Sunday, October 26

‘धम्मचक्र प्रवर्तन’ चुकीचा शब्दप्रयोग – बौद्ध संज्ञांचा योग्य वापर का आवश्यक?

धम्मचक्र प्रवर्तन दिन चुकीचा शब्दप्रयोग – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षा सोहळ्याबाबत ऐतिहासिक सत्य

          मुळात बौद्धया संज्ञेत विद्वत्ता, चिकित्सा, आणि शिलसंपन्नता अंतर्भूत आहे; पण दुःखद म्हणजे पारंपरिक अथवा धर्मांतरित बौद्धांमध्ये या तिन्ही बाबींचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसतो. बौद्ध समाजात क्वचित लोक या तिन्ही साच्यात बसणारे आढळतील. पारंपारिक बौद्ध म्हणजे उत्तर-पूर्व (ईशान्य) भारतातील समूहात वज्रयान, तंत्रयान व काही अंशी महायान सिद्धांतांचा प्रभाव असल्याने त्यांच्याकडून आंबेडकरप्रणित धम्म अपेक्षितही नाही, मात्र बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध हा १००% विद्वत्ता, चिकित्सा, व शिलसंपन्नतेचा आग्रह धरत असल्यामुळे बाबासाहेबांसमवेत धर्मांतरित झालेल्या बौद्धांची ही स्वाभाविक जबाबदारी आहे, की आपण आपला सांस्कृतिक इतिहास शुद्ध स्वरूपात रुजवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. विशेषतः अनुसूचित जातींतील धर्मांतरित बौद्धांना शतकानुशतके शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे हा अपेक्षित पराक्रम गाजवणे अवघड असले तरी शिक्षित बौद्धांचं हे कर्तव्य आहे, की त्यांनी विद्वान आणि चिकित्सक होण्यासाठी स्वतःला झोकून दिले पाहिजे. गत ७० वर्षांपासून आपण आपल्या सांस्कृतिक संकलनासाठीज्या दिशेने धडपडतोय ती दिशा वारंवार योग्य आहे की नाही हे तपासण्याची आपसूकच जबाबदारी बौद्ध समाजातील शिक्षित लोकांवर येऊन ठेपते.

          डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोक विजयादशमीच्या औचित्याने भव्य असा ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळा आयोजित केला, त्याचे आपल्या बौद्धांनी कुठलाही आनुषंगिक आगा-पिच्छा न बघता ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ असे नामकरण केले. आणि तीच सदोष परंपरा आजतागायत अधिकाधिक प्रचलित होत आहे. आपण एक बाब लक्षात घेतली पाहिजे, की ‘धम्मचक्र प्रवर्तना’चा तिळमात्र संबंध ऑक्टोबर महिन्यात बाबासाहेबांनी घडवून आणलेल्या धम्मदीक्षा सोहळ्याशी नाही. हे ऐकायला/वाचायला विचित्र आणि आक्षेप घेण्याजोगे वाटेल; पण वास्तव हेच आहे. आणि त्याला सबळ असे कारणही आहे. ते असे, की बुद्धत्व प्राप्तीनंतर तथागत सम्यक संबुद्धांनी शोधून काढलेल्या धम्माची आपल्या पंचवर्गीय भिक्खुंना केलेली पहिली धम्मदेसना हे खऱ्या अर्थाने ‘धम्मचक्र प्रवर्तन’ आहे.

धम्मचक्राच्या ‘प्रवर्तनाचं’ श्रेय हे धम्म शोधून त्याला पहिल्यांदा गतिमान करणाऱ्या एकट्या बुद्धांचं आहे. बुद्धोत्तर काळात लोप पावत चाललेल्या धम्माला ज्यांनी कुणी धम्म पुनरुज्जीवित करण्यास पुढाकार घेतला त्याला – ‘धम्मचक्र गतिमान दिन’/’धम्म पुनरुज्जीवन दिन’/ किंवा ‘धम्मचक्र अनुवर्तन दिन’ असे संबोधणे संयुक्तिक ठरते.

सम्राट अशोक असतील, त्यानंतर मधल्या काळात अजून कुणीही असेल किंवा आधुनिक काळात बाबासाहेब असतील, धम्माला उतरती कळा लागत असताना त्याला पुनरुज्जीवित करण्याचं काम या महापुरुषांनी केलं आहे; पण म्हणून त्यांना ‘धम्म प्रवर्तक’ किंवा त्या दिवसाला ‘धम्म प्रवर्तन’ वगैरे म्हणणे ऐतिहासिक, तात्विक आणि भाषिकदृष्ट्याही संयुक्तिक ठरत नाही.

बौद्ध साहित्याचा अभ्यास केल्यास ही शब्द, संज्ञा व त्यांचे अर्थ लक्षात यायला अडचण जात नाही. त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या स्मृतिदिनाला ‘महापरिनिर्वाण’ दिन म्हणण्याचा प्रघात आहे, जो की स्पष्टपणे चुकीचा आहे. बौद्ध साहित्याचा अभ्यास केल्यास महापरिनिर्वाण ह्या शब्दाला ‘महापरिनिब्बाण’ हा पाली शब्द केवळ बुद्धांच्या अनुषंगाने वापरण्यात आलेला दिसेल. बौद्ध साहित्यात बोधिसत्व, अर्हन्त आणि बुद्धाला पूर्ण कराव्या लागणाऱ्या पारामिता वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे कुणाला आणि कशाला कुठला शब्द, कुठली संज्ञा वापरली पाहिजे यात गोंधळ होण्यासारखं कुठलही ठोस असं कारण नसताना केवळ आपल्या अज्ञानामुळे आपण चुकीचा प्रघात घालून देणे ही वैचारिक भेसळ ठरेल. आणि आपणच आपल्या संस्कृतीचे मारक ठरू. त्यामुळे माझी सर्व बौद्ध जणांना विनंती आहे, की योग्य शब्द व संज्ञांचा वापर करून आपली बौद्ध संस्कृती शुद्ध स्वरूपात संकलित व संरक्षित करू…

Roshan Gajbhiye

-रोशन किसनराव गजभिये,

अमरावती.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.