
नभाला भिडावे निळ्या पाखरांनी – अरुण विघ्ने यांचा गझल संग्रह
अरुण विघ्ने सर संवेदनशील,आंबेडकर आणि गौतम बुध्द यांच्या विचारचा जबरदस्त पगडा असणारा व त्यांच्या विचाराचा सुगंध,परिमळ सर्वदूर आपल्या गझलेतून,कवितेतून फैलवणारा निर्मळ मनाचा साहित्यिक. ‘नभाला भिडावे निळ्या पाखरांनी’ अशी कळकळीची आस असणारा गझलकार, समीक्षक,स्फुट लेखक,व्यक्तीविशेष असा चौफेर लेखन करुन आपल्या वेगळ्या लेखन शैलीचा ठसा उमटविणारा साहित्यिक मित्र.
निळ्या पाखरांनी नभाला गवसणी घालत नवे गीत गावे. नव्याचा स्विकार करत असतांना प्रसंगी उपाशी राहून समजदार होत स्वकमाई करुन आपल्या कमाईचा हिस्सा आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी खर्च करावा.स्वाभिमानाने भीमाच्या विचार रथाचे सारथ्य करावे ,आपल्या लेखनीच्या द्वारे जनाचा उद्धार करावा.कारण भीमाचे उपकार आपण कदापी विसरू नये.स्वतः लोकसेवक होऊन बुध्द वचनास जागवावे.हा विचार. रुजवतांना अरुण सर म्हणतात …..
” नावामागे विघ्ने आहे
कुळही माझे लेले नाही
मी बुद्धाचा अनुयायी मग
काशी कोणी गेले नाही !”(पृष्ठ क्र.२५)
कारण भीमामुळेच संविधानाचे दान आपणास मिळाले आहे.जोवर घटना आहे तोवर लोकशाही चिरंतन आहे. असा ठाम विश्वास आहे.न्याय, समता अन् बंधुभाव हे भारतासाठी मिळालेले वरदान आहे.म्हणूनच संविधानाचे प्रत्येक पान मूल्यवान आहे, हे लक्षात घ्यावे. आकाश कवेत घेण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे.गौतमाच्या धम्मामुळे आपण चारित्र्यवान आहोत.महत्वाचे म्हणजे घटनेमुळेच आपण माणसात आलो आहोत याचा विसर निळ्या पाखरांनी करता कामा नये.स्व श्रमाने आपण आपला उरदनिर्वाह निळे पाखरे करीत आहेत.पण काही लोक चवदार पाणीही विषारी करण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा वेळी अरुण विघ्ने लिहितात…..
“चोचीत काल ज्याने केला प्रदान चारा
त्यागामुळे तयाच्या जगण्याकडे निघालो
अंधार काल होता आता उजेड आला
झोपू नका मुलांनो मी झोपडीत आलो.”(पृष्ठ ३०)
स्व कष्टाने उदरनिर्वाह करूनही लेकरांना सोयीसुविधा मिळत नाहीत.पाशवी कृत्य करणा-यांना आता धाक कोणाचा राहिला नाही.अशावेळी कायद्याची वेसण घातलेच पाहिजे.जातीचे प्राबल्य दिवसागणिक वाढत आहे.एकाच भाकरीचे तुकडे करुन सोन्यापरी मळ्याचे रान होत आहे.अमिशापोटी कित्येक आपले सत्व विकत आहेत.भलेपणाची राजरोज शिकार होत आहे.घटनेस बदलण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते शक्य नाही .हे लक्षात घ्यावे.आपला मार्गदाता कसा असावा याचे सुंदर विवेचन करतांना अरुण विघ्ने सर म्हणतात,, आपला मार्गदाता बुध्द जैसा मार्ग दाखवणारा असावा,ज्यावर भरवसा ठेवावा असा लोकनेता असावा,निव्वळ भाषणबाजी करणारा नसावा प्रत्यक्षात चळवळीत सहभागी असावा.आपले ध्येय साध्य करणारा अशोकासम राजा असावा,रमाई मातेचे ममत्व तर भीमासारखे पितृवत प्रेम करणारा कळकळीचा नेता असावा.रमाई मातेसमान त्यागाची भावना त्यांच्यात असावी.म्हणून भीमाचे कार्य महान आहे कारण ….
“झगडून जुन्या युगाशी लाथाडली गुलामी
तो सूर्य स्वाभिमानी तू आणलास दारा
शाळेत जा मुलांनो बाबापरी शिकाया
पर्याय हाच आहे समजून घ्या इशारा!”(पृष्ठ क्र. ४८)
आपल्या समाजासाठी भीमानी केलेला त्याग समजून घेतला तरच आपले जीवन सुखी होणार आहे. कारण भीमाची शिकवण त्याने केलेल्या अविरत त्यागात,प्रज्ञा,शील,कष्टात आहे आणि अशा साहेबांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपणारी रमाई.लाखो लेकरांना साथ देणारी रमाई,दु:ख कवटाळून घेत बाबासाहेबांच्या जीवनाची वात होणारी रमाई, जीवनात येणारे प्रत्येक आघात सोसत कोठेही आपल्या दु:खाची,वेदनेची वाच्यता न करता वाघिनीप्रमाणे संकटांशी झुंज देणारी रमाई, अर्धपोटी उपाशी राहून बाबासाहेबांना साथ देणारी रमाई, चार लेकरे गेल्याचं दु:ख पचवून कधीही अश्रूना मोकळी वाट करुन न देता हिम्मतीने जगणारी रमाई. असे जोशपुर्ण वर्णन वाचतांना बाबासाहेबांप्रती किती जिव्हाळा होता ,हे अरुण विघ्ने सरांनी आपल्या गझलेत वास्तव मांडून आपली निष्ठा जपली आहे. म्हणूनच ते अभिमानाने निळ्या पाखरांना सांगत आहेत ….
‘ उपकार बा भिमाचे,जाणून घ्या जरासे
नावाविना तयाच्या गाजू नये कुणीही
उत्कर्ष साधताना ऊर्जा दिली तयाने
पोळी गरम तव्यावर भाजू नये कुणीही”(पृष्ठ६३)
असा निर्वानाचा सल्ला देतात. कारण रमाईने सूर्यपुत्राला दिलेल्या ऊर्जाचे समाजबांधवानी याचे भन राखायला हवे. तरच आपण बाबासाहेबांचे सच्चे पाईक ठरु. कारण अनेक यातना सहन करणाऱ्या बांधवांच्या जीवनात चैतन्य बाबासाहेबांनीच भरले आहे.संविधान देवून सर्वांना सुखाचा मार्ग दाखवत आमचे हक्क आम्हास मिळवून देणरा बाबासाहेब एकटाच लढत होता.कित्येक लोक बाबासाहेबांना रोखण्याचा प्रयत्न करत होते .पण आमचा बाबा सर्वच बाबातीत वरचढ ठरला. हक्कासाठी अविरत कष्टत राहिला.
“मंदिर सोडले अन्, बोधी विहार धरले
कब्जा करुन पंडे,घुसले विहारबोधी”(पृष्ठ क्र.७६)
अशा वेळी एकजूट होण्याची व लढण्याची वेळ आली आहे.करण भीमाचे कतृत्वाचे मोल करताच येणार नाही.आता आपल्या चळवळीला हादरे बसत आहेत.लोकशाही वाचवतांना संविधान वाचवणे गरजेचे आहे.निळ्या पाखरांनी अफवेवर भरवसा ठेवू नये. सतत जागृत राहिले पाहिजे.शेवटी अरुण सर सांगतात…
“बुध्द जेथे युध्द नाही सांग त्यांना
दोष देणे ईष्ट नाही सादगीला !”(पृष्ठ क्र.८३)
अरुण सरांची गझल मनाला अस्वस्थ करते.मनाच्या गाभाऱ्यातून त्यांची गझल जन्म घेते.बाबासाहेबांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या गझला, बाबासाहेब प्रती असणा-या आस्थांचे प्रतिनिधित्व करुन स्व:जाणीवातून आत्मानुभव फुलत जातो. काळजाचा ठाव घेतं.समाजभानाची नस गझलकारांला चांगलीच कळली आहे.गझलेचे तंत्र तंतोतंत सांभाळत मनात सलणा-या भावनांना वाट करुन देणाऱ्या गझला अंर्तमुख करतात.
प्रत्येकाच्या घरी एक रामजी सपकाळ तयार व्हायला पाहिजे.तरच बाबासाहेबांच्या विचाराचा वसा चालवणारे बाबासाहेबांचे अनुयायी तयार होतील.जनावरा प्रमाणे जीवन जगणा-या समाजाला माणसात आणण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी केले.विचार जपणारी नविन पिढी तयार होणे आवश्यक आहे.निळ्या पाखरांच्या मनातील स्वर,वैचारिक भावना,वेदनेचा मागोवा अरुण विघ्ने सर घेतात.आपल्या प्रभावी शब्दांतून शेतकरी,कष्टकरी,सामान्य माणसाच्या भावनांचा वेध घेत अस्मानी संकटात शेतकरी उध्वस्त होत आहेत.त्यामुळे होणा-या त्रासाने हवालदिल झालेल्या कष्टक-यांच्या विषयी लिहितांना सर म्हणतात …..
“गुंठा जमीन कसता सारी हयात गेली
पोसेल तीच मजला रानास भापले मी
जखमा मनास झाल्या डोळ्यात पावसाळा
अग्नित वेदनांच्या आयुष्य तापले मी”(पृष्ठ क्र.१४)
असा अस्वस्थ भोवताल अधोरेखित करणा-या गझला वाचतांना मन अस्वस्थ होते.प्रत्येक गझल सहज समजणारी असून भवतालच्या वेदनेचे प्रतिनिधीत्व अरुण विघ्ने सर करतात.म्हणूनच भागवत बनसोडे लिहितात, “गझलकार अरुण विघ्नेची गझल म्हणजे रसिकांना सहज समजेल अशी,साध्या व लयबद्ध शब्दांची,गझलेचे तंत्र सांभाळणारी, मराठीपण जपणारी व जीवनातील सर्व विषयावर मार्मिक भाष्य करणारी ओघवती गझल आहे.भारतीय संविधानाच्या प्रत्येक शब्दाचे समर्थन करणारी गझल आहे.दंगली सोडून हातात लेखणी घ्यायला सांगणारी. ” अशी पाठराखण करतात तर सिरज शिकलगार लिहितात,”अरुण विघ्ने सरांनी गझलसंग्रहात शेती -शेतकरी, कुटुंबव्यवस्था , मानवी स्वभाव,देशाभिमान अशा विविध विषयांना स्पर्श करणा-या रचना लिहिल्या आहेत.”
अरुण सरांनी त्यांच्या गझलसंग्रहात भुजंगप्रयात,आनंदकंद,विद्युन्माला,व्योमगंगा, देवप्रिया,स्त्रग्विनी,वनहरिणी,वीरलक्ष्मी, मंजुघोषा,मनोरमा अशा गझल वृत्तामध्ये सहज व परिणामकारक अर्थपुर्ण गझला लिहून समाजातील अनिष्ट बाबीवर नेमके प्रबोधनात्मक लेखन केले आहे.शेती,माती,बांधावरच्या व्यथांना गझलांतून न्याय देण्याचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद असाच आहे.अभ्यासपूर्ण व साध्या सोप्या शब्दांतील मांडणीमुळे सर्वच गझलांचा अर्थबोध सहज होतो.सरांना लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा.!
अस्वादक
-मुबारक उमराणी,सांगली
मो.९७६६०८१०९७
गझल संग्रह : ‘नभाला भिडावे निळ्या पाखरांनी’
गझलकार :अरुण हरिभाऊ विघ्ने,रोहणा,वर्धा
प्रस्तावना/प्रकाशक : बाजीगर प्रकाशन,आंधळी,
जि.सांगली मो.९८९०५९७८५५
पाठराखण : जेष्ठ गझलकार भागवतजी बनसोडे
स्वागत मुल्य :२००₹.
——————————————-
- नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

——————————————-
——————————————-
संवेदनशील मनाची अस्वस्थ कैफियत,नभाला भिडावे,निळ्या पाखरांनी