
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी रंगात आली असून, प्रमुख नेत्यांचे दौरे आणि सभा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी रविवारी बेगुसराय येथे प्रचारासाठी दाखल झाले. नेहमीप्रमाणे भाषणांमधून केंद्र व राज्य सरकारवर टीका करण्याबरोबरच, यावेळी त्यांनी एक वेगळा प्रयोग केला थेट लोकांमध्ये उतरून त्यांचा जीवनानुभव जाणून घेण्याचा.
सभेपूर्वी राहुल गांधी स्थानिक मच्छिमार बांधवांना भेटण्यासाठी बेगुसरायमधील एका तळ्याकाठी पोहोचले. पारंपरिक पोशाखात त्यांनी अचानक तळ्यात उडी घेतली आणि स्थानिक मच्छिमारांसोबत मासेमारी करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या “देसी अंदाजाचा” व्हिडिओ काँग्रेस पक्षाने आपल्या ‘एक्स’ (पूर्वीच्या ट्विटर) अकाऊंटवर शेअर करताच काही तासांतच तो व्हायरल झाला.
या जलमय अनुभवातून राहुल गांधींनी मच्छिमार बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांच्या दैनंदिन संघर्षांबद्दल, सरकारच्या दुर्लक्षाबद्दल आणि मत्स्यव्यवसायातील अडचणींबद्दल सविस्तर चर्चा केली. यावेळी व्हीआयपी पक्षाचे अध्यक्ष आणि मच्छिमार समाजाचे नेते मुकेश सहनी हेही त्यांच्यासोबत होते.
या संवादानंतर काँग्रेसने मच्छिमार समाजासाठी काही महत्त्वाची आश्वासने जाहीर केली —
• मासेमारी बंदीच्या (लीन पीरियड) तीन महिन्यांच्या काळात प्रत्येक मच्छिमार कुटुंबाला ₹5,000 ची आर्थिक मदत.
• मत्स्यपालन विमा योजना सुरू करणे आणि बाजारपेठेची सोय करणे.
• प्रत्येक ब्लॉकमध्ये मासे बाजार, प्रशिक्षण केंद्र आणि अनुदान योजना सुरू करणे.
• जलाशय धोरणांतर्गत नद्या आणि तलावांचे पुनरुज्जीवन करून पारंपरिक मच्छिमारांना प्राधान्य देणे.
सभेत बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र आणि बिहार सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “बिहारचे लोक जगभर प्रगती करत आहेत, पण त्यांच्या राज्यात मागे पडले आहेत. इथल्या सरकारला लोकांना पुढे येऊ द्यायचं नाही. त्यांना वाटतं की बिहारचे लोक फक्त मजुरी करत राहावेत. दुबईसारखी शहरं बिहारच्या लोकांनी बांधली आहेत, पण स्वतःच्या राज्यात त्यांना संधी मिळत नाही.”
त्यांच्या या भाषणाला उपस्थितांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. बेगुसरायमधील ही सभा आणि त्यांचा मासेमारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक नेटिझन्सनी राहुल गांधींच्या या “ग्राउंड कनेक्ट” शैलीचे कौतुक केले असून, काहींनी त्यास “देसी जनसंपर्काचा मास्टरस्ट्रोक” असे म्हटले आहे.
बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण तापत असताना, राहुल गांधींचा हा अनोखा आणि लोकांमध्ये मिसळणारा अंदाज काँग्रेसच्या प्रचाराला एक वेगळी दिशा देत असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
● हे वाचा – संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अन्वयार्थ
(छाया सौजन्य : NDTV)