Sunday, October 26

नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टचा थैमान! सायबर ठगांनी ज्येष्ठांना लुटलं तब्बल 6 कोटी आणि 72 लाख

नाशिक डिजिटल अरेस्ट स्कॅम – सायबर ठगांनी ज्येष्ठ नागरिकांना 6 कोटी आणि 72 लाखांना लुटलं

नाशिक : नाशिकमध्ये सायबर गुन्हेगारांनी डिजिटल अरेस्ट या नवनवीन पद्धतीने दोन ज्येष्ठ नागरिकांना तब्बल 6 कोटी आणि 72 लाख रुपये लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठगांनी सर्वोच्च न्यायालय आणि सीबीआयच्या नावाचा वापर करून नागरिकांना धमकावले आणि भीती दाखवून पैसे उकळले.

गंगापूर रोड परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाला अचानक व्हिडीओ कॉल आला. त्याला सांगण्यात आलं की, त्याच्या सिमकार्डवरून अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत आणि त्याला सर्वोच्च न्यायालयात हजर व्हावं लागणार आहे.
भीतीमुळे तो नागरिक घाबरला आणि सायबर ठगांच्या दबावाखाली येऊन आरटीजीएसद्वारे तब्बल 6 कोटी रुपये ट्रान्सफर केले. ही संपूर्ण कारवाई नंतर बनावट असल्याचं समोर आलं.

दुसऱ्या प्रकरणात, नाशिकमधील अनिल लालसरे यांना ठगांनी कॉल करून सांगितलं की, त्यांच्या आधारकार्डवरून बनावट क्रेडिट कार्ड इश्यू झाले असून गैरव्यवहार झाला आहे. जर दंड न भरल्यास सीबीआय पथक अटक करून दिल्लीला घेऊन जाईल, अशी धमकी देण्यात आली. भीतीपोटी अनिल लालसरे यांनी 72 लाख रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर केले.

या दोन्ही प्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. कोणत्याही सरकारी किंवा न्यायालयीन अधिकाऱ्याच्या नावाने आलेल्या फोन कॉलवर विश्वास ठेवू नका, असा सल्लाही देण्यात आला आहे.

डिजिटल अरेस्ट स्कॅममध्ये ठग स्वत:ला पोलीस, सीबीआय अधिकारी किंवा न्यायालयीन अधिकारी म्हणून ओळख करून देतात. नागरिकांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची भीती दाखवतात आणि पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडतात.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.