
ChatGPT वर केली मजा, पण झाली सजा ! शाळेतून थेट तुरुंगात रजा!
फ्लोरिडा (अमेरिका) तंत्रज्ञानाच्या युगात ‘हुशारी’ दाखवायची हौस एका १३ वर्षांच्या मुलाला तुरुंगाच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन गेली आहे. “मी माझ्या मित्राला कसा मारू शकतो?” असा प्रश्न त्या मुलाने ChatGPT वर टाईप केला आणि पुढच्या काही मिनिटांतच शाळेत पोलिस दाखल झाले.
डेलँड शहरातील साऊथ वेस्टर्न मिडिल स्कूल मध्ये घडलेल्या या प्रकाराने शाळा प्रशासन आणि पालक दोघांनाही हादरवून सोडलं आहे. शाळेच्या डिजिटल मॉनिटरिंग सिस्टीमने हा प्रश्न पकडला आणि ताबडतोब प्रशासन व पोलिसांना अलर्ट पाठवला.
तपासानंतर मुलाने सांगितले की तो फक्त ‘मजेत’ करत होता आणि आपल्या मित्राला चिडवण्यासाठी ChatGPT काय उत्तर देतं हे पाहायचं होतं. मात्र पोलिसांनी ही गोष्ट अजिबात हलक्यात घेतली नाही. संभाव्य धोक्याचा इशारा म्हणून त्या विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं.
ही घटना दाखवून देते की ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’वर प्रश्न विचारताना कृत्रिम शहाणपणा दाखवू नये! कारण ChatGPT ला विचारलेला एक “निरुपद्रवी” प्रश्न, शाळेतून थेट तुरुंगात नेऊ शकतो — आणि या वेळेस ChatGPT ने उत्तर देण्याआधीच जीवनाने शिकवण दिली.
मुलाने ChatGPT ला असा प्रश्न विचारला की शाळेतून थेट तुरुंगात रवानगी झाली