Tuesday, May 5

अशी पाखरे येती.!

टेरेसवर बसून पक्ष्यांकडे पाहणारी व्यक्ती, निसर्गातून जीवनातील सकारात्मक विचार शिकण्याचा क्षण

अशी पाखरे येती! | प्रतिक्रिया vs प्रतिसाद | सकारात्मक विचारांची प्रेरणादायी कथा

सायंकाळी टेरेसवर असेच स्वतःसोबत व थोडे निसर्गाशीही हितगुज करताना माझ्यातील विद्यार्थी जागा झाला. समोर झाडावर काही पक्षी दाटीवाटीने आपापसात काहीतरी बोलत होते. त्यातला एक पक्षी मात्र उदास होऊन काहीतरी दुःख चघळत उगाचच फांदीवर हेलकावे खात होता. मला कळेना त्याला नेमके कसले दुःख असावे! इतर पक्षी मात्र भरभरून जगणे अनुभवत होते. त्या दुःखी पक्ष्याचे काय बिनसले होते हे जाणून घ्यावे वाटले.


खरेतर मी त्यांच्यासोबत बोलू शकत नव्हते नाहीतर एव्हाना विचारलेही असते. फक्त शांतपणे निरीक्षण करण्याखेरीज पर्याय नव्हता.
काही वेळाने लक्षात आले की त्या एकट्या पक्ष्याजवळ हे इतर पक्षी जाऊ लागले, त्याला आपल्यात घेऊ लागले की तो चिडल्यासारखा करायचा. त्याला त्यांच्या स्वच्छंदी जगण्याचा जणू त्रास होत असावा. एकतर तो स्वतःही त्यांच्यात मिसळत नव्हता नि ते सर्व त्याच्याजवळ आले की त्याला प्रचंड त्रास होत होता! चूक कोणाची? त्या एकट्या पक्ष्याची की उरलेल्या थव्याची? तुमचे उत्तर काहीही असले तरी माझे बोट मात्र एकटे बसून दुःखं पांघरून बसण्याचा जणू चंग बांधलेल्या त्या उदास पक्ष्याकडेच असेल.

21


कधी कधी आपणही त्या उदास पक्ष्यासारखेच तर करतो. त्याच्याप्रमाणेच असलेल्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याऐवजी प्रतिक्रिया देत बसतो नि दुःख चघळत बसतो.
आपल्या वागण्यात फक्त प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देण्याचा दृष्टीकोण असेल ना तर कोणाचीच हिंमत होणार नाही आपल्याला दुःखी करण्याची. त्या उदास पक्ष्याने इतर पक्षांच्या गोंधळात एखादे सुंदर संगीत, एखादे मंत्रमुग्ध करणारे गाणेच शोधले असते तर त्याला नसता झाला कसला त्रास आणि तोही आनंदाने सामील झाला असता थव्यात! आजूबाजूची परिस्थिती किती बिकट आहे, माझ्या आयुष्यात फक्त अपयश, दुःखं आहे असे आपण नेहमीच म्हणतो पण त्यात दडलेला एखादा तरी आनंदाचा क्षण ओळखता आला आहे का आपल्याला? नाही येत आपल्याला असं ओळखता! कारण आपण अगोदरच प्रतिसादाऐवजी प्रतिक्रिया देऊन मोकळे झालेलो असतो. एखादेवेळी खूप एकटेपणा आला तर आपण या मिळणाऱ्या एकांतात स्वतःशीच गप्पा मारायला काय हरकत आहे? नसावीच! कारण धकाधकीच्या जगण्यात कितीसा वेळ देतो स्वतःला? या मग मिळणाऱ्या वेळेत दिलखुलास गप्पा टप्पा करायला काहीच हरकत नसते. उलट किती दिवसांनी अशी संधी मिळाली आहे हा एक वेगळा आनंद! हो की नाही?

काही दिवसांपूर्वी कॉलेजमधून येताना अचानकच गाडी नखरे दाखवायला लागली आणि काही केल्या चालू होईना. मी जाम चिडायला हवे होते पण गाडी मला आवडणाऱ्या हिरवळीने नटलेल्या डोंगराजवळच बंद झाली होती. भारी वाटले खरेतर! मस्त गार हवा अंगावर मोरपीस फिरवून जात होती. नुकत्याच पडून गेलेल्या पावसाच्या सरींमुळे ओल्या मातीचा सुगंध वेड लावत होता. गाडी बंद पडली तेव्हाच फिटरला कॉल केलेला असल्यामुळे तो बिचारा धावपळीतच आला. आणि खरंतर आता गाडी चालू होईल नि आपण घरी जाऊ असा आनंद मला वाटायला हवा होता, पण माझ्या व निसर्गाच्या मध्ये येण्याचं काम त्याने केले असेच वाटले मला! गाडी अचानक बंद पडणे ही खरेच त्रासदायक गोष्ट आहे पण तिथे मी प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला म्हणूनच माझा तो काही क्षणांचा काळ अविस्मरणीय झाला.व खूपच सुखावून गेला.

25

प्रत्येकवेळी प्रतिक्रिया देण्याची खरेच गरज नसते. हे एकदा समजले की तुम्हालाच समजेल की आजवर आपण विनाकारण स्वतःला किती दुःखी करत आलो. कितीतरी समोर आलेले आनंदाचे क्षण स्वतःहून दूर सारले अगदी त्या उदास बसलेल्या पक्षासारखेच! परिस्थिती कशीही असली ना तरी तिच्यात सकारत्मकतेला हुडकून काढण्याची नशा प्रत्येकात असावी. कोण आपल्याला काय बोलले, का बोलले, असेच का बोलले, तसेच का बोलले, माझ्यासोबत हा असाच का वागला, ती तशी वागली…. असे अनेक’ का ‘ तुमच्यातील जगण्याचा खरा आनंद नाहीसा करत असतात. तसे बघितले तर आपण फार फार काही समजूत करून घेतो. पण कशानेच काही फरक पडत नसतो. यातून नाहक आनंदाचे क्षण आपण हाताने दूर सारत असतो.ओंजळीत आलेल्या सुवर्ण क्षणांची माती करीत असतो.
जो आनंद फक्त आपल्यासाठीच असतो त्यावर पद्धतशीर विरजण टाकतो आणि रडत असतो नशिबाला तर कधी आजूबाजूच्या परिस्थितीला दोष देत!

कधीतरी हे थांबायला हवे तेव्हाच सापडू शकते खरे जगण्याची, जिवंत असण्याची संजीवनी. खरंतर आपल्याशी कसेही वागणारी प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी आनंदाचीच दारं खुली करत असतात. फक्त त्यावेळी आपल्याला प्रतिक्रियेऐवजी प्रतिसाद देता यायला हवा इतकेच!

डॉ. मंगल कचरू सांगळे

कवयित्री, लेखिका व पत्रकार
कोषाध्यक्ष मसाप, सिन्नर,
मराठी व राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख के. व्ही. एन. नाईक कॉलेज सिन्नर
संपर्क -sangalem704@gmail.com

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.