Thursday, November 13

डॉ बाबासाहेबांचा शाळप्रवेश: शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराचा दिवस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळाप्रवेश दिवस – शिक्षण व परिवर्तनाचा ऐतिहासिक क्षण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळाप्रवेशाचा ७ नोव्हेंबर हा दिवस राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा केला  जातो.डॉ. lबाबासाहेब आंबेडकर यांचा शाळाप्रवेश दिवस एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे. त्यांच्या शाळाप्रवेशाने ते स्वतः प्रज्ञावंत झालेच आणि कोट्यवधीदलितांचे-वंचितांचे व  समस्त भारतीयांचे उद्धारकर्तेही झाले.बाबासाहेबांनी लिहिलेल्या  संविधानामुळे भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मानवी मूल्ये रूजू शकली. त्यामुळेच त्यांच्या शाळा प्रवेशाचा दिवस ही महत्त्वाची घटना आहे.

७ नोव्हेंबर १९०० या दिवशी बाबासाहेबांनी प्रतापसिंग हायस्कूल, राजवाडा चौक, सातारा येथील शाळेत प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांचे नाव भिवा होते. या शाळेच्या रजिस्टरला ‘१९१४’ या क्रमांकासमोर आजही त्यांची स्वाक्षरी असून, हा ऐतिहासिक दस्तावेज शाळा प्रशासनाने जपून ठेवला आहे.

अस्पृश्यांसाठी शिक्षणासाठी आंबेडकरांनी दिलेले योगदान हे त्यांच्या महान कामगिरीपैकी एक मानले जाते. याशिवाय, त्यांनी नेहमीच प्रत्येकासाठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि स्वतःला आयुष्यभर विद्यार्थी मानले. यामुळे, २००३ मध्ये भारतीय पत्रकार अरुण जावळे यांनी आंबेडकरांच्या शाळा प्रवेशाचा वर्धापन दिन साजरा करण्याची कल्पना मांडली. त्यानंतर, जावळे यांनी ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे वारंवार सादर केला.

२०१७ मध्ये, त्यांच्या प्रस्तावाला सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पाठिंबा दिला. महाराष्ट्र सरकारने २७ ऑक्टोबर २०१७ रोजी विद्यार्थी दिनाची स्थापना केली आणि दहा दिवसांनी पहिला अधिकृत उत्सव साजरा करण्यात आला. या सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारचा शिक्षण विभाग कविता वाचन, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा तसेच आंबेडकरांच्या वारशाला समर्पित विविध कार्यक्रमांचे आयोजन करतो.

महाराष्ट्रातील विद्यार्थी दिन हा भारतातील एकमेव सुट्टी नाही जी डॉ.आंबेडकरांना समर्पित आहे. त्यांचा वाढदिवस, डॉ आंबेडकर जयंती , हा अनेक भारतीय राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी आहे. जरी हा संघराज्यीय सुट्टी नसला तरी,डॉ आंबेडकरांच्या योगदानाची आणि कामगिरीची ओळख पटविण्यासाठी ७ नोव्हेंबर  हा दिवस देशभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो.

डॉ. बाबासाहेबांच्या मते विद्यार्थी हे समाजातील बदलाचे आणि प्रगतीचे एक महत्त्वाचे साधन आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाद्वारे आत्मविश्वास, संघटन आणि संघर्ष करण्याची वृत्ती निर्माण करण्यावर भर दिला. त्यांच्या मते, शिक्षणाच्या माध्यमातूनच समाजातील विषमतेचे निर्मूलन करता येते आणि म्हणूनच विद्यार्थ्यांनी शिक्षण हे ‘वाघिणीचे दूध’ आहे हे लक्षात घेऊन कठोर अभ्यास केला पाहिजे .

शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्यांची बुद्धिमत्ता विकसित होते. विद्यार्थ्यांचा विकास हा समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे असे बाबासाहेब मानत होते. विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्यास प्रवृत्त करणे हे शिक्षणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे, असे त्यांचे मत होते.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे विचार

“शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा.”: हा त्यांचा विद्यार्थ्यांना दिलेला एक महत्त्वाचा मंत्र आहे, ज्यामध्ये शिक्षणासोबतच एकत्र येऊन हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा आहे. इतिहास विसरू नका: स्वतःचा इतिहास आणि त्यासाठी झालेल्या संघर्षाची जाणीव विद्यार्थ्यांना असायला हवी, असे ते म्हणाले. स्वतःवर विश्वास ठेवा: विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतेवर आणि कर्मावर विश्वास ठेवून ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांना वाटत असे. दर्जेदार शिक्षण: प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक शिक्षणाची गुणवत्ता उत्कृष्ट असावी, यावर त्यांनी भर दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणवंचित दलित समाजाच्या शिक्षणासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून दलित समाजाला जे शिक्षणाचे दान दिले ते जेवढे क्रांतिकारी आहे, तेवढेच मागासवर्गीयांच्या शिक्षणासंदर्भात बाबासाहेबांनी जे चिंतन केले तेही तितकेच मूलगामी स्वरूपाचे आहे. ज्ञानाअभावी व्यक्ती ‌आणि समाजाचे नुकसान जसे होते, तसेच एखादी व्यक्ती वा समूहाला शिक्षण नाकारणे म्हणजे माणूस म्हणून त्याचे अस्तित्व नाकारून त्याच्या क्षमता मारून टाकणे होय; अशी बाबासाहेबांची शिक्षणविषयक धारणा होती. मिलिंद महाविद्यालयाच्या शिलान्यास प्रकरणी बोलताना बाबासाहेब म्हणूनच म्हणतात, ‘हिंदू समाजाच्या अगदी खालच्या थरातून आल्यामुळे शिक्षणाचे महत्त्व किती आहे हे मी जाणतो. खालच्या समाजाची उन्नती करण्याचा प्रश्न आर्थिक असल्याचे मानण्यात येते. पण हे चूक आहे. कारण हिंदुस्तानातील दलित समाजाची उन्नती करणे म्हणजे त्यांच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय करून पूर्वीप्रमाणे त्यांना उच्चवर्गाची सेवा करण्यास भाग पाडणे नव्हे. खालच्या वर्गाची प्रगती मारून त्यांना दुसऱ्याचे गुलाम व्हावे लागत असल्यामुळे त्यांच्यात निर्माण होणारा न्यूनगंड नाहीसा करणे, हे खरे शिक्षणाचे ध्येय आहे. आमच्या सर्व सामाजिक दुखण्यावर उच्चशिक्षण हेच एकमेव औषध आहे.’ तात्पर्य बाबासाहेबांना उच्चशिक्षणाद्वारे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मानवी मूल्ये स्वीकारलेला एक स्वाभिमानी आधुनिक समाज निर्माण करायचा होता. बाबासाहेबांच्या शैक्षणिक चळवळीचा हाच खरा मूलाधार होता.

आजच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेबांची विचार आत्मसात करून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भविष्याची वाटचाल करायला पाहिजे.मात्र आज विद्यार्थी भरकटलेले दिसून येतात. खरं तर आजच्या विद्यार्थ्याला असंख्य शैक्षणिक साधने आहेत. या शैक्षणिक साधनांचा वापर करून विद्यार्थी प्रज्ञावंत बनू शकतात.शिक्षणाच्या विविध संधी आणि इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. असे असतानाही ‘डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन आलंय’ असे शब्द आपल्या कानावर पडतात. काही लोक नकारात्मकतेच्या गर्तेत अडकून आयुष्य संपवण्याचाही विचार करतात. मात्र २१ व्या शतकात एवढी साधने उपलब्ध असताना आपल्या मनात असे विचार येत असतील तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा शिक्षण घेतले तेव्हाची काय परिस्थिती असेल याचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख केवळ भारतात नव्हे तर जगाच्या पाठीवर आहे. भारतासारख्या जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या देशाला जगातील सर्वात मोठी आणि आदर्श राज्यघटना ज्या महामानवाने दिली त्या महामानवाच्या आयुष्यात अगदी सुरुवातीपासून अनेक संकटे आ वासून उभी होती मात्र त्या प्रत्येक संकटांना तोंड देत, त्यावर मात करत बाबासाहेब आंबेडकर शिकले. केवळ शिक्षणचं घेतले नाही तर  आपल्या सबंध आयुष्यात त्यांनी देशासाठी प्रचंड मोठे योगदान दिले. आणि म्हणूनच त्यांचे व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी आणि सर्वच समाज घटकांसाठी प्रेरणादायी आहे.ो

Sudhir Agrawal

प्रा. डॉ. सुधिर अग्रवाल

९५६१५९४३०६

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.