
‘वचपा’ कादंबरीचा प्रवास: नांदेड ते मुंबई; राज्यस्तरीय पुरस्कारापर्यंतची साहित्ययात्रा दोन तीन तारखेला मुंबई ठाणेहून सारखं फोन येत होतं. निनावी आसल्यामुळे मी फोन उचललो नाही.शेवटी विवेकनं फोन घेतला.समोरून एक बाई बोलत होत्या.बोलताना त्राससिक आवाजत बोलत होत्या.”दोन दिवसापासून फोन लावत आहे तुम्ही फोन घेत नाही.तुमच्या वचपा कादंबरीला पुरस्कार जाहीर झालेलं आहे.तुम्ही हजर राहणार का ?
विवेक माझ्याकडे पहात हसत उत्तर दिलं , ” हो ताई मी निश्चित येणार आहे.” एका दिवस अगोदर जाण्याचं ठरलं.नातेवाईक मित्रमंडळी यांना भेटता येईल या अपेक्षेने मी दिनांक ४.१० .२०२५ सकाळी लवकर उठलो.घरात कारभारनीचा गजर झाला,” मुंबईला जायचं आठ वाजलेत.”आणि माझं मन एका वेगळ्याच उत्साहात रमलं.आजचा दिवस माझ्यासाठी साधा नव्हता.माझ्या “वचपा” कादंबरीसाठी मला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार स्विकारण्यासाठी (मुंबई ) ठाणे गाठायचं होतं.माझ्यासाठी ही केवळ प्रवासाची सुरुवात नव्हती,तर माझ्या आयुष्याच्या एका सुंदर अध्यायाची पाने उद्या उलगडणार होती.जलद गाडी तपोवनच टिकीट काडलेलं होतं.बसण्याची घाई नव्हती.बैठक आरक्षित केलेली होती.फक्त वेळेवर पोहचणं महत्वाचं होतं.मी व आमचं शेंडेफळ विवेक स्टेशनवर पोहोचलो तेव्हा सूर्य अजूनही धरतीवर तिरपी किरणेच पाठवत होता.तपोवन प्लॉट फॉर्म दोनवर प्रवासी पोटात घेण्यासाठी शांतपणे उभी होती.प्रवाशी लोकांची लगबग सुरू होती.तेथे कुणी चहा घेत होतं,कुणी आपल्या जागा शोधत होतं,तर कुणी गाडीच्या सुटण्याची आतुरतेने वाट पाहत होतं.माझ्यासोबत होतं विवेक,माझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत असल्याचं मला भास होत होता.
मी विवेकला म्हणालो,” बाळा चल ना बसूत आपल्या जागेवर.”तो म्हणाला, ”वेळ आहे sss बाबा आणखीन.डब्यात एसी चालू केलेलं नाही.”एवढयात एक साधा पांढरा टी शर्ट घातलेला वाळल्या अंगाचा माणुस आला.एसी २ डब्याला नमस्कार करून आतमध्ये जावून एसी सुरु केली. कार्यालयातून जाहिरात चालू होती.गाडीनंबर अमुकतमुक सांगून ती गाडी कुठून जाणार हे हिंदी,मराठी,इंग्रजी भाषेतून सांगत होती.ही गाडी हुजूर साहीब नांदेड,पssर भणी,औरंगाssबॅद , मनमाड,नासिक,मुंबई छ.शि.म टर्मिनल जाईल.
गाडीने सूचना दिली.एक झटका दिली.गाडी स्टेशन सोडून हळूहळू पळत निघाली.नंतर गाडी सुसाट पळू लागली.डब्याच्या खिडकीतून नांदेड शहर मागे सरकू लागलं.ओळखीचे रस्ते,मंदिरांचे गाभारे,आणि गोदा काटचा मंद वारा सगळं डोळ्यांत साठवत होतो.
“ आपण मुंबईला पोचू तेव्हा किती वाजतील?” मी विचारलं.
माझं दोनतीन वर्षानंतर हा रेल्वे प्रवास होता.
“संध्याकाळी उशिरा… कदाचित रात्रीच,” विवेक हसत म्हणाला,
मीही हसलो आणि सिटच्या खांद्यावर डोकं टेकवून बाहेरचं दृश्य पहाण्यात हरवून गेलो. गाडीच्या डब्यातील सगळे जीव विविध रंगी, विविध ढंगी होते.गाडीच्या डब्यात जीवनाची एक रंगतदार झलक दिसत होती.कुणी खिडकीजवळ बसून पुस्तक वाचत होतं,कुणी कुटुंबासोबत खेळत होतं,तर कुणी फोनवरून हसत-गप्पा मारत होतं.एक बावीस तेवीस वर्षाचं तरुण विनाकारण डब्यात चकरा मारत होतं.आणि त्या सगळ्यातमध्ये मजेदार,नमुनेदार घुमणारे आवाज
“ ए चायssचायss गरम गरम चायेss!” चहावाला.
लगेच दुसरा,“ शेंगदाणे वालाss शेंगss दाणे घ्या शेंगदाणे s s. “
मध्येच “ताजे ताजे समोसे ताजे आहेत!” समोशेवाला.
“ थंडगार पाणी बॉटल.थंडगार पाणी बॉटल घ्या,देकू का ? मग सोडा घ्या,फळांचा रस!”
हे सगळे आवाज जणू गाडीच्या लयीत मिसळून एक वेगळं संगीत तयार होत होतं.पुर्णा आलं आणि मागे सरलं.परभणी आली.स्टेशनवर उतरलेले प्रवासी आणि चढणारे नवे चेहरे यांच्या प्रत्येक चेहऱ्यावर एक वेगळी कथा.कुणी कामासाठी मुंबईकडे जात होतं,कुणी आपल्या मुलां मुलीकडे,तर कुणी नशिब आजमावण्यासाठी.मी त्यांच्याकडे पाहत होतो कारण नसताना त्यांच्या चेहऱ्यांवरचे भाव वाचत होतो.आणि मनात विचार आला, “आपल्या प्रत्येक प्रवाशाचं आयुष्यही एका कादंबरीसारखंच आहे.” गाडी सुसाट वेगाने पळत होती.वेगाचं मला फारच कुतूहल.
मी विवेकला विचारलो,” गाडी लईच जोरात दामटालय. ”
तो लगेच मोबईलच्या पडद्यावर हात फिरवत म्हणाला,” ताशी वेग पंच्यान्नव किमी.”
गाडी पळत होती.मी खिडीजवळ बसलो होतो.सेलू,मानवत,परतूर,औरंगाबाद… ही सगळी स्टेशनं गाडीच्या वेगात मागे पडत होती,पण प्रत्येक ठिकाणची हवा,बोली आणि लोकांची ऊब मनात साठत होती.कधी गाडी थांबायची आणि विक्रेत्यांचा लोंढा डब्यात शिरायचा.
मात्र प्रत्येक ठिकाणी विवेक मलाच विचारायचा,”काहीतरी घ्या.समोसा घ्या! “बिस्कीट हवंय का!मग फळ घ्या.”
मी त्याच्या हट्टात आनंद मानत होतो.
गाडी जसजशी पुढे धामीनसारखी सळसळत सरकत होती,तसतसं माझं मन मागे वळून “वचपा”च्या दिवसांकडे फिरू लागलं.ती कादंबरी लिहिताना गावच्या जीवनाची,त्या दरोडेखोराच्या जगण्याची आणि ग्रामीण समाजाच्या अंतःकरणातील संघर्षाची कितीतरी चित्रं माझ्या डोळ्यांसमोर येत होती.आज त्या लेखनाला राज्यभरातून दाद मिळाली होती.एक लहानसा लेखक म्हणून ती माझ्यासाठी सगळ्यात मोठी कमाई होती.
गाडी न दमता पळत होती.शेतात निसर्गाचा कहर दिसत होता.पाणी आणि पिक यांच्या भयान युद्धाचे परिणाम दिसत होते.शेतातील पिकं मरुन पडलेली होती.त्यांचा हतबल झालेला रखवालदार कुठेही दिसत नव्हता.निसर्गाच्या आक्रमणामुळे तो घरातच अश्रू ढाळत बसला असावा.शेतात चिखल आणि पिकाचा राडा होता.पिक शरणागती पत्करून खाली माना घालून मलूल अवस्थेत आडवी पडली होती.
मनमाड ओलांडल्यानंतर संध्याकाळचे रंग पसरले.आकाश लालसर-नारिंगी झालं होतं.मध्येच राहून राहून पावसाच्या सरी नृत्य करत होत्या.ऊन सावलीचा खेळ दिवसभर सुरु होता.आणि सूर्य हळूहळू डोंगरांच्या पलीकडे तोंड लपवत होता.खिडकीबाहेर दिसणाऱ्या शेतीतल्या झाडांच्या सावल्या लांब झाल्या होत्या.गाडीतला गोंगाटही आता थोडा मंदावला होता.सगळेजण थकलेले,शांत होते.पण माझ्या मागच्या बाजूला बसलेले मात्र गाडीतून उतरेपर्यंत सारखं बोलत होते.मोबाईलच्या मोठ्या आवाजात भिमाचा कार्यक्रम ऐकत होते. त्यांचा मोबाईल कार्यक्रम मी ही ऐकत होतो. मध्येच कुठेतरी भुक लागल्यामुळे गाडीतच चटणी भाकरवर ताव मारलो.काही वेळाने विवेकने बिस्कीटचं पुडा माझ्याकडे देत विचारलं, “ बाबा हे घ्या.मनात काय चाललंय?”
मी हसलो व बोललो,“ जीवनाचा एक प्रवास संपत नाही,तोपर्यंत एका दुसऱ्या नवीन प्रवासाची सुरुवात होत असते.”त्याने फक्त मान हलवली समजूतदारपणे.
थोड्याच वेळात गाडी नाशिक रोडला पोहोचली.दिवस मावळला होता.बाहेर काही दिसत नव्हतं.इथून पुढे थोड्या वेळाने कसारा घाट सुरू होणार होता.बाहेर अंधार जास्तच गडद होत चालला होता.गाडीच्या खिडकीतून दूरवरच्या दिव्यांची लुकलुक दिसत होती आणि झाडांच्या फांद्यांमधून एखादा तारा आकाशात चमकत होतं, तर कधी लपून जात होतं.थोड्याच वेळात घाट सुरू झाला.आणि ते दृश्य अहा!कसारा घाटात गाडी जणू एखाद्या नागिनीसारखी वळणं घेत धावू लागली.मन चक्षूसमोर एकीकडे खोल दऱ्या,दुसरीकडे उंच डोंगर,आणि मधून पळणारी ती लोखंडी सापासारखी रेल्वे.पण रात्रीला काय कळणार ?आता गाडीचा वेग मंदावला.जणू तीही थकली होती.शिट्ट्यांचा आवाज घाटात घुमत होता.गाडी रेंगाळत,दम घेत,पुढे सरकत होती.डब्यातल्या खिडकीतून बाहेर पाहताना माझ्या मनात एक विचार आला,” आपलं जीवनही असंच असतं.कधी सरळ वाट,कधी घाट,कधी चढ,तर कधी उतार.पण शेवटी पोचायचं असतं स्टेशनला,आपल्या ठिकाणी. “
आता रात्रीचे आठ वाजले होते.डब्यातील दिवे लागले आणि छोटी मुलं हळूहळू झोपेच्या आधीन होत होती.बाहेर मात्र डोंगरांचे अंधारलेले आकार आणि दूरवर दिसणारे दिवे.सगळं काही जणू रहस्यमय भासत होतं.गाडी रुसल्या सारखी करत होती.वेग मंदावला होता.मध्येच थांबत होती.मी खिडकीतून बाहेर पाहत विचारात हरवून गेलो इतर मोठया शहरांच्या मानाने नांदेड या छोट्याशा शहरातून निघालो आणि आता ठाण्यापर्यंत पोचणार आहे.जीवन खरंच किती सुंदर प्रवास आहे!
गाडी आता घाटातून बाहेर पडत होती.आतापर्यंत धामीनसारखी धावणारी गाडी गांडूळसारखी सरकत होती.जणू दम खाऊन पुन्हा वेग घेणार होती.बराच वेळ घाटात दम घेतल्यानंतर शिट्टीचा आवाज झाला,गाडी पुन्हा पळू लागली आणि मला जाणवलं आता मुंबई फार दूर नाही.कसारा घाट संपला आणि गाडीने पुन्हा वेग पकडला.रात्रीचा अंधार आता स्थिरावला होता,पण मुंबईकडे जाताना आकाशात चमकणारे दिवे जणू स्वप्नांचा मार्ग दाखवत होते.विवेक मोबाईलवर बोटे फिरवत होता.मी मात्र खिडकीतून बाहेर पाहत होतो,जिथे वेगाने सरकणाऱ्या दिव्यांमधून मला माझं आयुष्यच दिसत होतं.लहानपण,संघर्ष,लेखन आणि आजचा हा अभिमानाचा प्रवास.
गाडी नाशिकमधून पुढे गेली की हवेचा गारवा थोडा वाढतो.रुळांच्या आवाजात एक लय असते टक-टक टक-टक त्या आवाजात विचारही ताल धरतात.त्या क्षणी माझ्या मनाला विचार चाटून गेले ही फक्त मुंबईची वाट नव्हती,तर ही माझ्या आयुष्याच्या प्रत्येक परिश्रमाची फळे पाहायला नेणारी वाट होती.
विवेकने विचारलं ,” बाबा या भागताला पहिल्यांदाच राज्यस्तरीय पुरस्कार मिळतोय ना?”
मी थोडं हसून म्हणालो, “हो, या कादंबरीसाठी हा दुसरा राज्यस्तरीय पुरस्कार आहे यापूर्ती मातोश्री सौ कै केवळबाई मिरेवाड राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मिळाला आहे.पण मला असं वाटतंय की हे पुरस्कार फक्त माझे नाहीत.‘वचपा’ लिहिताना मी ज्या माणसांना पाहिलं,ज्या गावातलं जीवन अनुभवले,त्यांचा आवाज,त्यांचा संघर्ष सगळं यामध्ये आहे.त्यामुळे हा पुरस्कार त्यांच्या नावाचाही आहे.”माझ्या मागे बसलेला पोलीस म्हणाला,”आरे वा! तुमचं बोलणं ऐकलं की वाटतं,माणूस मोठा होतो तो केवळ कर्तृत्वाने नाही,तर नम्रतेने.”मी त्याच्याकडे पाहून हलकं हसलो.व थोडा वेळ दाराजवळ जावून थांबलो.त्या क्षणी गाडीच्या दारातून एक वाऱ्याचा झोका आत आला जणू निसर्गानेच माझ्या मनातील भावनांना स्पर्श करून गेला.
रात्री साडेनऊ वाजता गाडी कल्याण स्टेशनात थांबली.दिव्यांनी उजळलेला प्लॅटफॉर्म,धावणारे प्रवासी,गाड्यांच्या शिट्ट्या,आणि गर्दीचा गोंधळ पण त्या गोंधळातही माझं मन शांत होतं.मी थांबलो,खोल श्वास घेतला,आणि जाणवलं हे शहर फक्त शहर नाही,तर हे माझ्या यशाचं साक्षीदार आहे.रात्रीचा मुक्काम उल्हासनगरला माझी भाची सुनिताकडे होता.कल्याणहून लोकलने आम्ही परत ऊल्हासनगरला निघालो.लोकलचं तिकीट काढलेले नव्हते.तिकिट कुठे मिळते हे कळत नव्हतं.लोकलगाडी तर आली.विना तिकीट प्रवास हा जीवनातला पहिला प्रवास घडला.मनात धूकधूक वाढली होती.उल्हासनगरला पोहोचता पोहोचता घड्याळाचे काटे दहाच्या जवळ आले.अटोने भाचीचे घर गाठलो.
दुसऱ्या दिवशी रविवारी(५.१०.२०२५) ठाण्याचं मराठी ग्रंथ संग्रहालय ठिक पाच वाजता गाठलो.भव्य पाच सहा मजली इमारत.त्यात भव्य पुस्तक संग्रहलाय.सर्व संग्रहालय फिरुन पाहिलो.त्या संग्रहालयात एक लाख ऐंशी हजार पुस्तक आहेत असे तेथील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी माहिती पुरवली.स्थापना १८९३ ची. ग्रंथालय वर्धापन दिनाचे अध्यक्ष म्हणून लोकमान्य टिळक,वि.का राजवाडे,वि.दा.सावरकर,न.चिं. केळकर,आचार्य अत्रे,लक्ष्मणशास्त्री जोशी,वामन मल्हार जोशी,वि.वा.शिरवाडकर,ना.सी.फडके, राजकवी यशवंत,चिं.वि.जोशी,वि.द.घाटे,गो.नी. दांडेकर,वसंत बापट,नरहर कुरुंदकर…अशी मोठमोठी माणसं येऊन गेलीत.एकशे तीस वर्षं जुनं ग्रंथ संग्रहालय जिथे आज महाराष्ट्रभरचे लेखक,कवी, वाचक आणि साहित्यप्रेमी जमले होते.सभागृहात प्रवेश करताच माझ्या मनात एक आनंदाची लहर उमटली होती.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहूने होते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवियत्री निरजा मॅडम व प्रशांत पाटील उपसंचालक,ग्रंथालय संचनालय महाराष्ट्र राज्य मुंबई.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झालं, गोड मधूर आवाजात सूत्रसंचालन सुरू झालं. प्रथम डॉ निर्मोही फडके (कादंबरी वचपाचं परीक्षण केलेल्या ) यांनी अतिशय सुंदरपणे सर्व बारा लेखक,कवी,कथाकार यांच्या पुस्तकाविषयी थोडक्यात आटोपशीर विवेचन केलं.आपल्या सालस गोड व समर्पक शब्दांत बोलून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.
नंतर पुरस्कारांची नामावली सुरु झाली या नामावलीत मृणाली चितळे,विठ्ठल जाधव,अंजली कुलकर्णी,डॉ.गौरी क्षिरसागर,वर्षा कुवळेकर, विद्याधर ताठे,निलकंठ कदम,संजय जोशी,सारिका कुलकर्णी,बबन शिंदे व संजीवनी खेर होते.ही सर्व ख्यातनाम मंडळी.सर्वात प्रथम एक लेखिका मृणाली चितळे यांचं नाव उच्चारलं, त्यांच्यानंतर माझं नंबर दुसरा.तेव्हा माझ्या मनात वेगळाच आनंद होतं.तो आनंद मनात थुईथुई नाचत होतं.सूत्रसंचालन करणाऱ्या ताईचां प्रत्येक शब्द मनात झिरपत होतं.माझं नाव उच्चारलं गेलं “ मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांच्याकडून दिला जाणारा कादंबरी साहित्य प्रकारातील या वर्षीचा ‘श्रीस्थानक’ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार ‘वचपा’ कादंबरीस दिला जात आहेत — लेखक मोतीराम रुपसिंग राठोड नांदेड (प्रकाशन:सायास प्रकाशन नांदेड ) यांना.” यावेळी माझा विद्यार्थी प्राध्यापक डॉ माधव जाधव यांची आठवण प्रकर्षाने जाणवली.तो आज माझ्या सोबत असावयास पाहिजे होता.
नाव उच्चारताच माझ्यासाठी क्षणभर सगळं थांबलं.टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मी उभा राहिलो.वेड्यासारखं स्टेजकडं पहात.टाळया वाजवले ठाणेकरांनी;पण त्या टाळ्यांमध्ये मला माझ्या गावाच्या मातीचं सुगंध जाणवला.तो सुंगध होता हिरानगरचा,विष्णुपुरीचा,नांदेडचा, मराठवाड्याचा,त्या माझ्या छोट्याशा तांड्यातल्या चुलींचा आणि लेखनासाठी झगडणाऱ्या माझ्या मनाचा.
खरं तर मंचावर गेलो तेव्हा माझे हातपाय थरथरत विठ्ठल विठ्ठल म्हणत होते.तरी हा आनंद वेगळाच होता.महाराष्ट्रीतीत सुप्रसिद्ध कवियत्री निरजा मॅडम यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारताना माझ्या नजरेसमोर जवळचे सगळे दिसत होते.त्यात माझी भावडं,माझी कारभारीन,माझी मुलं,विजय विशाल,वैभव व विवेक.माझ्या सूना मयुरी आणि संपदा,माझे नातू विरु आणि तन्मय,माझं अखा कुटूंम्ब.तसेच माझ्या सोबतीला होते माझ्या भाचीची मुलं बबलू,सचिन आणि माझ्या पूतण्याचा मुलगा रोहण.या सगळ्यांच्या डोळ्यांत अभिमान होतं.त्याचं काळीज ही आनंदाने नाचत होतं.माझ्या डोळ्यासमोर माझे मित्र होते.माझे मार्गदर्शक होते.तो क्षणचं माझ्या जीवनात इतकं महत्वाचं होतं की क्षणभर वाटलं,मी काहीतरी असं साध्य केलंय,जे फक्त शब्दांचं नव्हे,तर आयुष्याचं यश आहे. “पुरस्कारप्राप्तीचा तो क्षण जणू मी माझ्या हृदयात खोल खोल कोरुन ठेवलो आहे.”ठाणेकर या माझ्या वाक्यावर टाळ्यांचा पाऊस पाडला.तसे टाळ्या वाजवण्यात ठाणेकर मंडळी अजीबात कंजुषी करताना दिसले नाहीत.मला स्टेजवर बोलण्याची संधी मिळाली.मी माझे मोडके तोडके विचार मांडलो.त्यावेळी कळमनुरीचे रहिवाशी महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक वाकडे काका,सुप्रसिद्ध लेखक जगदीश कदम सर,सुप्रसिद्ध कवी देविदास फुलारी सर,प्राचार्य संगीता अवचार,व आवचार सर, विलास ढवळे व सुनिल डोईबळे यांची खास आठवण यावेळी माझ्या मनात उसळी मारुन वर आली.मी बोलत होतो.सभागृहात टाळ्या वाजत राहिल्या,पण माझ्या मनात मात्र शांतता होती ती लेखनाची,प्रयत्नांची आणि माणुसकीची.
त्या रात्री कार्यक्रमानंतर ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या भव्य अशा इमारतीत जेवनांचीही सोय केलेली होती.त्या मंडळातील प्रत्येक माणुस अतिशय प्रेमळ होता.रात्रीचे दहा वाजले होते.मी थोडा वेळ भव्य इमारतीच्या एका खोलीत बसून खिडकीतून बाहेर पाहत होतो. बाहेर मुंबई झोपली नव्हती,मुंबई कधीच झोपत नाही असं म्हणतात हे खरं आहे.येथे दिवस कधी सुरु होतो व कधी संपतो हे कळत नाही.येथे दिव्यांची झळाळी आहे,वाहनांची जलद हालचाल आहे,येथे सतत धावणारी, पळणारी माणसं आहेत,येथे लोकलचा आवाज आहे आणि हे सर्व मी माझ्या मनात,कानात आणि मेंदूत साठवत होतो.
माझ्या मनात विचार आला मी एक लहानसा नांदेडच्या धुळीतून निघालेला लेखक?(मी लेखक नाही यावर आजही मी ठाम आहे ) आज इथे,या शहरात,आपल्या शब्दांनी पोहोचलो आहे.प्रवास खरं तर रेल्वेचा नव्हता,तो माझ्या आत्म्याचा होता.माझ्या पळणाऱ्या मनाचा होता.मी माझ्या मुलाकडे पाहून म्हणालो,“माणसाने कितीही गाड्या पकडल्या,रस्ते ओलांडले,पण खरी यात्रा असते ती अंतर्मनाची.”विशाल हसला आणि म्हणाला, “हो,आणि ती यात्रा कधी संपत नाही बाबा.”
कार्यक्रमाची सांगता झाली.माझ्या भाचीच्या मुलांना निरोप देवून मी माझ्या तिन बछड्यांबरोबर ओला करुन पुण्याला निघालो.ओलाचा चालक माझा नातू रोहणचं होता.छान गप्पा मारत, रात्रीच्या झगमत्या दिव्यांकडे पहात,खंडाळा, लोणावळा करत,आती क्या खंडाला हे गाणे आठवत रात्रीचे एक वाजता पुण्यास पोहचलो. दोन दिवस विशालकडे मुक्काम. पुण्यात माझा पुतण्या अनिल यांच्या घरी गेलो. घरातील सगळ्यांशी गप्पा झाल्या.माझे विद्यार्थी अमोल रोकडे उद्योजक( १९८८ दहावी ) व सुदर्शन कापेरावेनोलू बजाज कंपनीत एक मोठा अधिकारी (१९८९ची दहावी ) यांची भेट घेतलो.माझ्या विद्यार्थीनी सुरेखा पडगीलवार व सुनिता पांडे याही घरी या म्हणून बोलावत होत्या. कित्येक वर्षानंतर माझा कॉलेजचा (उदगीर) जिवलग मित्र दिलीप सातपुते यांच्या घरी गेलो.त्याच्यासोबत रंगतदार एक तास गप्पा रंगल्या. त्यात वाहिनीनेही सहभाग नोंदवला. वहिनीच्या हातचं जेवन केलो व त्या सर्वांचा निरोप घेवून संध्याकाळी नांदेडकडे रवाना झालो.
तिसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता नांदेडकडे परतताना माझं मन शांत होतं,समाधानाने भरलेलं होतं.खाजगी लक्झरी बस गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहताना कसारा घाट पुन्हा दिसला नाही.तो घाट लागता नाही.कोणता घाट लागला हे अंधारात कळाल नाही;पण आता माझ्या डोळ्यांत एक नवा प्रकाश होता.“वचपा”चा तो प्रवास फक्त एका कादंबरीचा नव्हता;तर तो माझ्या लेखनातून समाजाला आरसा दाखवणाऱ्या प्रत्येक विचारांचा प्रवास होता.मला वाटते जीवनात कधी कधी जसं गाडी थांबते व पुन्हा धावू लागते,तसेच प्रत्येक लेखकाचं आयुष्य असतं.थोडं थांबतं,थोडसं विचार करतं, आणि पुन्हा शब्दांच्या वेगाने पुढे सरकतं.घरी आल्यावर मी थोडा वेळ डोळे मिटवलो आणि स्वतःशीच बोललो, “प्रवास अजून बाकी आहे… पण आज तरी माझं मन पूर्ण झालं आहे.”

राठोड मोतीराम रुपसिंग
नांदेड -६
९९२२६५२४०७ .