Wednesday, November 12

सटवाई.!

"सटवाई कविता – शेतकऱ्याच्या नशिबावर आधारित आबासाहेब कडू यांची मराठी कविता"

सटवाई.!

तू करत जाय मरमर,गायत जाय घाम

गुठली तुया हिस्याले,भलतेच खाते आम।।

पायटीच उठूनसन्या करतं झोपीचं खोबरं

नशीबात हरदमच हाये तुया वखरं

सूर्यदेव ओकते आग तरी काढतं तू काकरं

डोयामंधी घिवूनसन्या बायको अन लेकरं….

राबराब राबून राज्या कितीक करशीन काम।।

गुठली तुया हिस्याले,भलतेच खाते आम।।

सोयाबुन पेर,तूर पेर, नाईतं पेर सरकी

कव्हातरी पडते काय तुया हाती दिडकी?

बजारात जाताखेपी दलाल तूले हेरतेत

भाव कसा पाडता यिन याचाच ईचार करते

दाम तुया हिस्याचे थेच घिवून पयतेत

भोयाभाया सभाव तुया तू करतं राम राम।।

गुठली तुया हिस्याले,भलतेच खाते आम।।

मार्केटात माल तुया उघळ्यावर रायते

फिकर तुया मालाची कोन कव्हा करते?

अन्न-धान्य पिकवासाठी कसतं तू कंबर

फ्यासीलिटीत मातरं तुयाच ढांग नंबर

उपाशी मरतं तव्हाच दिसंन तेयले धाम।।

गुठली तुया हिस्याले,भलतेच खाते आम।।

निसर्गई घेते खेटे सावकाराचाई धाक

सपनं तुये हरसाल होवून रायले खाक

बि-ब्याने घ्या साठी सदाचीच दमछाक

जीनगानीत तुयावाल्या काहून पळते झाक

कईसा भेटंन तुयावाल्या कष्टाले रे दाम।।

गुठली तुया हिस्याले,भलतेच खाते आम।।

अन्नधान्यानं देश तुवा कायले केला समृध्द?

तुयाच उरावर बसून हे तोळते लचके गिध्द

तुयामाथंच कारखानदार बनले सारे गब्बर

तुया डोकस्यावर मातरं कवलाचंच छप्पर

असं वाटते तेयच्यासाठीच गायतं तू घाम।।

गुठली तुया हिस्याले,भलतेच खाते आम।।

कृषीपरधान देश आपला हाये तुले मान

पन सरकारी बाबूच  तुयावर होते वरतान

सरकारी योजनेचा थे बट्ट्याबोळ करते

 हक्काच्या कोंबळ्या हे चोट्टेच घिवून पयते

सटवाईच्या भईस्यावर रावू नोको ठाम।।

गुठली तुया हिस्याले,भलतेच खाते आम।।

हातोमेयीनं कास्तकारी आता करा लागंन तूले

तव्हाच कुठं थांबन राज्या व्हाचे तुये येले

हक्कासाठी रस्त्यावर तूले या लागंन हरदम

व्येवस्थेच्या नाकात तुले आना लागंन दम

बेपाऱ्याईच्या येसनाचा कसा लागंन लगाम।।

गुठली तुया हिस्याले,भलतेच खाते आम।।

आबासाहेब कडू

-आबासाहेब कडू

सटवाई=सटवी,सटी,षष्टीदेवता(जन्मत:च मस्तकावर भविष्यलेखन करणारी देवता)

कसा=कसने(जमीन)

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.