
नांदेडमध्ये ५२ एकरांवर ‘हिंद-दी-चादर’चा भव्य ऐतिहासिक सोहळा | ८–१० लाख भाविकांसाठी प्रशासन सज्ज

- नांदेडमध्ये साकारणार ५२ एकरांवर ‘हिंद-दी-चादर’चा भव्य ऐतिहासिक सोहळा !
- ८ ते १० लाख भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती
लातूर, : शीख धर्माचे नववे गुरु ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड नगरी एका ऐतिहासिक पर्वाची साक्षीदार होणार आहे. राज्य शासनाच्या वतीने २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी आयोजित या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ५२ एकरांच्या विशाल परिसरात गुरुद्वाराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज दिली.
५२ एकरांवर अध्यात्मिक नगरी या सोहळ्यासाठी प्रशासनाने ५२ एकर जागेवर भव्य मंडप उभारला आहे. भाविकांच्या सोयीसाठी ८ महालंगर, अत्याधुनिक प्रदर्शन केंद्र (Exhibition Center), साडेतीनशेहून अधिक स्टॉल्स आणि आरोग्य शिबिरे उभारण्यात येत आहेत. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला आहे. दिग्गजांची मांदियाळी या सोहळ्यास देशाचे गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह अनेक मंत्री व संत-महात्मे उपस्थित राहणार आहेत.
सेवाभावी संस्थांना आवाहन देशभरातून सुमारे ८ ते १० लाख भाविक या सोहळ्यासाठी नांदेडमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. या भाविकांच्या सेवेसाठी ज्या स्वयंसेवी संस्थांना (NGOs) सेवा द्यायची आहे किंवा स्टॉल्स लावायचे आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही कर्डिले यांनी केले आहे. प्रशासनातर्फे त्यांना जागा उपलब्ध करून दिली जाईल.
या ऐतिहासिक सोहळ्यात सर्व नांदेडकरांनी आणि भाविकांनी सहकुटुंब सहभागी होऊन या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.