
‘लॉंगमार्चची युगयात्रा’ ग्रंथाचे 24 जानेवारीला बडनेऱ्यात प्रकाशन
अमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाच्या ऐतिहासिक संघर्षाचे सखोल दस्तऐवजीकरण करणारा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आंदोलन : एक क्रांतीपर्व” हा ग्रंथ प्रा. प्रकाश विश्वनाथ बोरकर यांनी लिहिला असून, गौरव प्रकाशन अमरावती यांनी तो प्रकाशित केला आहे. या ग्रंथाचा भव्य प्रकाशन सोहळा शनिवार, दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता बडनेरा येथील सार्वजनिक कपिल मंडळ सभागृह, अशोक नगर, नवी वस्ती येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुष्यमान इ. मो. नारनवरे (सुप्रसिद्ध साहित्यिक, नागपूर) राहणार असून, ग्रंथाचे प्रकाशन आयुष्यमान ताराचंद्र खांडेकर (फुले–आंबेडकर चळवळीचे भाष्यकार) यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आयुष्यमान विजयकुमार चौरपगार (राज्य संघटक, भारतीय बौद्ध महासभा, महाराष्ट्र राज्य), प्रा. डॉ. रवींद्र मुंद्रे (सिनेट सदस्य, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती) तसेच आयुष्यमान दिलीपभाऊ एडतकर (संपादक, दैनिक विदर्भ मतदार, अमरावती) उपस्थित राहणार आहेत.
विशेष अतिथी म्हणून आयुष्यमान इंजि. विवेक जनार्दन मवाडे (नांदेड, मराठवाडा), आयुष्यमान कृष्णाजी बोरकर (नागपूर) आणि आयुष्यमती चंदाताई दामू इंगळे-तायडे (मुंबई) यांची उपस्थिती लाभणार आहे.
या ग्रंथप्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय, बडनेरा यांच्या वतीने करण्यात आले असून, आयुष्यमान व्ही. एस. मेश्राम (सचिव) व आयुष्यमती पुष्पा बोरकर (कोषाध्यक्ष) यांच्यासह सर्व कार्यकारी संचालक, बडनेरा हे संयोजन पाहत आहेत.
मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील ऐतिहासिक लाँगमार्च, त्यामागील सामाजिक व सांस्कृतिक भूमिका, बहुजन चळवळीचा संघर्ष आणि त्याचे दूरगामी परिणाम यांचा अभ्यासपूर्ण वेध घेणारा हा ग्रंथ संशोधक, विद्यार्थी, अभ्यासक व सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. या ऐतिहासिक ग्रंथप्रकाशन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.