
लेकीसाठी : स्वातंत्र्याची किंमत आणि एका बाईचं न बोललेलं जग
प्रिये,
“जागतिक महिला दिनाच्या तुला खूप खूप आणि मनापासून हार्दिक शुभेच्छा. बस. आराम कर. दमली असशील.” चेहऱ्यावर हसू आणत त्याने तिला बाजूच्या खुर्चीवर बसण्यासाठी खुणावले आणि पुढे बोलू लागला. “मागच्या वर्षी याच दिवशी तुला मी आश्वासन दिले होते. बघ ते पूर्ण केले कि नाही?” तो बोलत होता. त्याच्याकडे कान देत, त्रासिक आणि थकलेल्या भावनेने ती बाजूच्या खुर्चीवर बसली. त्याच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी? हे न कळल्याने ती, तो नाराज होऊ नये म्हणून चेहऱ्यावर उसने हसू आणत त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागली. खरेतर काही ऐकून घेण्याच्या मानसिकतेत ती नव्हती. तो पुढे बोलू लागला, “मी तुला बोललो होतो. तुझ्या मनात जे काही आहे, ती इच्छा तू पूर्ण करू शकते. तुला शिकायचे असेल, कुठे फिरायला जायचे असेल, काही खायचे असेल, जे काय ल्यायचे असेल, ते तू करू शकते. माझी तुला काहीही आडकाठी असणार नाही. आणि काही विचारणार नाही.
मी जे बोललो ते पूर्ण केले. तुला काही विचारले का?” तो हसत विचारत होता. “केल्या का तू सर्व तुझ्या इच्छा पूर्ण?” त्याच्या या प्रश्नावर खरेतर तिला मनातून वाईट वाटले. पण चेहऱ्यावर तसे काही दिसू न देता ती हसली. ओढणीच्या कोपऱ्याने चेहरा पुसत आणि डायनींग टेबलवर असलेल्या पाण्याच्या बाटलीतील घोटभर पाणी पीत ती म्हणाली, “तुझ्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुझ्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हते. खूप काही शिकले मी या एका वर्षात आणि या वर्षाने आतापर्यंत सर्व अनुभवलेल्या वर्षांना पुन्हा तपासून घ्यायला मला उद्युक्त केले.”
तिने मानलेल्या आभाराने त्याला आतून गुदगुल्या झाल्यासारख्या वाटत होता. तो त्याचीच मनातल्या मनात पाठ थोपटून घेत होता. “एवढेच नाही तर मी तुला आयुष्यभर असाच सहकार्य करत राहील. तू तुझ्या मनासारखे जगू शकते.” त्याच्या या बोलण्याने खरंतर तिला आतून ढवळून निघाल्यासारखे वाटत होते. पण तसे काही जाणवू न देता ती बोलली, “चहा घ्यायचा का तुला? बरेच दिवस झाले, तुला मी चहा दिलाच नाही.” आणि त्याच्या उत्तराची वाट न बघता तिने स्वयंपाक घराकडे आपला मोर्चा वळवला. तो आपला लगेच रिमोट हातात घेऊन टीव्हीपुढे येऊन बसला.
गॅसवर चहासाठी पातेले ठेवता-ठेवता ती इतर साहित्य शोधू लागली. तिला काही सापडेना. तिने ज्या निगुतीने सर्व स्वयंपाकघर नेहमी टापटीप ठेवले होते, त्यातील एकही गोष्ट जाग्यावर नव्हती. साखर, चहापावडर, दूध हे साहित्य शोधता-शोधता तिला दहा मिनिटे लागली. हे करत असताना ती विचार करत होती. मधेच तिला वाटायचे, त्याला विचारावे,”तू मला खरेच स्वातंत्र्य दिलेस, पण पायातील बेड्या मलाच तोडायला सांगत होतास. मोकळ्या आकाशात उड्डाण घेण्याचे बंधन तोडलेस, पण पंख कसे फडफड करायचे, हे मी विसरले होते. त्याचा निर्णय तू माझ्यावरच सोपवला.
ज्ञानाचा प्रकाश बघायला तू सांगितले, पण डोळ्यांना त्याचा सराव राहिला नव्हता. माझ्या डोळ्यांवरील परंपरेचा चष्मा तू काढून न घेता तसाच शाबूत ठेवलास. तू मुक्त समुद्रावर विहार करण्यास मोकळीक दिलीस. पण हातपाय मारण्यासाठी त्यांमध्ये त्राण येणार नाही, याची काळजी घेतली. तू होतास या घराच्या बाहेर उभा. आणि खिडकीजवळ उभे राहून सर्वत्र हात दाखवून मला मुक्त स्वातंत्र्य घेण्यास सांगत होतास. पण मी मात्र घराच्या आत खिडकीत उभी राहून तुला कौतुकभरल्या नजरेने बघत होते. आणि तू मला इतके स्वातंत्र्य देतोस, या भावनेने हरखून जात होते, टाळ्या पिटत होते. पण या घराचा दरवाजा मात्र तू म्हणण्यापेक्षा व्यवस्थेने बाहेरून कडी-कुलूप लावून बंद केला होता. आणि तो उघडण्याचं तुझं धाडस कमी पडत होते. काय माहीत तुला कसली सुप्त भीती वाटत होती.”
उकळत्या पाण्यात चहा पावडर टाकता-टाकता ती पुढे विचार करत होती, “तो बंद दरवाजा तू फक्त थोडासा किलकिला केलास, पण मला बाहेर येण्यासाठी अडवणारे हात मात्र तू थोपवले नाहीस. ते मात्र मला स्वैरपणे मागे खेचत होते. थकवून टाकत होते. इच्छा नव्हती, या घरातून बाहेर पडून जग अनुभवण्याची. पण मनात एक थ्रिल होते. ते मात्र शांत बसू देत नव्हते. शेवटी शरीरात ऊर्जा आणून मी बाहेर पडले. अहाहा! किती छान आहे हे बाहेरचे जग! मी एका नव्या जगाचा अनुभव घेत होते. मला फिरावेसे वाटत होते, दाही दिशा. पण ‘काय करायचे ते तूच ठरव’, असं सांगून आणि नंतर चार महिन्यांनी पोरांचा अभ्यास कमी होताच,’तुझ्यामुळे या पोरांनी अभ्यास सोडून दिला, जर ती कुठे कमी पडली तर त्याला तु जबाबदार असणार,’
असं किती सहज बोलून तू मोकळा झालास. घरातील मोठी माणसे आजारी आहेत. पोरं अभ्यास करत नाहीत. घराचा उकिरडा झालाय. तुला काय करायचे ते तू कर. तुला काय काम आहे? पण हे काय आम्ही बघायचे का? अशी तू आठवण करून देत होतास. एकाचवेळी मी दोन आघाड्यांवर लढत होते. या आघाड्या जरी दोन दिसत असल्या तरी त्यामध्ये इतर अनेक लहान-लहान उपआघाड्या होत्या. आणि ‘तुला कसं करता येईल, ते तू बघ,’ या तुझ्या वाक्याने मात्र मलाच त्या लढवाव्या लागत होत्या. बाहेरच्या जगाच्या एका लोकविलक्षण अनुभवाने मी हरखून जात होते. मी पण एक माणूस आहे आणि सर्व गोष्टी मी समानतेने अनुभवल्या आणि उपभोगल्या पाहिजे, असं राहून राहून वाटत होते. खूप काही बोलायला ओठाशी शब्द येत होते. पण काडीकाडीने जपलेला हा संसार मला तसे करू देत नव्हता. मेहनतीच्या आणि मिळालेल्या संधीच्या जोरावर मी नवी काही क्षेत्रे काबीज केली.
त्याने तू दुखावला. कधी इतरांनी तू दुखावशील, असे वातावरण निर्माण केले. मी तुझ्यापुढे जाणे हे तुझे अपयश आहे, असेही तुला अनेकदा वाटून गेले. बाहेरच्या जगात काही वाईट अनुभव देणारे आणि मला वस्तू समजणारे जसे भेटले तसे तुझ्यापेक्षा उत्तम असे लोक भेटले. अडचणीत त्यांनीसुद्धा सहकार्य केले. त्यांच्याशी वाढलेली माझी जवळीक मात्र तुला तुझ्या आतूनच डसून गेली. तुझी विश्वासाची भावना कोलमडून जात होती. माझ्या प्रत्येक हालचालीवर असलेली तुझी नजर बरेच काही सांगून जात होती. काहीही झाले तरी मला मात्र तूच हवा होतास, हवा आहे आणि असणार. आपले घरटे आणि पिल्ले यांत मला आनंद आहे. पण माझ्या या भावना जाणून न घेता तू घरट्यातून हाकारे द्यायला सुरुवात केलीस. आणि तू तुला वाटेल ते कर, माझी काही आडकाठी नाही, असे सांगत असताना, मी गुन्हा करते आहे, असं दाखवत होता. अशावेळी काय करावे मी? तूच सांग बाबा.”
पातेल्यात उकळत असलेला चहा दोन कपांमध्ये ओतून तिने दोघांसाठी आणला आणि त्याच्या शेजारी येऊन बसली. त्याची नजर टीव्हीवरून हलत नव्हती. टीव्ही बघता-बघता त्याने कप उचलला आणि चहा प्यायला सुरुवात केली. तिचा कप उचलण्याची तिची इच्छा होत नव्हती. हळूच त्याच्या जवळ सरकून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती म्हणाली, “खूप खूप धन्यवाद. तु मला खूप सपोर्ट केलास.” तिच्या डोळ्यांत पाणी जमा झाले होते. त्याला बिलगून तिला खूप काही बोलायचं होतं. म्हणायचं होतं, “माझ्या राजा, मी बाहेर पडले. जग अनुभवले. आतून बाहेरून नव्याने उमलून आले. तुझ्या इतकाच माझा पण या जगावर हक्क आहे. पण हे जग, काही वाटा, काही आभाळ अजूनही माझ्यासाठी बंद आहे. कारण तिथे काटेरी संकटे आहेत.
पण या संकटांची निर्मिती तुच केली आहेस बाबा. बाईने बाईसाठी नाही केली. आणि केली असतील तर तुच तिला मजबूर केले आहे. मुक्त विहार करण्यासाठी माझं आभाळ, मुक्त डुंबण्यासाठी माझा समुद्र, मुक्त फिरण्यासाठी माझी जमीन, माझं शरीर, माझं मन यांवरचा ताबा, माझ्या देहातून निर्माण झालेल्या जीवाला नाव देण्याचे स्वातंत्र्य मला कधी मिळणार? मी कुठे जावे? कधी जावं? कधी यावं? कुणाशी बोलावं? काय खावं? काय प्यावं? काय ल्यावं? या गोष्टींचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मला, सांग कधी मिळणार?” पण डोळ्यांतील अश्रू मात्र तिला बोलू देत नव्हते. “माझं सर्व यश फक्त तुझ्यामुळे आहे.” असं ती बळंच बोलली आणि स्वतःचे कष्ट, मेहनत, खाल्लेल्या खस्ता आणि त्यातून मिळालेल्या यशाचे श्रेय त्याला देऊन मोकळे झाली. तिच्या लेकीसाठी आणखी सुरक्षित जग बनवण्यासाठी.

© – विष्णू औटी, (IRS)
(‘नाना मी साह्यब झालो’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)
दि. ०८ मार्च २०२३ (जागतिक महिला दिनानिमित्त)