
एसटी कर्मचाऱ्यांना ६,००० रुपये दिवाळी भेट आणि १२,५०० रुपयांची सण उचल; चक्का जाम आंदोलन स्थगित
मुंबई : महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांना ६,००० रुपये दिवाळी भेट (सानुग्रह अनुदान) देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय पात्र कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपयांची दिवाळी अग्रीम सण उचल देखील मिळणार आहे.
राज्यातील ८५ हजाराहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. यासोबतच, वेतनवाढ फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दर महिन्याला ६५ कोटी रुपये देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला होता, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास होऊ शकला असता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत कामगार संघटनांची बैठक झाल्यानंतर, कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी घोषणा करण्यात आली आणि चक्का जाम आंदोलन स्थगित करण्यात आले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या:
२०१८ पासून एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा फरक देण्यात आलेला नाही. सन २०२० ते २०२४ या कालावधीतील वेतनवाढ फरक, तसेच इतर अनेक रक्कमा थकीत आहेत. एकूण थकीत रक्कम ४००० कोटींपेक्षा जास्त आहे. कृती समितीने ही रक्कम एकावेळी कर्मचाऱ्यांना मिळावी अशी मागणी केली होती.
उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर सरासरी ७,५०० रुपयांचा वेतनवाढ फरक हप्ता प्रति महिन्याला देण्याचे आश्वासन देण्यात आले असून, यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. यंदाची दिवाळी आता राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची आणि समाधानाची ठरणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना 6000 हजार रुपये दिवाळी भेट !