि रामा कलेक्टर झाला’ या साहित्य‌कृतीस माझ्याकडून मनापासून, मनापर्यंत लाख-लाख शुभेच्छा आणि सदिच्छा…!

21 1

अशोक दशरथ गायकवाड
(पानोली)
९०४९३८६५२८


पुस्तक प्रकार- कादंबरी
शीर्षक- आणि रामा कलेक्टर झाला
लेखक- अशोक पवार
प्रकाशन- पारनेर साहित्य साधना
पृष्ठसंख्या- ३०८
किंमत- ३५० रु. मात्र


आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

·    नम्र निवेदन

“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह  पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”

लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.

या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.

-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

QR 1

————


Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.