
मचानवरून हरभऱ्याच्या वावरात; हरवलेल्या ग्रामीण दिवसांची आठवण.!
आमच्या वेळेस शिदोरी बांधून पहाटे गेलेल्या बैलजोड्या सयसंध्याकाय होईपर्यंत घराकडे परतत नसायच्या. रस्त्यानं बैलगाडी घेऊन घरी येईस्तोवर दिवेलागण होऊन साजरा अंधार पडायचा. आम्ही बैलबंडीत गूडूप अंधारात बसलेलो. पण बैल मात्र सरावानं बरोबर घरालोक चालत चालत घरापर्यंत सुखरूप आम्हाले सोडायची. सुगीच्या दिवसात जंगलात जिकडे तिकडे कामासाठी माणसांची वर्दळही वर्दळ दिसायची.पशुपक्षीही भरपूर प्रमाणात सोबतीला असायचे.
हरणाचे कळपच्या कळपं समोरून धावायचे.दुपारच्या सामसूम वातावरणात भोरी नावाचा पक्षी ‘पोट दुखते’ म्हणजे घुगुच घु असा स्वर, आवाज काढून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायचा.टिटवीचा आवाज,कावळयाची कावकाव शांत आसमंतात नखोरा ओढायचा.एखादया दूरच्या शेतातल्या कडूलिंबाच्या झाडावर माकडं या फांदीवरून तर त्या फांदीवर मसत्या करायची.हूपहूप करत मोठयानं उड्या मारत शेतातील शांत वातावरण दणाणून सोडायची. घरच्या असलेल्या वावरात जवळपास दोन तीन एकर कापूस रहायचा.तर दोन चार एकर हरभरा् पेरल्या जायचा.तोही कोरडवाहू बिना पाण्याचा. हरभरा पेरणीसाठी पूर्वी तिफणी सारख्या हल्ल्या रहायच्या. त्यामुळे आठ आठ दिवस थंडीच्या दिवसात शेतातच मुक्काम रहायचा. एक माणूस दररोज चार पाच कष्टकरी माणसांच्या घरून शिदोऱ्या आणून देणं व पाण्याचा पुरवठा करणं याकरीताच असायचा शेतात अंधार पडल्यावर झोपायची मजा यायची. थंडगार वातावरणात धुऱ्यावर पेटवलेल्या काडी कचऱ्याच्या शेकोटीची उब व गप्पा गोष्टीची मैफिल व सातऱ्या अंगावर घेऊन शेतातच मुक्काम असायचा.
आता तर ट्रॅक्टर आले व काम अधिक सोपं झालं.पेरल्या नंतर बिना पाण्याचा हरभरा खाण्याचीही वेगळीच मजा होती.एक तं खारपाण पट्ट्यातील जमिनीत खारवा भरपूर असल्याने हा हरभरा खातांना सुरस चव तोंडाला पाणी सोडायची. हरभरा पेरणी झाल्यावर तर भरपूर काम असायचं. त्यासाठी शिदोरी व मोठी प्रकाश टाकणारी बॅटरी व एखादी जाडजूड काठी सोबत असायची. जंगली वातावरणात डुकरांचा भरपूर त्रास असायचा.पेरलेला हरभरा रात्री उकरून तो फस्त करण्यात ही जंगली जात पटाईत असायची. शेतकऱ्यांच भरपूर नुकसान व्हायचं म्हणून हरभऱ्याच्या वावरात शेतातल्या बाभळीच्या किंवा कडुलिंबाच्या झाडावर सर्वात वरच्या भागाच ज्याला आमच्या बोली भाषेत शेंडा म्हणतात अशा जागी मावच्या म्हणजे मचान करून त्यावर मस्त नरम पोतं टाकून बसता येईल व झोपता येईल अशी बैठक असायची. मस्त आजूबाजूला थंडगार वाऱ्याची झुळूक सुटायची. व आम्ही आजी, आजोबा सोबत रखवाली करायचो.व वरतेच केलेल्या त्या खोपडीत सोबत आणलेली शिदोरी भाकर,भाजी खायचो.

आमच्या भागातील खारपाण पट्ट्यातील हरभऱ्याले मार्केटातही चांगला भाव राहायचा.दूरून दूरून बेपारी लोकं खरेदी करण्यासाठी यायचे.हीच मजा ओलिताखाली असलेल्या हरभऱ्यात तुम्हाले दिसायची नाही.एक तं पाणी देल्यानं त्याचा सारा खार धुतल्या जाऊन तो बेचव होऊन जायचा.हा आमचा अनुभव होता. दिवाईच्या तेवढ्यात सीतादही कापसाच्या वावरात झाल्यावर कापसाच्या वावरात कापुसही चांगलाच फुटलेला असायचा.बायाबापडया रोजंदारीवर कापुस येचायच्या. घरच्या बैलबंडीत बसून शेतात यायच्या. बैल धूऱ्यावर चरायले सोडून आम्ही हरभऱ्याच्या वावरात कडब्यापासून बनवलेल्या खोपडीत पाण्याच्या थंडगार कॅना ठेवून. मस्त कायाभोर मातीवर आंग टाकून मस्त थंड सावलीत ताणून दयायचो. खोपडीतून जागोजागी पडलेलं किलकिलं कोवळं उन आंगाले मस्त वाटायचं.संग आणलेल्या झोऱ्यातून शिदोरी व एक शाळेचं अभ्यासासाठी बालभारती मराठीचं पुस्तकं असायचं.एकच कविता मोठमोठ्यानं चार दोन वावराईत आवाज घुमीन व लोकांना ऐकू येईल अशा भसाड्या आवाजात मोठमोठ्यानं अतीहुशार असल्याच्या आविर्भावात आम्ही म्हणायचो. म्हणता म्हणता थकलो की घरच्या लोकांसोबत दुपारची भाकरी खायचो. त्यामधे घरून आणलेल्या मिठ, भाकरी,संग कुस्करून केलेला हरभऱ्याच्या घोयना, तुरीच्या शेंगा,बारकी पाट्यातून तोडून आणलेली लालचुटुक टमाटी, जोरदार लागायची. पंचपवकानालेही लाजवील असं ते जेवण रहायचं.
कष्टाच्या कामामुळे थकलेल्या पोटी पटापटा फडक्यात बांधून आणलेल्या चार दोन भाकरी लवकरच संपून जायच्या. त्याच भाकरीवर एका कोपऱ्यात रायत्त्याची फोड,निंबर वरणाचा साजरा घट्ट गोया,कच्च छोटं वांग, बरबटीच्या,गवाराच्या शेंगा तोंडी लावाले सोबत असायच्या. येलाचे तोडलेलं नरमलच वायकं खाणं म्हणजे पोट थंडगार व्हायचं , वरतून संग आणलेल्या बोंदरी बांधलेल्या कॅनीतलं निम्मं पाणी घशाखाली रिचवायचं. हालगो मालगो झाल्यावर दिवस मावळतीला लागायचा. कापसाच्या गाठोडे बांधायची धावाधाव व्हायची. आई शेंगां,भेंडाईच्या पाट्यात फिरून यायची. रातच्या भाजीसाठी कोवळ्या गवाराच्या शेंगा भरण्यात तोडायची.बाप हुरड्याची गावरान ज्वारीची कणसं हातातील विळयानं कचाकचा कापायचा. रातच्याला ढोंरासाठी कडब्याची एक पेंडी किंवा गवताचा मोठा भारा कचाकचा ईव्यानं कापून बैलगाड्यात टाकून घ्यायचा. शेताच्या बांधावर काडी कचरा,धसकटं पेटवून द्यायचा.साऱ्या शेताले परत एकदा चक्कर टाकायचा. एखादं कपड्या, चिधंकापासून तयार केलेलं बुजगावणं रोवायचा.म्हणजे रात्री कोणीतरी शेतात आहे ही भेवाळणी लोकांना व जंगली जनावरांना असायची.तोपर्यंत अंधाराची धूसर गडद छाया पडलेली असायची.

घरचा गवतावर बांधलेला बैल खुराना माती उकरून मोठमोठ्यानं घराकडे चला म्हणून हंबरायचा. त्याची नित्याची भाषा आम्हाले चांगली समजायची.बैलबंडी जुंपून चारदोन बाया, गाठोडे घेऊन ही वरात रस्त्यावर धुरळा उडवत निघायची.आता ही मजा फक्त खेड्यातच बघायला मिळते. तेव्हा आपसुकच हे शिक्षण घरादारातूनच मुलांना मिळायचं त्यामुळे त्यांचा चौफेर विकास व्हायचा.त्यामुळे आजच्या शहरातल्या सारखे मुलांना व्यक्तीमत्व विकासाचे वर्ग बिरग लावायचं काम सहसा पडत नसायचं.पुस्तकातील धढेही मजेशीर व मनाला बोध देणारे असायचे. ग्रामीण भागातील परिस्थितीचा अंदाज घेऊनच हा पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम बनवलेला आहे की काय? असं वाटायचा तेव्हा आम्हाले लहानपणी ‘भाकरीची गोष्ट ‘ नावाचा एक धडा पुस्तकात होता.आजोबासोबत नातू वावरात आला असता.भुक लागल्याने त्यांनी संग आणलेली शिदोरी खाल्ली.नातवांनं भाकरीचा तुकडा उष्टा टाकल्याने आजोबांनी नातवाला शेतातच भाकर अशी उष्टी टाकू नये.ती कमावण्यासाठी शेतकऱ्यांले शेतात खुप कष्ट, मेहनत करावी लागते.असा आशय त्या गोष्टीचा असल्याने आम्हाले ती गोष्ट खुप आवडायची.हाच प्रभाव अजूनही आमच्या मनावर घर करून आहे. आज घराघरात याच शिक्षणाची खरी गरज आहे. दोन पैसे गाठीला राहीली पाहिजे म्हणून खेड्यापाड्यातील माणसं बाजाराला पायदळ चार कोस पायी जायची. म्हणून तर त्यांची तब्येतही ठणठणीत होती.
आता तर अशा गोष्टी पुस्तकातून हद्दपार होऊन त्याची जागा चपातीनं अथवा ढोकळ्यानं घेतलेली दिसते.याचा परिणाम म्हणजे श्रमप्रतिष्ठा हे जे मूल्य होते. त्याची किंमत आपोआपच कमी झाली. आम्ही आईवडीलांना सुट्टीच्या शनीवारी,रवीवारी काहीतरी कामासाठी मदत करू लागायचो हल्ली तर आजकालच्या मुलांना तेही नाही.आजोबाचा गावही दुर्मिळ व दुरापास्त झाला की काय अशी भिती मनाला वाटत राहते. त्यागाची भावना महत्त्वाची होती. कोणतीही कुरबूर न करता एकटी बाई दहा लोकांचा स्वयंपाक करायची. आलेल्या गेलेल्यांना जीव लाऊन प्रेमानं चारदोन घास जेऊ घालायची. चहापाणी विच्यारायची. काही कमी जास्त झालं किंवा भांडयाला भांडं लागलं म्हणजे घरातली समजूतदार एकमेकांना सांभाळून व समजाऊन घेणारी माणसं होती.शेतीवाडीची संकल्पना हल्ली बदलली. कमी पैशात जास्त उत्पादन त्यामुळे सोयाबीन,तूर फक्त एवढीच पिकं उरली. परिस्थीती बदलल्या त्यामुळेच हल्ली नवनवीन पिकांच्या शोधामुळं जंगलातील माणसांचा राबताही कमी झाला. छोट्याशा जमीनीच्या तुकड्यात तीळ, शेंगां भेंडाईचा ‘पाटा’ ही आपोआपच कमी झाला म्हटल्यापेक्षा जवळजवळ हद्दपारच झाला.असं म्हणायला काहीच हरकत नाही.

विजय जयसिंगपुरे
अमरावती.
भ्रमणध्वनी
९८५०४४७६१९
● हे वाचा –Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र