
सोन्या-चांदीच्या भावाला पंख; सणासुदीत नवा उच्चांक
मुंबई : सणासुदीच्या दिवसांत सोनं-चांदीचे भाव अक्षरशः आकाशाला भिडले आहेत. भारतीय बाजारात दररोज नवे विक्रम प्रस्थापित होत असून, गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर सराफा बाजाराकडे आकर्षित होत आहेत. जागतिक आर्थिक अनिश्चितता, डॉलरची कमकुवत स्थिती आणि व्याजदर कपातीची अपेक्षा या घटकांमुळे सोनं-चांदीच्या किमतींमध्ये जोरदार वाढ झाली आहे.
मंगळवारी, 30 सप्टेंबर रोजी सोन्याचे दर पुन्हा एकदा विक्रमी उच्चांकावर पोहोचले. MCX वरील ऑक्टोबर फ्युचर्स सकाळी 9.30 वाजता तब्बल 1,252 रुपयांनी उसळले आणि प्रति 10 ग्रॅम 1,16,700 रुपयांवर स्थिरावले. दिवसाच्या सुरुवातीला सोनं 1,16,410 रुपयांवर उघडलं होतं. मागील सोमवारी ते 1,14,940 रुपयांवर बंद झालं होतं. म्हणजे एका दिवसात जवळपास 1,470 रुपयांची झपाट्याने वाढ झाली आहे.
सोन्याबरोबरच चांदीनेही जोरदार उसळी घेतली. मंगळवारीच MCX वर चांदीचा वायदा भाव 0.52% ने वाढून 1,43,840 रुपये प्रति किलो झाला. तज्ज्ञांच्या मते दिवसभरात अजूनही सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू राहू शकतात.
वाढीची प्रमुख कारणं
सोन्याच्या भाववाढीमागे अनेक सकारात्मक घटक काम करत आहेत. अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा हे त्यातील मुख्य कारण आहे. डॉलर घसरल्याने गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत. त्यातच भू-राजकीय तणाव, ट्रम्पच्या टॅरिफ धोरणांबद्दल निर्माण झालेलं अनिश्चित वातावरण, मध्यवर्ती बँकांकडून मोठ्या प्रमाणावर केलेली खरेदी आणि सणासुदीच्या दिवसांत वाढलेली किरकोळ मागणी या सर्व गोष्टींमुळे दर झपाट्याने वर चढत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारातही उसळी
फक्त भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील सोनं नव्या उच्चांकावर पोहोचलं आहे. अमेरिकेत सरकार बंद पडण्याची भीती आणि पुढील काही महिन्यांत व्याजदर कपात होण्याची शक्यता यामुळे जागतिक बाजारही अस्थिर झाला आहे. ऑक्टोबर आणि डिसेंबर महिन्यात एकूण 50 बेसिस पॉइंट्सनी व्याजदर कपात होईल, अशी गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे. त्यामुळे सोनं गेल्या 14 वर्षांतील सर्वोत्तम महिन्याकडे वाटचाल करत आहे.
थोडक्यात…
सणासुदीच्या हंगामात सोन्या-चांदीच्या किमतींना अक्षरशः पंख फुटले आहेत. लग्नसराई आणि दिवाळीच्या खरेदीचा सीझन अजून पुढे आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.