Friday, January 16

मृत्यूनंतर मृतदेह कडक का होतो?

माणूस मेल्यानंतर सुरुवातीला त्याचे स्नायू शिथिल होतात व शरीर सैल पडते. ही अवस्था ३ ते ४ तास राहते. त्यानंतर मात्र शरीरात काही बदल घडून येतात. स्नायूंतील बदलांमुळे मृतदेह कडक होतो.
 
स्नायूंमध्ये मायोसीन आणि ॲक्टिन नावाचे तंतू असतात, त्यांच्या आकुंचन प्रसरणामुळेच स्नायूंचे आकुंचन प्रसरण होत असते. आकुंचन पावल्यानंतर स्नायू कडक होतात तर प्रसरणामुळे शिथिल होतात. मृत्यूनंतर शरीरात, स्नायूंमध्ये ऊर्जेची निर्मिती होऊ शकत नाही. त्यामुळे मायोसिन व ॲक्टीन हे तंतू एक दुसऱ्यात मिसळून त्यांचे निर्जलीकरण होऊन एक कडक पदार्थ तयार होतो. साहजिकच या तंतूचे आकुंचन प्रसरण थांबते व स्नायू व पर्यायाने मृतदेह कडक होतो. या प्रक्रियेला इंग्रजीत रायगर माॅर्टीस असे म्हणतात.
 
भारतात मृतदेह कडक होण्याची प्रक्रिया मरणानंतर २ ते ३ तासांनी सुरू होते. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला सुमारे १२ तास लागतात. त्यानंतर १२ तासांत शरीर परत शिथील होते. मायोसिन व ॲक्टीनचे विघटन झाल्यामुळे स्नायूंचा कडकपणा जातो.
 
रायगर माॅर्टिसमुळे मृत्यूच्या वेळेसंबंधी अंदाज बांधता येतो. दुसरे म्हणजे मरणाच्या वेळी व्यक्तीची काय अवस्था होती, हेही कळू शकते. असे हे रायगर माॅर्टिस म्हणजेच मृतदेहांचे कडक होणे. गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी याद्वारे जणू मृतदेहही मदत करतो !
 
संकलन : दिपक तरवडे, नाशिक
प्रविण सरवदे, कराड
(सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान आणि दिनविशेष मधून)

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.

Leave a Reply