
मुंबई : नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारतीय महिला क्रिकेट संघाने अभूतपूर्व पराक्रम साधला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेला ५३ धावांनी पराभूत करत महिला वनडे विश्वचषक 2025 आपल्या नावे केला. भारताने प्रथम फलंदाजी करत २९९ धावा केल्या होत्या, तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव २४६ धावांवरच कोसळला. या विजयानंतर देशभरातून महिला संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच, बीसीसीआयनेही ऐतिहासिक निर्णय घेत ५१ कोटी रुपयांचं भव्य बक्षीस जाहीर केलं आहे.
बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी ही घोषणा करताना सांगितलं की, या पुरस्कारात खेळाडूंसह कोचिंग स्टाफ, निवड समिती आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचाही समावेश असेल. त्यांनी या विजयाचं श्रेय आयसीसी चेअरमन जय शाह यांच्या दूरदृष्टीला दिलं. शाह यांच्या प्रयत्नांमुळे महिला क्रिकेटमधील पुरस्कार रक्कमेत तब्बल ३०० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. सैकिया म्हणाले, “जय शाह यांनी महिला क्रिकेटच्या विकासासाठी केलेली गुंतवणूक आणि समान वेतन धोरणामुळे आज या लेकींनी इतिहास घडवला आहे.”
सैकिया यांनी या प्रसंगी क्रिकेट प्रशासनातील विसंगतीवरही भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की, “पुरुष संघाने जिंकलेल्या आशिया कप 2024 ची ट्रॉफी अजूनही बीसीसीआयच्या कार्यालयात पोहोचलेली नाही. जर ३ नोव्हेंबरपर्यंत ट्रॉफी मिळाली नाही, तर आम्ही आयसीसीकडे अधिकृत तक्रार करू.”
या विजयाला सैकिया यांनी १९८३ च्या कपिल देव यांच्या विश्वविजयाशी जोडत म्हटलं, “जसा १९८३ मध्ये पुरुष संघाने देशाला नवसंजीवनी दिली होती, तसाच जोश आणि प्रेरणा आज हरमनप्रीत कौर आणि तिच्या महिला ब्रिगेडने दाखवली आहे. त्यांनी केवळ ट्रॉफी जिंकली नाही, तर पुढील पिढीच्या महिला क्रिकेटपटूंना प्रेरणादायी मार्ग दाखवला आहे.”
जय शाह यांनीही महिला क्रिकेटच्या यशात बीसीसीआयच्या धोरणांचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं. “वेतन समानता, महिला प्रीमियर लीग (WPL) आणि वाढीव गुंतवणुकीमुळे आज भारतीय महिला खेळाडूंना आत्मविश्वास मिळाला आहे,” असं ते म्हणाले. हा ५१ कोटी रुपयांचा पुरस्कार या मेहनती, जिद्दी आणि लढवय्या खेळाडूंच्या यशाला दिलेला खरा सलाम आहे जो देशातील लाखो मुलींना क्रिकेटचे स्वप्न पाहण्याची प्रेरणा देणारा ठरेल.
● हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे कारंजे ….आधुनिक कारंजा महात्म्य
विश्वविजेत्या लेकींसाठी खजिना खुला!