
मला नको कुठलाही शिक्का : अशोक थोरात यांचा हृदयस्पर्शी लेख
सध्या मी मिक्स कॉलनीत राहतो. मिक्स कॉलनी ह्यासाठी म्हणालो की, मोठया शहरातून सुद्धा जात- धर्म निदर्शक वसाहती आहेत. माझ्या कॉलनीचे नावही हरिओम नगर आहे. माझा पत्ता मात्र पुष्पगंधा कॉलनी असा आहे कारण माझे घर हरीओम नगरातले शेवटचे आहे आणि माझ्या शेजारच्या घरापासून पुष्पगंधा कॉलनी सुरु होते. मला हरीओम पेक्षा पुष्पगंधा नाव सोयीचे वाटले. म्हणून माझा पत्ता ‘अशोक थोरात. पुष्पगंधा कॉलनी ’ असा झाला.
एकतर मी देव धर्म इत्यादी काही मानत नाही म्हणून हरीओम नावाची अॅलर्जी, आणि कवी वगैरे असल्यामुळे पुष्पगंधा नावाचे आकर्षण. मला अनेक पत्र ‘ अशोक थोरात. वि.म.वि. अमरावती ’ एवढयाच पत्यावर येतात. ह्याचा अर्थ मी फार प्रसिद्ध व्यक्ति आहे असा नाही तर टपाल भरपूर येत असल्यामुळे पोस्टमन ओळखीचे होऊन जातात आणि वि.म.वि.ला टपाल कार्यालय असल्यामुळे पत्र भटकत नाही. ( टेलिफोनचे बिलं आणि निमंत्रण पत्रिका मात्र हमखास तारीख निघून गेल्यावरच मिळतात. जाऊद्या . चलता है .
आजारी पोस्ट खाते आणि म्हातारा पोस्टमन असल्यावर दुसरे काय घडणार ? )
इंग्रज आपल्या देशात राज्य करण्यासाठी आलेत हे खरेच पण त्यांनी ह्या देशात सुधारणाही केल्यात . टपाल खाते ही त्यांचीच देण. माझ्या लहानपणी वडील गावातच मुख्याध्यापक असल्यामुळे घरी पोस्ट सुद्धा होते. आम्ही अस्पृश्य आणि पोस्टमन ब्राम्हण. ते आमच्या घरी पाणी देखील पीत नसत. आमच्या शेजारी भुरा महाराज नावाचे मारवाडी ब्राम्हण राहायचे. ( हे भुरा महाराज अविवाहित होते पण त्यांनी एक कनिष्ठ जातीतली बाई ठेवली होती. सॉरी ! लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते ते. यमुना तिचे नाव. माझ्याशी फार छान बोलायची. पुढे ती महाराजांना सोडून गेली.) त्यांच्याकडे ते पाणी प्यायला जात. ते जमेल तेव्हा भिक्षुकीही करत. मला नवल वाटायचे.
धर्म आणि जाती व्यवस्थेचे कोडे कळावे असे ते वय नव्हते मात्र अजूनही ते कोडे सुटत नाही. एकाच व्यक्तीला श्रेष्ठत्व आणि भिकारीपणा बहाल करावा व्यवस्थेने हे कसे ? तेही प्रतिष्ठा कायम राखून. वास्तविक परिस्थितीने ते फार गरीब होते अशातलाही भाग नव्हता. चांगले ऐसपैस मोठे घर होते. घरात देवीचे ठाण होते. दोन नवरात्रात मोठा उत्सव व्हायचा. वडिलांना आवर्जून जेवणाचे निमंत्रण असायचे. वडील जायचेही. मला आठवते, जेवायला जातांना ते सोबत ग्लास घेऊन जायचे. तसे सारेच त्याकाळात पाणी पिण्यासाठी सोबत ग्लास नेत असत. वडिलांना पंगतीत वेगळे बसवल्या जात नसे. मी मात्र कधीही कुणाकडे जेवायला जात नसे. अजूनही मला लग्न, वास्तू , तेरवी इत्यादी ठिकाणी जेवायला जायचा भारी कंटाळा.
मी शक्यतो च्याट मारतो किंवा समारंभ संपल्यावर घरी येऊन जेवतो , नाहीतर मस्त धाब्यावर. तर असे हे पोस्टमन गळ्यात झोळी अडकवून घरोघरी फिरत आणि अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी सांगत. म्हणजे मोबाईल पंचांगच. कधी कधी त्यांच्या ऐवजी त्यांचे लहान बंधू कृष्णा ड्युटीवर येत ते मात्र आमच्याकडे चहा, पोहे वगैरे घेत. म्हणजे ते कर्मठ नव्हते. अत्यंत गरीब आणि साधा सरळ माणूस. तर असो. मी मिक्स कॉलनीबद्दल सांगत होतो. लहानपणापासून मी मिक्स कल्चर मधेच वाढलो. माझा जन्म एकोणीसशे चौपन्नचा. अमरावती जिल्ह्यात नागपूर रोडवर गुरुकुंज मोझरी आणि तीवश्याच्या मध्ये तळेगाव ठाकूर फाटा आहे. हे माझं गाव. ‘ धग ’ कादंबरी लिहिणारे प्रसिद्ध लेखक उद्धव ज. शेळके इथलेच. फाट्यावरून एक किलोमीटर आत वसलेले हे गाव.
त्याकाळात पक्का रस्ता देखील नव्हता. साठ एकसष्ट साली रस्ता झाला असेल, लाईट सुद्धा त्याच्या आगेमागे कधीतरी. गावात बारा महिने झुळझुळ वाहणारी पिंगळा नदी. पलीकडे हिरवेकंच दाट बाभूळबन. शिवारात अजून चारपाच लहान नदया, ओढे. तेव्हा लोकसंख्या दोन अडीच हजार असावी. आता अंदाजे पाच सहा हजार असेल. अश्या समृद्ध गावात दलित वस्तीत आमचे घर. पुढे आम्हा लहान मुलांवरुन भांडणे व्हायला लागलीत. मग वडिलांनी अचानक मध्यवस्तीत एक घर विकत घेतले. घरमालक रजपूत समाजाचा निवृत्त सैनिक होता .
सुरवातीला शेजाऱ्यांनी खूप विरोध केला. त्याला अनेक प्रलोभने दाखवली. पण तो पक्का होता कशालाच बधला नाही. आम्ही एकोणसाठ साली नव्या घरात राहायला आलो. मी तेव्हा चार पाच वर्षाचा असेल. घर मातीचे कौलारू पण ऐसपैस होते. घरापुढे मोकळी प्रशस्त जागा. घरामागे देविदास शिपी राहायचे. पलीकडे चुटके कासार आणि पोद्दार नावाचे सोनार. ते सोन्याचांदीचा धंदा करायचे पण घरी अठराविश्वे दारिद्रय. एवढा गरीब सोनार मी उभ्या आयुष्यात पाहिला नाही. त्यांचे खरे आडनाव बांगरे पण गावातील सारे त्यांना पोद्दार म्हणजे पोतदार म्हणायचे. स्वभावाने अत्यंत गरीब आणि प्रेमळ. पण घरात सदैव भांडणे , मारझोड आणि शिव्या .
दारिद्र्यामुळेही असेल कदाचित. असे हे पोद्दार माझ्यावर मात्र खूप माया करायचे. दिसलो की माझ्या हनुवटीला हात लावायचे, पाठीवरून हात फिरवायचे. आता तर लोकांना स्वत:च्या मुलांशीही बोलायला वेळ नसतो. अजून थोडे पुढे मदन महाराज नावाचे मारवाडी ब्राम्हण राहायचे . पांढरीशुभ्र भरदार दाढी आणि जटा वाढलेल्या. कायम रुद्राक्षाची माळ जपत बसलेले. आम्हा मुलांना त्यांची खूप भीती वाटायची. त्यांची पत्नी खूप कडक स्वभावाची पण अतिशय प्रेमळ होती . जातायेता मला हमखास थांबवायची. गोष्ट सांगायला लावायची. आमच्या घराशी अगदी लागूनच बाबुसिंग नावाचे राजपूत राहायचे. त्यांची मुलं रमेश, निर्मला माझ्याच वयाची. क्वचित भांडणं व्हायचीत पण आमचे संबंध कायम सलोख्याचे राहिलेत. त्यांच्याच बाजूला गाडगे कुटुंब. हे बारी समाजाचे. त्यांच्याशी आमचा घरोबा. महादेवराव गाडगे यांची पत्नी पार्वतीबाई ही वडिलांची मानसकन्या.
अजूनही मी कधी गावी गेलो की चहापाणी, नाश्ता त्यांच्याकडेच. घरासमोर डेरे कुटुंब. हे कोष्टी. घराच्या दुसऱ्या कडेला हिवरे हे कुणबी. त्यांच्या बाजूला जीभकाटे, पारधी हे तेली समाजाचे. म्हणजे आमच्या घराभोवती खऱ्या अर्थाने अठरापगड जातींचा गराडा. पण जातीचा जाच मात्र कधीच वाटयाला आला नाही. हरणे, डहाके हे मराठा तेली समाजाची माणसं वडिलांचे खास मित्र . मला अजून आठवते, चौथ्या इयत्तेपर्यंत मला कधी लेखणी विकत घ्यावी लागली नाही. बाजारओळीत ह्या लक्ष्मणराव हरणेंचे किराणा मालाचे दुकान होते. शाळेत जातांना ते रोज मला एक लेखणी देत असत. ती हिशोबात नसे. दुसऱ्या गल्लीत कुंभार समाजाची घरे होती. रमेश, मोतीराम हे माझे बालमित्र, रमेश काळबांडे ह्याच्या घरी मी कायम पडलेला असे. कधी कधी जेवणही त्याच्याकडेच. पण कधीही परकेपणाची वागणूक मिळाली नाही.
ही गोष्ट एकोणविसशे एकसष्ट ते सत्तर ह्या कालखंडातील. विचार करा जिथे वीज, रस्ते पोहचले नाहीत अशा विकासापासून दूर असलेल्या गावात राहूनही मनावर ओरखडा उठावा असा एकही अनुभव माझ्याजवळ नाही. बरं ही माणसं फार शिकलेली होती अशातलाही भाग नाही. फार संपन्नही नव्हती. मग एवढी समज कुठून आली असेल त्यांच्यात ? श्रीकृष्ण तिजारे हा असाच माझा जिवलग बालमित्र. अजूनही आमची मैत्री घट्ट टिकून आहे. अप्पासाहेब ठाकूर, डॉ. दिलीपराव देशमुख हे दिवंगत मित्र मला अहो जाहोच म्हणत. डॉ. नाना पोजगे, संजय आढाव इत्यादी जिगरी दोस्तही खूप आदराने वागतात. मला वाटते हा वारसा मला आजोबांकडून मिळाला असावा. माझे आजोबा हनुमंतराव ह्यांचा अन् गावातील माळी समाजातील प्रतिष्ठित बाजीराव बोबडे ह्यांचा खास घरोबा होता म्हणतात .
एकमेकांशिवाय क्षणभरही राहत नसत. घरादारात मुक्त वावर. ही गोष्ट एकोणविसशे पंचवीस तीसच्या काळातली. ज्या काळात अस्पृशांना सड्यावरही उभे राहू देत नसत. एवढे सारे सांगितल्यावर आता तुम्ही म्हणाल की, ह्याचे सर्व मित्र सवर्णच होते का ? तर नाही. बाबाराव , आनंदा , अन्ना थोरात, फिलीप , पंजाब वानखडे असे जातीतलेही जिगरी दोस्त होते पण ते फार सतावायचे . मलाही मजा वाटायची त्यात. माझ्या शाळेच्या रस्त्यावर राघोर्ते यांचे घर होते. तिथल्या ओट्यावर राघोर्ते आजी बसलेली असे. अतिशय प्रेमळ. मी शाळेत जात , येत असता ती हटकून माझ्याशी बोलायची . तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती मला अहो, जाहो बोलायची. ‘ जेवले काय दादा ? ’, ‘ आज उशिरा चालले दादा, का बरं ? ’ ही तिची वाक्य. एका आठ दहा वर्षे वयाच्या मुलाला सत्तर वर्षाची आजी कायम ‘ अहो-जाहो ’ संबोधते. अशक्य वाटते ना ? पण मी हे अनुभवले आहे.
एक रामभाऊ कातोरे नावाचे अत्यंत सज्जन गृहस्थ होते.
माझ्यापेक्षा दहा पंधरा वर्षांनी मोठे असतील. ते मला कधीही ‘ अशोक दादा ‘ ह्या संबोधनाशिवाय बोलले नाहीत. ‘ ईश्वर टॅ्व्हल ’चे संस्थापक दिवंगत उमाकांत उमप, तसेच अंबादासपंत बेलसरे, कम्युनिस्ट नेते रामभाऊदादा आढाव , गहूकर गुरुजी, ठाकुरदासजी जाजू , वासुदेवराव तीरमारे , वामनराव पवार ही सारी जेष्ठ मंडळी मला अशोकभाऊ, अशोकराव असे आदरार्थी संबोधत. माझे वय त्यावेळी फक्त सतराअठरा. त्यातही मी नॉनमॅट्रीक. खऱ्या अर्थाने मोठी असलेली माणसं लहान माणसांना मोठेपणा देतात, सन्मान देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवतात हेच खरं. जेष्ठ सहकार नेते अण्णासाहेब दिवे ह्यांच्यावर एका जाहीर कार्यक्रमात मी टीका केली. तरीही त्यांनी मला कायम सन्मानानेच वागविले. किती हा मनाचा मोठेपणा ! ही सर्व मंडळी कमीअधिक प्रमाणात धार्मिक प्रवृत्तीची होती. पण माझे कट्टर नास्तिक असणे कुठेही प्रेमाच्या आड आले नाही.
हे सगळं लिहितांना मी सर्वांच्या जातींचा उल्लेख केला मात्र स्वत:चा उल्लेख केवळ अस्पृश्य असा केला, जात सांगितली नाही. ह्याला दोन कारणे आहेत. एक म्हणजे लोकांनी मला मातंग, महार, चर्मकार, सफाई कामगार काहीही समजले तरी चालते. आणि दुसरे असे की माझे अनेक घनिष्ट मित्र असे आहेत की ज्यांना अजूनही माझी जात माहित नाही व मला त्यांची. मला मनोमन असे वाटते की आम्हाला कधीच परस्परांची जात कळू नये. ज्यांना माहित आहे त्यांना असू देत. त्यामुळे काही फरक पडत नाही. माझ्या कॉलनीत राहणाऱ्या एका बड्या व्यक्तीचे म्हातारे वडील अधूनमधून त्यांच्याकडे मुक्कामी असत. आम्ही छान गप्पा मारायचो. एकदा त्यांनी मला विचारले; ‘ गुरुजी तुमचा कोण समाज ? ’ मी म्हणालो , मी जात, धर्म मानत नाही. तुम्ही काहीही समजा. ते म्हणाले ‘ म्हणजे कसे ? ’ मी म्हटले ‘ तुम्ही मला मातंग, मेहतर समजा किंवा ब्राम्हण मराठा समजा, मला काही फरक पडत नाही ‘ त्यावर ते उत्तरले ‘ काहीच फरक पडत नाही ? मग मास्तर तुम्ही संत कोटीतले असले पाहिजे नक्कीच. ’ हे त्यांचे उत्तर माझ्यासाठीच नव्हे तर तमाम जात धर्म न मानणाऱ्यांसाठी फार मोठे गौरवपत्र आहे असे मला वाटते. शेवटी माझ्या एका गझलचा शेर देऊन थांबतो. “ माणूस म्हणुनी ओळख माझी.. मला नको कुठलाही शिक्का ” .
– अशोक थोरात
—————————————————————
नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

—————————————————————
अशोक थोरात :चैतन्याच्या चार गोष्टी …
—————————————————————