
तळेगावची धग…
मी पंचाहत्तर साली नागपुरात असताना एका वाचनालयात उद्धव ज. शेळकेंची ‘ धग ‘ कादंबरी माझ्या हातात पडली. खरं तर पाच वर्षांपासून मी ह्या पुस्तकाच्या शोधत होतो. पण सापडत नव्हते. त्याला कारणही तसेच होते. काय झाले की एकदा आई वडिलांचे खूप भांडण झाले. अधूनमधून ते व्हायचेच. असे भांडण झाले की वडील रागे भरत. मग त्यांचे जेवण बंद, म्हणजे उपोषण. अशी उपोषणं आणि सत्याग्रह घराघरातून सुरू असतातच. नवराबायकोचे भांडण झाले की दोघांपैकी एक रुसतो आणि दुसरा समजावत राहतो.
वडील उपोषणाला बसले की त्यांना समजावण्याची जबाबदारी माझ्याकडे असे. खूप प्रयत्नानंतर ते उपोषण सोडायला राजी होत. आधी आईची खूप निंदा करत , मी हो ला हो लावत ऐकून घेई. मत प्रदर्शन मात्र करत नसे. कारण आईची बाजू घेतली तर त्यांचा राग अजूनच वाढण्याची भीती. आईच्या निंदेत सहभागी झालो तरीही पंचाईत. कारण आई स्वयंपाक खोलीच्या दाराआड बसून सारे ऐकत असे. ही सर्कस फार कठीण असायची. मात्र सारा राग व्यक्त करून झाला की वडील हळू हळू शांत होत. नंतर इतर अवांतर विषयावर आमच्या चर्चा घडत. आईने ताटं मांडलेली असत.
गप्पा मारता मारता जेवण कधी संपले ते कळतही नसे. एकदा असाच त्यांचा राग शांतवत असताना चर्चेच्या ओघात ते म्हणाले ” तू उद्धव शेळकेंची ‘ धग ‘ वाचलीस का ? त्यात असेच आपल्या गावातील घरोघरच्या लहानसहान प्रसंगांचे त्यांनी खूप सुंदर वर्णन केलेले आहे. हे ऐकल्यावर मला आश्चर्य वाटले. पुढे ते म्हणाले की हे उद्धव शेळके आपल्या तळेगाव ठाकूरचेच आहेत . तेव्हा मी वडिलांकडे अविश्वासाने पाहत राहिलो. तेव्हापासून माझ्या मनात ‘ धग ‘ आणि उद्धव शेळकेंबद्दल कुतूहल जागे झाले कादंबरी हाती आल्यावर पहिल्यांदा संपूर्ण वाचून काढली त्यातील घटना प्रसंग आपल्या अवतीभवतीच घडत आहेत वाटायचे. त्यातील नामा,भीमा, कौतिक, रघुनाथ शिंपी, हेक्कोड तोंडया शिंपी , सीता म्हालीण, कासम चाचा, सकिना ह्या साऱ्या पात्रांना तर आपण रोजच भेटतो असे वाटू लागले. त्यांच्या संवादातील वऱ्हाडी भाषेचा खास लहेजा चिरपरिचित वाटला.
शेळकेंना भेटलेली पात्रे जरी मी प्रत्यक्ष पाहिली नाहीत तरी त्यांच्या आवृत्त्या माझ्या अवतीभवती वावरत होत्याच. परिस्थितीचे दणके सोसून ठामपणे उभ्या राहणाऱ्या कोणत्याही बाईत मला कौतीक दिसू लागली. ढुंगणावर फाटलेली चड्डी सावरत शर्टाच्या बाहीला शेंबूड पुसणारा मुलगा मला नामाच वाटे. शेळकेंची अफाट निरीक्षण शक्ती आणि प्रसंगाचे अकृत्रिम चित्रण क्षमता ह्याने मी दिपून गेलो. ग्रामीण जीवनातील हेव्यादाव्यांचे , प्रेमाचे आणि मनाच्या श्रीमंतीचेही फार प्रभावी चित्रण या कादंबरीत आहे. ‘धग ‘ मधील परिसर हा तळेगाव ठाकू , मोझरी, शेंदुर्जना बाजार ही सारी तिवसा तालुक्यातील ( तेव्हाचा चांदुर रेल्वे तालुका ) गावे, इथल्या लोकजीवनात अजूनही फारसा बदल घडलेला नाही. म्हणजे तुफान भांडणे आणि उत्कट प्रेम, अडीअडचणीला धाऊन जाण्याची वृत्ती अजून तशीच आहे . उद्धव शेळके एका मुलाखतीत म्हणाले की ” धग म्हणजे माझे वयाच्या बारा वर्षे पर्यंतचे आत्मचरित्र आहे त्यातील नाम्या म्हणजे मी स्वतःच आहे . ” ही कादंबरी नॅशनल बुक ट्रस्ट तर्फे सोळा भाषांत अनुवादीत झालेली आहे .

नॅशनल बुक ट्रस्टचा विषय निघाला म्हणून एक अनुभव सांगण्याचा मोह आवरत नाही. काही वर्षांपूर्वी अमरावतीला आमचे मित्र कवी, लेखक प्राचार्य राज यावलीकर ह्यांच्या श्री शिवाजी कृषी विद्यालयातील प्रशस्त निवासस्थानी नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेल्या ‘ शिळान आणि इतर कथा ‘ ह्या शेळकेंच्या अनुवादित पुस्तकावर आम्ही चर्चासत्र आयोजित केले होते. प्रमुख पाहुणे आणि मुख्य वक्ते होते खुद्द अनुवाद कर्ते डॉ. आनंद पाटील. हे पाटील तौलनिक साहित्यभ्यासाचे गाढे विद्वान, शिवाय लेखक , कादंबरीकार वगैरे… ते तेव्हा गोवा विद्यापिठाचे इंग्रजी विभाग प्रमुख होते. भाषण छान विनोदी शैलीत , हावभावासहित पार पडले. शेवटी प्रश्नोत्तराच्या तासात मी प्रश्न विचारला ” सर ह्या पुस्तकात आपण शब्दार्थ- टिपा मध्ये शिळान चा अर्थ A kinde of stone एक दगडाचा प्रकार असा कसा काय दिला ? ” तर ते म्हणाले की बरोबरच आहे तो अर्थ.
शिळा म्हणजे दगडच की ? मग मी त्यांना शिळान चा अर्थ समजावून सांगितला की ” शिळान म्हणजे भर उन्हात काही काळ पडलेली ढगांची सावली, शिळान चा संबंध दगडाशी नसून शीतलतेशी आहे . ” खेड्यात भर उन्हाळ्यात कुणाला शेतात किंवा बाहेर गावी जायचे असल्यास ” जरा शियान पडल्यावर ( ऊन उतरल्यावर ) जा ” असे सांगतात. शब्दकोशातही शिळान चा अर्थ मळभ , शिरवाळ , शीतल असाच दिला आहे. तो पाटलांनी पहिला नसावा बहुतेक. माझ्या सूचनेनुसार NBT ने दुरुस्ती केली की नाही माहीत नाही. आता सांगा नॅशनल बुक ट्रस्ट ह्या शासकीय संस्थेची आणि डॉ. आनंद पाटील सारख्या विद्वानांची ही कथा तर इतरांचे काय ? खरे तर वऱ्हाडी बोलीत हा शब्द शियान असाच आहे. शेळके साहेबानी तो शिळान असा का वापरला काय माहीत ? अमरावतीच्या त्यांच्या घराचे नावही ‘ शिळान ‘ आहे. रणरणत्या आयुष्यात शेवटी लाभलेली थोडी सावली म्हणजे शियान .
ज.रा. फणसाळकर यांनी ‘ धग ‘ वर ‘ पोहा चालला महादेवा ‘ हे नाटक लिहिले. मदन गडकरी यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात संजीव कोलते , वत्सला पोलकमवार ह्यांनी खूप सुंदर अभिनय केलेला आहे. सगळीकडे या नाटकाचे प्रयोग गाजत असतानाच उद्धव शेळके आणि ज. रा. फणसाळकर ह्यांचे व्यावहारिक मुद्द्यांवरून मतभेद झाले आणि नाटकाचे प्रयोग कायमचे थांबले. जयवंत दळवींच्या ‘ महानंदा ‘ कादंबरीवर शं.ना. नवरे ह्यांनी लिहिलेल्या ‘ गुंतता हृदय हे ‘ ह्या अप्रतिम नाटकाचेही असेच झाले. हा प्रयोग पाहताना माझ्या एक बाब लक्षात आली , प्रेमानंद गजवींच्या ‘ तनमाजोरी ‘ मधेही महादेवाच्या गाण्यांचा वापर केला आहे आणि ‘ पोहा चालला महादेवा ‘ मधेही. शेळके, गजवी , फणसाळकर तिघेही विदर्भाचे. दोन्ही नाटकाचा विषय गरिबी आणि शोषण. इकडे विदर्भात पूर्वी संसाराला विटलेले , दारिद्र्यात पिचलेले बहुतांशी लोक आत्महत्येला पर्याय म्हणून मोठ्या महादेवाची (पचमढी.म.प्र.) यात्रा करीत असत. यात्रा करणारा आला परत तर आला , नाही तर गेला कायमचा ! महादेवाची गाणी काळजीपूर्वक ऐकली तर ही गोष्ट तुम्हालाही जाणवेल. ह्यात वैताग म्हणजे वैराग्य हे मुख्य सूत्र. ‘ धग ‘ मधल्या महादेवला कुष्ठरोग झाल्या नंतर त्याच्या आयुष्यात जगण्यासारखे काही उरत नाही म्हणून तो महादेवाच्या यात्रेला जाण्यास निघतो.
सत्याहत्तर झाली मी अमरावतीच्या शासकीय विदर्भ महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिकत असतांना ही कादंबरी अभ्यासाला होती. प्रा. विजया डबीर मॅडम खूप समरसून शिकवायच्या, तास संपल्याचे भान नसायचे त्यांना. विद्यार्थीही तल्लीन होऊन जातं. मी तळेगाव चा म्हणून ‘ धग ‘ च्या अनुषंगाने मला मॅडम अनेक संदर्भ विचारीत असत. आता सुप्रसिद्ध विचारवंत, संशोधक, कवी, चित्रकार , (तेव्हाचे कीर्तनकार सुद्धा) प्रा.डॉ. अशोक राणा पण माझ्याच वर्गात होता . आम्ही अनेकदा उद्धव शेळके ह्यांच्या अमरावतीच्या काँग्रेस नगर मधील घरी जात असू . केवळ सातवा वर्ग शिकलेले शेळके सतत इंग्रजी ग्रंथांचे वाचन करीत असत आम्हाला खूप नवल वाटायचे. ते नेहमी पाईप ओढत . त्यांची जीवनशैली साहेबी थाटाची होती .
पुण्यात राहिल्यानंतर काही काळाने ‘ सरस साहित्य ‘ ही प्रकाशन संस्था मोठ्या मुलाचे स्वाधीन करून ते अमरावतीत राहायला आले . काँग्रेस नगरमधल्या ह्या बंगल्याच्या परिसरात तळेगावत गरिबीत दिवस करणारे काही भाऊबंद त्यांनी वस्तीला आणले . त्यात माझा वर्गमित्र सुधाकर शेळके हाही होता.स्वतः अत्यंत विपन्नावस्थेत जगत असूनही गावाकडच्या गरीब नातेवाईकांची काळजी वाहणारा हा मनस्वी प्रतिभावंत खऱ्या अर्थाने थोर होता. माई म्हणजे प्रेरणा शेळके सुरुवातीला शेळके साहेबांच्या लेखनिक नंतर सहचरी . माईंचे सौजन्य आणि स्वभावाला खरोखरच तोड नाही त्यांचेकडे भेटायला गेल्यावर दीड दोन तासात परत येता येईल खात्री नसते . सासरच्या माणसांविषयी इतकं प्रेम ! शेळकेंच्या आजारपणात त्यांनी खूप सेवा केली.
माननीय राज्यपाल रा.सू.गवई , खासदार उषाताई चौधरी, डॉ.मोतीलालजी राठी इत्यादींनी मोलाची मदत केली . तरीही अखेरच्या काळात त्यांचे खूप हाल झाले. सरकारी रुग्णालयात जनरल वार्ड मध्ये भरती राहावे लागले. प्रसन्नचे बेभरवशाचे पत्रकारिता क्षेत्र , माईंचा तटपुंजा पगार ह्यामुळे कायमच आर्थिक चणचण असे. खासदार उषाताई चौधरींच्या प्रयत्नाने माईना जिल्हा महिला बँकेत नोकरी मिळाली होती मुलगा प्रसन्न ‘ तरुण भारत ‘ ला होता. माझी छान मैत्री होती ह्याच्याशी. हा अकालीच गेला. हेमा , गुलाबी यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांचे हसतमुखाने केलेले स्वागत , आदरातिथ्य अजूनही स्मरणात आहे .
शेळके साहेबांच्या जन्मगावी तळेगाव ठाकूर येथे १९७७ साली अण्णासाहेब दिवे, उमाकांत उमप, वामन पवार , बाळ ठाकूर, बिल्डर दिलीप देशमुख , अप्पा ठाकूर , नाना पोजगे, संजय आढाव या सर्वांनी आम्ही शेळके साहेबांचा सपत्नीक नागरी सत्कार आयोजित केला होता.अध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब मांडवकर , प्रमुख पाहुणे डॉक्टर मोतीलाल राठी होते. सत्काराला उत्तर देताना शेळके साहेब गहिवरून आले , ते म्हणाले , ” चाळीस वर्षांपूर्वी गाव सोडताना खिशात तिकिटासाठी चार आणि नव्हते म्हणून तळेगाव ते हिंगणघाट हा पन्नास मैलांचा प्रवास डोक्यावर शिलाई मशीन घेऊन पायी करावा लागला होता. आज त्याच माझ्या गावात मी माझ्या मित्राच्या का होईना कारने येत आहे ही माझ्यासाठी फार मोठी घटना आहे. “

– अशोक विष्णुपंत थोरात.
पुस्तकाचे नाव – धग लेखक – उद्धव शेळके प्रकाशन