भारतीय ग्रामीण शेतकरी जीवनशैलीचा रथ- बैलगाडी

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

भारतीय ग्रामीण शेतकरी जीवनशैलीचा रथ- बैलगाडी

(नाशिक जिल्ह्यातील कादवा शिवार दिवाळी अंक २०२३ च्या मुखपृष्ठावर टाकलेला प्रकाश)

सालाबादप्रमाणे यंदाची दिवाळी फराळाची रेलचेल घेऊन आली. स्वयंपाकघरातील गृहिणींच्या हाताची चव फराळातून दिसून येत आहे… जून्या जाणत्या स्वयंपाकीण काकूंकडून नव्याने लग्न होऊन आलेल्या नववधू दिवाळीला फराळ शिकून घेतांना दिसल्या तर काही नववधूंनी माहेरात घेतलेलं अस्सल पाककलेचे कौशल्य सासरी अगदी सराईतपणे फराळ करून घरच्या आपल्या माणसांना खायला लावून त्यांच्या जिभेवर माहेराच्या फराळाची चव कशी रेंगाळत राहिल याची दक्षता घेतांना दिसून आल्या…..

दिवाळी सण तसा ग्रामीण जीवनशैलीचा एक महत्त्वाचा सण मानला जातो…. वर्षभर शेतीमध्ये काबाडकष्ट करून आपल्या मुलाबाळांना, सुनांना, जावयांना वर्षाअखेरीस गोडधोड खायला घालून, रंगबेरंगी वस्त्राने शरीर आणि मन प्रसन्न करण्यासाठी हा दिवाळीसण साजरा करायची प्रथा पुर्वजांपासून चालत आली आहे.. काही शहरी भागातील धनसंपन्न घरातून रोजच दिवाळी साजरी केली जाते मात्र आमच्या गावखेड्यातून पारंपरिक पद्धतीने दिवाळी वर्षातून एकदाच साजरी करून वर्षभराचे कष्ट, परिश्रम या दिवाळी सणाला आनंद देत असते.

जशी ग्रामीण खेडेगावातील दिवाळी साजरी होत असते तशीच दिवाळी साजरी होते ती साहित्यिकांची. विविध प्रकारचे साहित्य लेखन करून साहित्यिक आपल्या ज्ञानाचा दिवा दिवाळी अंकाच्या माध्यमातून तेवत ठेवत असतात. कथा, कविता, समीक्षण, वैचारिक देवाणघेवाण, रसग्रहण, व्यंगचित्र अशा विविध साहित्याचा सुग्रास फराळ दिवाळी अंकातून वाचकाला मिळत असतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी अंकांनी उच्चांक गाठला आहे, हजारोंच्या संख्येने या वर्षी दिवाळी अंकाचे स्वागत झाले.. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्हीही जीवनशैलीवर आधारित दिवाळी अंक साहित्यिक, वाचकांच्या मेजवानीला हजर झाले आहे.. दररोज विविध विषयांवरील दिवाळी अंक वाचकांचे लक्ष वेधून घेत आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून हजारो सालापासून शेती व्यवसायाकडे बघीतले जाते, पुर्वी अग्रस्थानी शेती होती, दुय्यम दर्जावर व्यापार आणि तिस-या स्थानावर नोकरी होती. जगाच्या नकाशावर शेतीला महत्व होते, आजही आहे आणि उद्याही राहिल हे त्रिकाल सत्य आहे मात्र ब्रिटनमध्ये १७८० आणि १८५० घ्या दशकात औद्योगिक क्रांतीची सुरूवात झाली, उद्योग अर्थव्यवस्थाचे जे रूपांतर झाले त्याला ‘प्रथम औद्योगिक क्रांतिच्या नावानं ओळखले जाऊ लागले. त्याचे दुरगामी परिणाम दिसायला लागले. जसजशी औद्योगिकीकरणाने व्यवसायात बदल होऊ लागला तसतसे मानवी जीवनशैलीत , राहणीमानात बदल घडत गेले. त्याचा परिणाम शेती व्यवसायावर होऊ लागला.

• पारंपारिक शेती व्यवसायाला औद्योगिकीकरणाची लस लागली आणि शेतीत अमुलाग्र बदल होऊ लागले. वस्तूंच्या उत्पादनासाठी यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेल्याने देशाच्या अर्थकारणात ज्या कालात औद्योगिकीकरणाला जोराची चालना मिळाली त्या देशाच्या इतिहासातील औद्योगिक क्रांती घडली , भारताला त्यासाठी विसाव्या शतकाची वाट पहावी लागली. भारतात टाटा समूहाने पहिल्यांदा औद्योगिक क्रांतीसाठी पाउल उचलले. औद्योगिक क्रांतीमुळे शेतीच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर होवू लागल्याने श्रमाची बचत झाली. अन्नधान्याचे उत्पादन वाढले. मनुष्यबळाचा वापर कमी होऊ लागला आणि तेथे यंत्राने जागा घेतली. दळणवळणाची साधने बदलली. पुर्वी शेतीसाठी दळणवळणाची सुविधा म्हणून बैलगाडीचा वापर होता त्याची जागा आता यांत्रिक ट्रॅक्टरने घेतली. जी कामे बैलांकडून करून घेतली जात होती ती सर्व कामे नांगरणी, पेरणी, कोळपणी, काढणी सर्व या यंत्राने होऊ लागले. मानवी श्रम कमी झाले पण त्या श्रमात जो आपलेपणा होता, जी शेतीविषयी तळमळ होती ती कमी झाली पर्यायाने शेतीतील पारंपारिक पद्धतीला खीळ बसून हळूहळू पारंपारिक शेती औजारे बदलत गेली मात्र काही प्रमाणात बैलगाडी आजही ग्रामीण भागात आपल्याला पहायला मिळते. बैलगाडी ही ग्रामीण जीवनाचा रथ आहे..

हळूहळू नामशेषाच्या मार्गावर असलेला ग्रामीण दळणवळणातील बैलगाडी हा रथ यावर्षी नाशिक येथील “कादवा शिवार” यांच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर साकारण्यात आला आहे. प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून हे मुखपृष्ठ साकारले असून संपादक तथा मालक मा विजयकुमार मिठे यांनी या दिवाळी अंकांची खुमासदार, खुसखुशीत वाचकांना मेजवानी दिली आहे.

नुकताच प्रकाशित झालेला “कादवा शिवार” यांचा सतत सतरा वर्ष अविरत मेहनत घेऊन कादवा शिवाराने याही वर्षी आपली परंपरा जपली आहे. हा दिवाळी अंक साहित्यिकांच्या नजरेत भरला आहे, याचे मुख्य कारण म्हणजे या अंकाचे मुखपृष्ठ. या मुखपृष्ठाचा बारकाईने अभ्यास केला तर खूप काही अर्थ या मुखपृष्ठात दडलेले आहे असे आपल्याला दिसून येते.

या मुखपृष्ठात खूप काही अर्थ दडलेले आहेत याचा वरवर पाहिले तर एक बैलगाडी दिसत आहे, गाडीला मोकळा कासरा, बैल नसलेली गाडी, शिवळा, धु-या, आरे, असे चित्र दिसत आहे याचा सुक्ष्म निरिक्षण केले तर अतिशय गर्भित अर्थ निघतो…

कादवा शिवार या मुखपृष्ठाचा अर्थ असा आहे की, यांत्रिक युगात ग्रामीण शेती व्यवसायाचे दळणवळणाच्या साधनाचे जतन केले पाहिजे पुर्वी बाराबलूतेदार पद्धत अमलात होती, यातून आर्थिक उलाढाल नसायची मात्र आसामी असायची म्हणजेच केलेल्या कामाच्या मोबदल्यात वर्षाला धान्य द्यायचे. या बारा बलुतेदाराचे प्रतिक म्हणजे बारा आ-या असलेले चाक जे एकजुटीने एकमेकांच्या सुखदुःखात गुंतलेले आहे. या बारा आ-यांना एका नाईमध्ये जोडलेले आहे ही नाई म्हणजे एक प्रपंच आहे, याला आपण एक गावही म्हणू. या बारा बलुतेदारांकडे विविध कला अवगत होत्या, जसे की, काष्टकार, लोहकर्मी, चर्मकार, सुवर्णकार, शिंपी, कुंभार अशा विविध कलांच्या कलाकारांचे प्रतिक म्हणून या गाडीला सहा पाठे जोडलेले आहेत. हे सहा पाठे आणि बारा आरे यांना एकत्रित घेऊन एकजूट रहावी वर भक्कम लोखंडी धाव (कडे) टाकले आहे. ही धाव बारा बलुतेदारांना आणि त्यांच्या कलेला कुठेही धक्का न लागू देता ईच्छीत स्थळी वाहून नेण्याचे महत्वाचे काम करत आहे हा अर्थ येथे अभिप्रेत होतो… या बाराबलूतेदारांनी‌ नेहमी आपल्या व्यवसायात, आपल्या कलेत सतत मग्न रहावे म्हणून “चाक” हे सतत चालत राहते, गतिमान राहते, ज्यामुळे प्रगती होते या अर्थाने येथे मुखपृष्ठचित्रकाराने अतिशय कल्पकतेने दाखवले आहे.

या बैलगाडीला जो कासरा लावला आहे तो मोकळाच गाडीवर टाकला आहे याचा अर्थ या बारा बलुतेदारांची जीवनशैली मुक्त स्वरूपाची आहे, कुठेही बंदिस्त नाही, कुणाच्याही बंधनात बांधलेली नाही. तसेच या गाडीला बैल जोडलेले नाही याचा अर्थ असा की ही गाडी म्हणजेच हे गाव कुणी एकट्याच्या किंवा दोघांच्या मनावर चालत नाही, त्याला कोणी हाकणारा आणि ओढणारा असा कोणी ठराविक नाही, हा सर्व बारा बलूतेदारांचा आहे त्यामुळे गाडीला बैल जुंपलेले नाहीत असा अर्थ अभिप्रेत होतो. या बैलगाडीला लांब धुऱ्या आहेत यांचा अर्थ असा की, गाव (गाडी) ओढणारा म्हणजेच बारा बलुतेदार आणि मागे गाडीत बसणारे म्हणजेच समाज यांना एकाच धुऱ्याने जोडून ठेवले आहे. समाजातील घटक देखील या गावगाड्यावर तेव्हढाच हक्क बजावू शकतात जेवढे बाराबलुतेदार हक्क बजावू शकतात इतका गहन अर्थ यातून मला जाणवला आहे.

हल्ली हवामानाच्या बदलामुळे, पर्जन्यमानाचा अनियमितपणा, शेतीमालाला मिळत नसलेला हमीभाव, तसेच वाढती लोकसंख्या, प्रदूषण यामुळे भारतीय शेती व्यवसाय लयास चालला आहे. बरीच पारंपारिक शेती औजारे आधुनिकीकरणामुळे त्यांच्यात बदल होत आहेत आणि जुने सारे नामशेष होत चालले आहे. या नामशेष होत चाललेल्या साधनांचे, कलांचे , बारा बलुतेदारांचे संगोपन, जतन करण्याचे संदेश यातून दिले आहेत. अशा अर्थपूर्ण दिवाळी अंकाला मुर्त रूप देण्यासाठी मा संपादक विजयकुमार मिठे, सहसंपादक सूनील जगताप, उपसंपादक योगेश गायकवाड, साहेबराव गायकवाड, आनंदा गायकवाड, सोमनाथ पवार आदींनी मेहनत घेऊन भारतीय ग्रामीण शेतकरी जीवनशैलीचा रथ- बैलगाडी हे मुखपृष्ठ मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांनी अतिशय अर्थपूर्ण आणि समर्पक आणि आकर्षक साकारले आहे. वाचक आणि साहित्यिक यांनी मनापासून स्वागत केले आहे.

“कादवा शिवार”च्या संपादकीय मंडळास पुढील वर्षाच्या दिवाळी अंकासाठी लाख लाख शुभेच्छा..!

मुखपृष्ठ परीक्षण –
– प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क – ७७७३९२५०००(तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)

0 thoughts on “भारतीय ग्रामीण शेतकरी जीवनशैलीचा रथ- बैलगाडी”

  1. सर

    धन्यवाद

    आपण साहित्यिकांसाठी उभारलेल्या चळवळीतून लिहित्या हाताला बळ देताय ही बाब कौतुकास्पद आहे.

    मुखपृष्ठ परिक्षण प्रकाशित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

Leave a comment