Sunday, October 26

नापिकी: रामभाऊच्या मेहनतीची शेतकरी संघर्षकथा

"शेतकऱ्याचे सोयाबीन पीक व पिकांचे नुकसान"

“नापिकी: रामभाऊच्या मेहनतीची शेतकरी संघर्षकथा”

मंगयवारचा गावच्या आठवडी बजार असल्यानं,पायटीच रामभाऊनं ढोराईले गव्हाणीत आदल्या दिवशी कापून आणलेल्या गावरान कडावूचे धांडे लाकडावर कुऱ्हाडीनं बारीक गेंडुरे करून ढोराईपुढे टाकले व गवत कापाचे ईवे वयनाटीतून काढून घराजोळच्या नालीच्या कोपऱ्यावर ठेवलेल्या खरपाच्या गोटयावर साजरे खराखरा घासले. तसा त्या खरपाच्या गोटयाचा उपयोग कोणाचे ट्रॅक्टर, आऊतभांडे,बैलबंडया, ढोरवासरं घराच्या ओट्याले शेंदून जाऊ नये म्हणून त्यानं नालीवर बरोबर बसवले होते. ओटयासमोर इलेक्ट्रीकचा लोखंडी पोल व त्या पोलच्या व भिंतीच्या बरोबर मधात इंधनकाडीसाठी वावरातून तोडून आणलेले मोठमोठे लाकडाचे फाटे व्यवस्थीत रचून ठेवलेले. समोर गाईवासराचे दोन खुटे दिवसभर रिकामेच असायचे.कारण गावचा दल्लारवाला म्हणजे ढोरं वयणाऱ्याकडं गाय, वासरू त्यानं हप्त्यावारी बऱ्याच दिवसांपासून टाकलेले. त्यामुळे दिवसभर त्याच्या जीवाले त्याईच्या चाऱ्या- पाण्याची चिंता सतावत नव्हती. तसा दल्लारवाला त्याच्या या गायवासराचा सात रुपये हप्ता घ्यायचा.

“आपल्या मांगं तं दररोज मोलमजुरीचं काम कोण्या दिवसी सवळ मिळते, नाही मिळत म्हणून कुठी झेंगट मांगं लाऊन घेता ढोरावासराईचं” म्हणून त्यानं गाय वासरू चरायला दल्लारात टाकले होते.पण झालं उलटंच ढोरावासराईची घटती संख्या पायता एवढ्या महागाईत परवडत नाही म्हणून त्यानंही यावर्षी पासून ढोरक्यानं गाईवासराचा नऊ रूपये हप्ता केला होता. नऊ रूपये हप्ता म्हणजे रामभाऊले जरा जडच वाटला होता. त्या परीस सकाळीच जाऊन चारापाणीही आणता येते व तिकडून १०.०० वाजता घरी आल्यावर डबल दुसऱ्याच्या शेतात दुपारची मजूरीही होते म्हणून त्याच्या बायकोनं ही त्याले दुजोरा देला होता. आज गावचा बजार असल्यानं दोघंही नवरा बायको कपड्याची खंदाळी व ईवे घेऊन वावरात गवत कापाले लगरबगर पैदलच गेले.

तिकडून गवत कापून आल्यावर आंगतोंड धुवून जेवणखावन करून त्याईले दैपारूनच अधिक दुसऱ्याच्या कामाले जायचं होतं. म्हणजे मोलमजुरीही होते व ढोरावासराले चाऱ्याचीही सुबिधाही होते.तसाही रामभाऊच्या वावराचा काही भाग हा नाल्याच्या काठावर असल्याने तो पळीत म्हणूनच ढोरं वासरं चारासाठी पळीत होता. पावसाळ्याचे दिवस असल्याने सकाऊनच चांगला दरदर करत पाण्याचा ठोक येऊन गेला होता. गवताच्या पात्यावरचं पाणी उन्हाच्या तीरपानं चांगलं चमकत होतं.दोघांनीही हातात ईवे घेऊन नाल्या, काठावरच्या पळीतातले दोन मोठमोठे साजरे गवताचे भारे काढले.साजऱ्या वासनच्या येलाले पीळ देऊन चांगले अळसले व टोंग्या,मेटयावर येऊन मोठ्या आंगताकदीनं दातमनगटं खात डोक्शावर उचलून नाल्यातल्या डोक्शा एवढ्या गवतानं झाकलेल्या सगरासगरानं ईचूकाटा पायत जरा हुशारीनं पाय टाकत गावचा गाळरस्ता धरला.

“वापशाचं ऊन म्हणजे बुराटच गोठ राज्या. एवढ्या कडक जयरी उन्हात हरणाच्याच तर पाठा काया पडतात तिथं आपली काय गोठ” एवढा मोठा गवताचा भारा घेऊन झपझप घराकडे चलतांना रामभाऊची भोकाभोकाईची बनेन घामाईच्या धाराईनं साजरीच ओलीचीप झाली होती. पायजाम्यातून पट्ट्यापटयाईची चिपकलेली अंडरपॅन्ट नकाशासारखी स्पष्टच दिसत होती. असलंनसलं जवळचं पाणी सरल्यानं घशाला कोरड पडलेला रामभाऊ पायजामाचे घोय खोसून तरातरा आंग हलवत गवताचा भारा घेऊन रस्त्यानं लवकर घर जवळ करायच्या आशेनं तरातरा पयत होता. त्याच्या बायकोचीही तेच हालत होती.तीचं आंगही सारं घामानं डबडबून
गेलं होतं. तिच्या डोक्यापासून तं रंगीबेरंगी गुंड्या असलेल्या झ्यापंरातून नीरा घामाच्या धारा पाझरत होत्या. तरी ढोरा, वासराईचीच्या कायजीनं गवताचा चारा घेऊन नवरा,बायको निघांली होती. संसाराच्या ह्या ओढाताणीत आपला लेकराबायांचा प्रपंच चालवता,चालवता खुपच व्हायची. सकाऊनपासून तं संध्याकाय पर्यंत सारी धावपयच असायची.

दोघेही गवताचे भारे घेऊन धापा टाकत लक्ष्मणच्या चक्कीजोळ आले.तथी आमासेक भारे खाली टाकून खाली रोवलेल्या गोटयावर बसून जरासाक दम खाल्ला.रामभाऊनं “आलं घर जरासक तं अंतर रायलं वं आता गायवाडयाचं ” त्याच्या बायकोनं तावातावानं जरासक राहो की फरासक राहो. सारी मान अकडली माह्यावाली,मंगापासून सारी पाठ ठणकून रायली माह्यी.”असं म्हटल्यावर त्याचाही जरा नाईलाजच झाला होता. बायकोच्या आग्रहास्तव घडीभर तोही थांबला. चुंबई करून त्यांन बायकोले भारा उचलून देला व त्यानंही समोरून बैल घेऊन पाणी पाजायले हौदावर चाललेल्या यंशोत्याले जरासक हातपदर लावायले अवाज देला. व भारे डोक्शावर घेऊन दोघंही कनंकनं घराकडे चालता झाली.

दोघांनीही भारे गायवाडयात टाकून बकेटीतल्या पाण्यानं हातपाय धुतले.व वयनाटीत ईवे खोसून गायवाडयाच्या मागंच असलेल्या खोपटाचा रस्ता धरला.रामभाऊनं न्हाणीत उभ्या उभ्याच आंगावर पाणी घेऊन फटाफट टावेलानं आंग पुसून भरंभरं बांडीस,पायजामा घातला. हातात झोरा घेऊन बाप्पुराव बुढयाच्या खटल्याची वाट धरली. बाप्पुराव बुढयाजोळून शंभरी हातात घेऊन काही मीरच्या, फिरच्या,वांगे,आलू,कांदे,भाजीपाला,लेकराईसाठी भातकं घेऊन बजारहाट केला. पानसुपारीच्या दुकानासमोर त्याची व गावाचं गुराढोराईचं दल्लार वायणाऱ्या बुढयाची त्याची भेट झाली.

“कितीदिवसाचा तरास देसानं राज्या, इस रूपयासाठी. तेवढ्या पैशात माह्यावाली पानसुपारी होते गरीबाची हप्ताभराची”असं बुढयानं म्हणताच ढोरं दल्लारातून काढल्यावर मांगच्या हिशोबातले थकीत रायलेले विस रूपये ढोरं चारणाऱ्याच्या हातात टेकवले व बजाराची थैली घेऊन घरी आला. बायकोनं हातातली थैली घेत बाप्पा लयच वाढखोडचा वखद लावला तुम्ही,जंगलात बाया निंघाचा वखत झाला ना.”आता भाजी कधी करावं,अन कधी खावं असं म्हणत कोपऱ्यातल्या डब्यातलं दोन भाकरीचं कोपरात पीठ घेऊन मोठमोठ्या जाडजूड भाकरी थापल्या.इकडे गंजात पालकाची भाजी धुयधाय करून त्यात तुरीची दाय टाकून शिजायला टाकली.
फोडणी द्याले टाईम नसल्यानं फटाफट लहानशा कढईत लालभडक चटणी तवून त्यांन आपलं हातानंच ताटलीत भाकर घेऊन शिजलेल्या पालकाच्या दायीसोबत खाले सुरूवात केली.

कुयरीच्या येलाच्या दोन कुयऱ्या तोडल्या, तोंडी लावाले बोरूची फुलं व गवाराच्या शेंगा घेतल्या बजारातून आणलेलं ताजं निंबू चिरचार केलं. जेवण झाल्यावर सारवलेल्या भितीवरच्या घड्याळीत टाईम पायला तर बरोबर अकरा वाजले होते. जंगलाच्या बाया निंघायचा टाईम झाला होता.बायकोलेही शामराव पाटलांच्या वावरात निंदाले जायची गरबळ होती.तीनंही लगरबगर भाकर,तुकडा खाऊन शिदोरी बांधली‌ व मोठ्यानं शेजारच्या शांताबाईले आवाज देल्ला. “शांते ओ शांते”…..आवाज देल्यानं शांतीच तीच्या दारासमोर समोर हजर झाली.”मायबाईवं साऱ्या बाया पुढे चालल्या गेल्या. मले वाटलं मीच मांग रायली की काय?असं तीनं म्हटलं.तोच कांताबुढीही डोक्शावर भरणं घेऊन तरातरा येतांना बेपटीत तीले झयकली.तीनं ही मंग दाराची साकई अंदरून ओढून हात घालून लावली. आपल्या नवऱ्याले रामभाऊले “कुत्रं गीतरं पायजा वं घरात, मी चाल्ली” म्हणत तरातरा रस्ता ओलांडत लवकरच दिसेनासी झाली.

रामभाऊनं हातावर साजरा तंबाखू घोटून तोंडात फक्की मारली.त्यांनही दुप्पटं खांद्यावर टाकून ग्रामपंचायतीच्या नळावर पाण्याची कॅन भरून घेऊन एकदा नळाच्या तोटीले तोंड लाऊन पोटभर डचाडचा पाणी पिऊन घेतलं.व शापीनं तोंड पुसत हातात ईवा घेऊन नदीकाठच्या वावराचा रस्ता धरला.कितीतरी वाळखोळचा रस्ता तुडवत तुडवत तो वावरात आला.वावरात आल्यावर दररोज सकाऊनच्या कोवळ्या वातावरणात मस्त लुसलुशीत व तजेलदार दिसणारं सोयाबीन भलकसंच सोकल्यावानी वाटत होतं. दैपारूनच्या कडक उन्हात सोयाबीनचे हाल पाहता पाहवत नव्हते.पेरणं झाल्यापासून पाण्याचा जरासाकही पत्ता नव्हता.काहीची पेरणं होऊन झाली तरी अगाईतानं वरच्या पाण्याचा थेंबही पायला नव्हता. पाण्याची थोडी फुरफुरी आली तर आली कुठं कुठं तर तेही नव्हती. त्याच्यात रामभाऊनं दुसऱ्याच वावर लागवननं केलं होतं.

“चला बुवा आपल्या एकरभर वावरात काय उत जयनार आपला.पुढं लेकराबाकरांचं शिक्षण पाणी आहे.” काहीतरी हातपाय हालवल्या शिवाय कसं जमनार. तसही आपून आपलं एकरभर वावर आपून वायतोच आहे तसं बाजूच्या ईशीनाथ बुढयाचंही वावर लागवणनं केलं तं काय बिघडलं” त्यासाठी त्यानं वीस हजार रुपये एकरानं आंधीच म्हणजे उन्हायातच पैसे दे,दाय करून वावर केलं होतं. थोडीसी पैशाची नूपूर सूपर म्हणून मे महिन्यातच घरच्या गाईचं एक धडधाकट गोरं बजारात ईकून लागवनच्या वावराचं पैसे बुढयाले मोजून देले होते. फणंफानं,तुराटया, पऱ्याटया पेटोपाटो करून वावर तयार केलं.उधार,पादार बि-बियाणं आणलं होतं.पेरणं झाल्यावर आठ दिवस तो शिदोरी व सातरी,काठी व बॅटरीक घेऊन एकटाच वावरात झोपायले यायचा.

रानडुकराईच्या तरासापायी वावरातचं ठिय्या मांडायचा.या मोकाट जंगली,जनावरांनी कास्तकाराले चांगलाच खेव आणला होता. निरानाम रखवाली करता करता त्याचा जीव हन्यास आला होता.नाही गेलं तं तिकूनही जूलूम होता. बाजूच्या दोन वावरं आड असलेल्या काशीराम बुढयाची दोन एकर पेरलेली तूर डुकराईनं उकरून रातभऱ्यात लंबी केली होती. तसं त्याचं अगाईत यावर्षी बरं होतं पण “घरात आल्यावर खरं म्हणा इचीबीन तं” रामभाऊनं सोयाबीनले निंदण,खुरपण देल्लं.डवरण देलं.फवारे काढले, रासायनिक खतं ही देल्ले होते.जोळ होता,नोता सारा पैसा पीक होईन या भाबड्या आशेपोटी जमीनीत ओतला होता. रामभाऊले एकटाच पोरगा तोही तालुक्यातील आयटीआयच्या शिक्षणासाठी गेलेला.यंदाच फिटरसाठी पोराचा नंबर लागला होता.

“महागाईचं शिक्षण आपल्या सारख्या फाटक्या माणसाकडून होते काय? या शिक्षणाचे तं पोराले खर्च पाणी,जेवणाची मेस , शिक्षणाचा खर्च असा दोन हजार रुपये महिना दर महिन्याकाठी पोराले पोटाले चिमटा घेऊन पाठवा लागत होता.तसा त्याचा पोरगा अभ्यासात हुशार होता.त्याच्या पोरांचा डीएडले नंबर लागणार होता.पण

“आपल्याकडून दहावीस लाख भराले काय इथं हरामाचा पैसा हाय” म्हणून त्यांन आयटीआय करून पोरगं दोन पैसे कमाऊन आणील.या आशेनं नाईलाजाने आयटीयात पाठवून दुधाची तहान ताकावर भागवली होती..पण हे यंदाचं साल खुपच कठीण दिसत होतं.पायता पायता अख्खा पावसाया कोळळाठन्न गेला होता.उसनं पासंन करून लोकाईनं आपली पीकं जगवली होती.

कोरडवाहू असल्याने विहिरीच्या पाण्याचीही सोय नव्हती. दैपारून तर पीकाकडे पाहायची हिंमत होत नव्हती.कडक उन्हायासारखं ऊन कयकत होतं.या कडक ऊन्हानं पीकं करपून गेली होती. उन सहन न झाल्यानं पिकं माना टाकत होती. जमीनीत चार बोटं ही ओली उरली नव्हती.पाण्याचा अजूनही पत्ता नव्हता. रामभाऊ पार हतबल होऊन गेला होता.काय करावं काय नाही सुचायला मार्ग नव्हता.”कावरली गाय अन् काटे खाये”अशी त्याची गत झाली होती.पण आता नाईलाज नव्हता.

“कुठूनच सायाची हे लागवननं वावर करायची दुर्बुद्धी सुचली अन आगीतून फुफाट्यात पडलो.” पण आता ‘अटकली कोल्ही मंगल बोले’,’ उपाय काय?अटकली खुटी तं जासीन कुठी’अशी त्याची गत झाली होती.

शेवटी भाद्रपद संपत आला.गणपती उठले पोया झाला. नवरात्र रो-रो करत आले. घटमांडणी झाली. त्या दिवसापासून सुरू झालेला मुसळधार पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. वावरात एवढं पाणी की सोयाबीन होय की नदी होय समजायले मार्ग नव्हता. जिकडे तिकडे पाणीच पाणी. वरूणराजा धो-धो बरसत होता.नदी,नाले एक झाले होते. पेरणी झाल्यावर तीन हप्ते पावसाचा पत्ता नव्हता.इकडून तिकडून शेंगा धरल्या तर पाणी सुधरू देत नव्हतं.दिवस भरल्यानं सोयाबीन सोंगावर आलं होतं. एकेका झाडाले दोन, दोन चार,चार शेंगा लागल्या होत्या.

तालुक्यातील तहसीलदार,मंडळ अधिकारी,तालुका कृषी अधिकारी,तलाठी, ग्रामसेवक आमदार,खासदार शेताच्या बांधापर्यंत आले पंचनामे करून गेले. शेकडो वाहनाचा ताफा चारआठ दिवस गावाभोवती घिरट्या घालत होता.झालेलं नुकसान पूर्णपणे भेटणं तर मुश्कील होतं पण सरकारतर्फे शेतकऱ्यांना फुलं नाही फुलाची पाकळी भेटन व आपली दिवाई आनंदात जाईल म्हणून शेतकऱ्यांना आशा लागून राहिली होती. एकदाचं कसतरी उजाडलं. चार,आठ दिवस चांगली उन पडली होती. शेतीची कामं सुरू झाली होती. चिखल म्हणसान तं माणसं टोंग्या, मांड्या गाऱ्यात फसत होती.

मजुरांचे थुंगेच्या,थुंगे सोयाबीन सोंगतांना दिसायचे. जिकडे जास्त पैसे तिकडं मजूरांचा लोंढा पयत होता.शेवटी घामाच्या कष्टानं पिकवलेला शेतमाल तर घरी आणणं होताच. मोठया मुश्किलनं दोघाई नवराबायकोनं मजुराची वाट न बघता करकरं आपलं घरच्या घरी सोयाबीनचं वावरं सोंगून काढलं. तडव आथरून सोयाबीनची भली मोठी गंजी मारली.ईकून तिकून मशीन वाल्याईले बलावलं. मशीनीच्या भोंग्यातून सोयाबीनचे दाणे कमी फफुळळाच जास्त निंघत होता. मशीनवालाही

“एवढया दोनशे रुपये पोत्यानं डिझेल पाण्याले पूरत नाही राजेहो”म्हणून कन्हारत होता.दाणेही ज्वारीच्या दाण्यांसारखे बारीक होतं. एकदाचं सोयाबीन तयार झालं. रामभाऊले समाधान वाटलं.पण पाहिजे तसा ॲवरेज बसला नव्हता.


रामभाऊ व त्याची बायको दोघंही नवरा बायको उन्हातान्हात दामन,सुतयीनं पोते शिवत होते. सय- संध्याकायच्या आगोदर घरी शिवलेले पोते घेऊन जाण्यासाठी शेजारच्या शंकऱ्याची रोजंदारीवर बैलबंडी सांगितली. भलीमोठी सोयाबीनची गंजी पाहून एकरी पाचचा अंदाज धरलेला रामभाऊ घरचं एकरभर व लागवणचं दोन एकर असं तीन एकरात मोठ्या मुश्किलीनं एकरी तीन पोत्यावर आला होता.पाणी बरोबर न आल्याने सोयाबीनचा दाणाही बारीक भरला होता. एकदाचं सोयाबीन घरी आणलं.तरी लोकाईपासुन आंगावर आणलेले उसने,पासने लोकाईचे पैसे दे-दाय करासाठी तयार झालेलं सोयाबीन त्यानं मुलतानसेठ मारवाडयाच्या चारशे सातमधे भरलं. त्यासाठी वाहतूक खर्च साडेचारशे रूपये खर्च केले.

एवढं करूनही मारकेटले भावही बरोबर भेटला नव्हता.सोयाबीन ईकून अडतीतून सोयाबीनचे पैसे पायजाम्याच्या खिशात ठेवून व पोत्याईची गुंडाळी बगलीत दाबून तो लेकराबाकरांसाठी काहीही विकत न घेता तरातरा डेपोची वाट तुडवत होता.रामभाऊ मनातल्या मनात आतापर्यंत पिक निघेपर्यंत वावराच्या किस्तकाडीले लावलेल्या पैशाईचा रस्त्यानं बोटावर हिशोब करत होता.दोन एकर वावर लागवन खर्च चाळीस हजार पेरणं बि-बियाणं खत निंदण, खुरपणाचा खर्च, फवारे. डवऱ्याईचा, सोयाबीन सोंगून मशीननं तयार करणं.एकरी दहा हजार खर्च म्हणजे दोन एकराचा वीस हजार.व घरचं एकरभर वावर म्हणजे एकूण खर्च सत्तर, पंच्याहत्तर हजार रुपये आला होता.

आता एकरी तीन पोते सोयाबीन म्हणजे तेही एक किंटंलचं पोतं भरत नाही.तरी नऊ गुणीले तीन हजार रुपये सोयाबीनचा भाव धरला तरी म्हणजे बरोबर २७००० हजार रुपये एवढे उन्हातान्हात दणके घेऊन बसलेला घाटा ४३००० हजाराचा होता. त्रेचाळीस हजार म्हणजे काही थोडीथोडकी रक्कम नव्हती. ऐन दुष्काळात तेरावा महिना म्हणजे रामभाऊसाठी जबर दणका होता. त्याच्या साठी घरी असलं,नसलं किडुकमीडूक व ज्याच्या भरवशावर त्याच घर चालत होतं असे दुधदुभतं देणारे ढोरंवासरं खर्ची पडले होते.हे गणित काढल्यावर त्याले चांगलीच घबराट सुटली.

आंगाले चांगला दरदरून घाम फुटला होता.हातापाय थरथर कापत होते. “धूत तीच्या मायची आफत सायाची तं” माणूस सरकं कराले जाते तं भोसडीचे असे वांदे होते. आता खावं काय अन दुसऱ्याचे आणलेलं द्यावं काय? संध्याकाय झाली होती गावची लास्ट टाईमची एसटी लागली होती. त्यानं मेनकापडाच्या पुरचंडीत लेकराईसाठी केळं ईकत घ्यासाठी जशीच्या तशी ठेवलेली पन्नासची नोट मोठ्या कष्टानं काढली व कंडक्टरले एक टिकीट मांगीतली.

कंडक्टरनं टिकीट देउन तिकीटाच्या मागच्या बाजूले पेनानं राहिलेली चिल्लर लिहून देली होती. तरी त्यानं उसनं अवसान आणून “पैसे राहिले ना हो कंडक्टर साहेब” कंडक्टरनं “हवं देतो ना मी कुठीसा पवून चाललो.तुम्ही फाट्यावर तं उतरा खरी राजेहो” असं म्हटलं पण तरी त्याची एसटीत गाव येईपर्यंत चुयबूय काही थांबली नव्हती.एकदाची एसटी गावच्या फाट्यावर थांबली व कंडक्टरनं चिल्लर पैसे त्याच्या हातावर टेकवले.स्टॅण्डवर उतरल्यावर त्याले पयले बबन्या भेटला

“रामराम हो रामभाऊ यंदा मार्केटले तुम्ही पयला नंबर लावला राजेहो” असं त्यांन आईकल्यावर पायातलं खेटरं काढावं साजरं बबन्याच्या तोंडावर मारावं असं रामभाऊले घडीभर वाटलं. त्यांन “झवताळ्ळा लाळ सायाचा तं त्या बबन्याचा मायबीन तं” असं म्हणून आलेला राग गिऊन घेऊन मुकाट्यानं घराची वाट धरली.

बायकोलेही कोण्या तोंडानं सांगावं,अशी तं त्याची पुरी पाचावर धारण बसली होती. आणलेले रिकामा पोत्याईचा बारदाना वसरीत फेकून हातपाय धुऊन तो बाजीवर चादर अंगावर घेऊन जरासाक झोपला.जरासाक गरम च्या घ्यावं यासाठी वावरात गेलेल्या बायकोची वाट बघत बसला होता. बायको आल्यावर तीनं

“मस्त गेलं काय वं सोयाबीन” असं म्हटल्यावर त्याच्या साऱ्या तयपावलात मुंग्या धावल्या. पण आता निसर्गाच्या या चक्रापुढं काहीही इलाज नव्हता.बायकोनंही

“तुम्हालेच तं लय आंगोन होती बापा,लागवणनं वावर कराची, आता कशी थंडी झाली.

निकामाचा ईयाचा खिया करणं.मी नाही म्हणो तरी गोठ घ्या काय तुम्ही? उलट माहयाच आंगावर खिजरू या ” ‘सोळा पिच्छा, जे झालं ते झालं च्या घ्या आता” जे आपली गत तेच साऱ्या जगाची ” असं म्हणत सिंगलभर च्या बाजीवर कलंडलेल्या रामभाऊच्या हातात देला.आलेली वेळ मारून नेल्या शिवाय दुसरा पर्याय रामभाऊ जवळ नव्हता. मात्र समोर वाया गेलेली वर्षभराची मेहनत त्याच्या डोयासमोर थयथय नाचत होती. त्याची असली नसली सारी नापिकीनं चांगलीच जीरवली होती.

विजय जय्सिंग्पुरे

कथालेखन -विजय जयसिंगपुरे

अमरावती.
भ्रमणध्वनी -९८५०४४७६१९

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.