Sunday, October 26

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाखाची मदत द्या-उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसोबत जाहीर सभेत बोलताना

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची जमीन खरडून गेल्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे की, मनरेगाच्या माध्यमातून जाहीर केलेल्या साडेतीन लाख रुपयांच्या मदतीतून दिवाळीपूर्वी १ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत.

उद्धव ठाकरे यांनी हे विधान क्रांती चौकातून सुरू झालेल्या मोर्चा आणि नंतरच्या जाहीर सभेत केले. यावेळी पक्ष नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, ओमराजे निंबाळकर, अरविंद सावंत, आमदार अनिल परब, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि इतर नेते उपस्थित होते.

ते म्हणाले, “अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये मदत मिळावी आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. राज्य सरकारच्या पॅकेजमधील मदत ही ‘सर्वात मोठी मदत’ नाही, तर इतिहासातील सर्वात मोठी मारलेली थाप आहे.”

उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले की, “ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली, त्यांना मनरेगामधून साडेतीन लाख रुपयांची मदत मिळणार आहे. त्यापैकी दिवाळीपूर्वी १ लाख रुपये खात्यात जमा करणे अत्यावश्यक आहे.”

त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावरही भाष्य करत म्हटले, “बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना १० हजार रुपये मदत दिली जात आहे, मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अशी मदत का नाही?”

याशिवाय, उपमुख्यमंत्रिपदाविषयी देखील उद्धव ठाकरे यांनी विरोध दर्शवला. ते म्हणाले, “विरोधी पक्षनेता अजून नेमलेला नाही, त्यामुळे दोन उपमुख्यमंत्र्यांचे पद काढून त्यांना साधे मंत्री म्हणून काम करू द्या.”

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.