Monday, October 27

गावगाड्याचे सांगाती: अलुतेदार आणि बलुतेदार – भारतीय ग्रामीण जीवनातील आधारस्तंभ

गावगाड्याचे सांगाती: अलुतेदार आणि बलुतेदार – भारतीय ग्रामीण जीवनातील आधारस्तंभ

BT1OK

गावगाडयाला महत्वाची सेवा पुरविणाऱ्या सोबत्यांपैकी अलुतेदार व बलुतेदार हा समाजाला वा गावरहाटीला सेवा पुरविणाऱ्या जातींचा एक समूह आहे.हा वर्ग गावरहाटीची कामे करून लोकांना सुविधा पुरविण्याचे पिढीजात काम करतो.यांचे महाराष्ट्रातील प्रमाण अत्यल्प म्हणजेच ३०% पेक्षा अधिक आहे, आणि हा इतर मागास वर्गामध्ये मोडतो. या अलुतेदारांनाच ’नारू’ असे म्हणतात.

कासार,कोरव, गोंधळी, गोसावी, घडसी, ठाकर, डवऱ्या, तराळ, तांबोळी, तेली, भट, भोई, माळी, जंगम, वाजंत्री, शिंपी, सनगर, साळी, या अठरा गाव कामगारांचा समावेश गावगाडयात अलुतेदारांमध्ये होत होता. याशिवाय इतर भटक्या जाती व जमातींचाही ग्रामीण विभागाच्या अर्थव्यवस्थेत व गावरहाटीमधे महत्त्वाचा वाटा होता.

अलुतेदारांची यादी काही ठिकाणी वेगळी दिली आहे, ती अशी :
कळवंत, खाटीक, गोंधळी, घडशी, डावऱ्या, तराळ, तांबोळी, माळी, शिंपी, साळी, सोनार हे बारा अलुतेदार. तर काही ठिकाणी १२ अलुतेदारांची ही यादी कळवंत, घडशी, चौगुला, मुलाणा, ठाकर, डवऱ्या, तराळ, तांबोळी, तेली, माळी, साळी, सोनार अशी दिली आहे. याचा अर्थ असा की गावागावाप्रमाणे अलुतेदारांची यादी कमीजास्त प्रमाणात वेगवेगळी असे. पुन्हा प्रत्येक गावात हे सर्व अलुतेदार असतीलच असे नाही. एक नक्की की, अलुतेदार हे बलुतेदारांच्या मानाने दुय्यम असत.महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य असल्याने पूर्वी खेडेगावांमध्ये वस्तू-विनिमय पद्धत अस्तित्वात होती या पद्धतीच्या केंद्रस्थानी शेतकरी होता. म्हणजेच शेतकरी हा धान्य पिकवत असे आणि जे शेतकरी नव्हते ते शेतकऱ्यास व इतरांस महत्वाच्या सेवा पुरवीत असत. यामध्ये जे शेतकऱ्याच्या नैमित्तिक स्वरूपाच्या गरजा पुरवत त्यांना अलुतेदार (नारू) तर जे महत्त्वाच्या व नेहमीच्या गरजा भागवीत त्यांना बलुतेदार (कारू) असे म्हणत. हे गावाचे सेवेकरी असत आणि पिढ्यान्‌पिढ्या तेच ठराविक काम करीत.

काही ठिकाणी बलुतेदारांची यादी खालील प्रमाणे :

त्यानुसार बलुतेदारांची संख्या एकूण बारा होती. कुंभार, कोळी समाज, गुरव, चांभार, मातंग, तेली, न्हावी, परीट, महार, लोहार, सुतार, जोशी, पूर्वी प्रत्येक खेडेगाव हे स्वयंपूर्ण होते.कारण गावपातळीवर कारागीर गावातील लोकांच्या गरजा गावातच भागवत. त्यामुळे त्यांना इतर ठिकाणी जाण्याची त्यांना गरज भासत नसे.

  हे वाचा – शारीरिक शिक्षणाचे महत्त्व..!

गावरहाटीमध्ये वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असल्याने व आपापल्या परीने कामधंदा करून समाजव्यवस्थेला हातभार लावायचे. त्यामधे कुंभार सुतार,तेली, लोहार, चांभार,न्हावी ,कोळी,गुरव ,मातंग समाजाचे लोक असायचे. परंतु गावे जर मोठी असतील तर त्यामध्ये पाणभरी कोळी, तेली, तांबोळी, कुंभार,महार, परीट, गुरव व मातंग समाजाचे लोक असायचे.त्यांची काम करण्याची एक वेगळी पद्धत होती. त्यांनी पुरविलेल्या सेवेच्या बदल्यात रोख रक्कम वा पैसा न देता वस्तुविनिमय प्रणाली अस्तित्वात होती. समाजव्यवस्था त्यांना धान्याच्या किंवा इतर वस्तूंच्या रूपात मोबदला मिळायचा. जो त्यांच्या दैनंदिन उपजिवीकेचा महत्वाचा भाग होता. त्यापैकी काही महत्त्वाचे घटक अभ्यासूया

BT2OK

लोहार :

भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे तो गाव खेड्यातून वसलेला आहे.मोठ्या प्रमाणात कष्टकरी शेतकऱी यांचा मुख्य व व्यवसाय हा शेतीपूरक जोड धंद्यावर अवलंबून असल्याने शेतीपयोगी साहित्य भरपूर असायचे. त्यामुळे गावात लोहार समाज असायचा.सुगीच्या वेळी गावातील मजुरांचे , कास्तकार लोकांच्या शेतीपयोगी वस्तू जसे कुऱ्हाड,कोपळ,विळे,फावडे,वखराच्या व डवऱ्याच्या लोखंडी पासा या वस्तूंना धार लावून देण्याचे काम काम लोहाराला करावे लागायचे. बैलगाडीच्या चाकजोडी बसवून देणे,आवणं,आगबल्ला बसविणे व दुरूस्ती, ही सारी कामे करावी लागत.लोखंडी नागरांचे साखळदंड बनविणे नांगर, कुळव,लोखंडी सामान इत्यादी सर्व प्रकारच्या साहित्यांची डाग, दुरूस्ती हे लोहार करून देत.

सुतार :

शेती अवजारांची मधे लाकडी सामानाच्या दुरूस्ती व देखभालीसाठी प्रत्येक गावात सुतार असायची.ती ही सर्व जबाबदारी पार पाडायची व त्या बदल्यात वर्षाकाठी लोकांकडून व गावातील मोठमोठ्या खटल्यांतून धान्य घ्यायची.
शेतकऱ्यांच्या शेतीची अवजारे दुरुस्ती जसे वखर,डवरे,जूवाळी,बैलबंडी रूमणे व अन्य शेतीसाठी लागणाऱ्या आऊत भांड्याची निर्मिती यांच्या कडे रहायची. लाकडांच्या घराचे बनविणे, दरवाजे कलाकुसरीच्या लाकडी वस्तू , धान्याच्या कणग्या तयार करणे,गावातील देवळांची लाकडी कामे,टिनाच्या सपऱ्या,खुर्च्या,आलमाऱ्या भिंतीतील कपाटे,मंदिरांचे लाकडी कोरीव रथ,छकडे,दमन्या मोठमोठ्या जमीनदार लोकांचे वाडयांचे बांधकाम नक्षीकामांची जबाबदारी यांची असे.

● हे वाचा – दोस्ती ; रामू आणि मोहन यांची कहाणी

चांभार :

सुतारानंतर बलुतेदारांमध्ये चांभाराचा हा गावपातळीवर महत्वाचा घटक असायचा. चांभाराला गावातील लोकांची चामड्याच्या चपला,जोडे पायताणे दुरुस्त करून वा नवीन बनवून देण्याचे काम करायचा. यामध्ये तुटलेल्या वहाणा,चपला, जोडयांना पॉलीश व नदीवरून पाणी भरण्यासाठी रेड्यावर किंवा म्हशीच्या पाठीवर लादणाऱ्या व पाणी वाहणाऱ्या नवीन चामड्याच्या पखाली बनविणे व डाग,दुरुस्ती करण्याचे काम चांभारांना करावे लागायचे. यासाठी चांभाराला वर्षाकाठी वा सप्ताहाला बाजाराच्या दिवशी चार पायली धान्य व सुगीच्या वेळी धान्य त्यांना मिळायचं.

न्हावी :

या नंतर गावपातळीवर महत्वाचा घटक म्हणजे न्हाव्याचा. न्हाव्याला गावातील साऱ्या लोकांची दाढी ,कंटींग विशेषतः मोठमोठ्या लोकांच्या वाड्यावर जाऊन त्यांच्या व घरातील लहान मुलांच्या हजामतीचे काम करायला लागायचे. लोकांच्या लग्नाची जेवणाची आमंत्रण,अक्षदा,विडा पोहचण्याची जबाबदारी ही न्हाव्याची असायची. त्याबद्दल्यात त्यांना धान्याच्या रूपाने लोकांकडून बलुतं भेटायचं. गावपातळीवर लग्न,मुंजी, मुलांचे जावळ काढणं त्याशिवाय मेलेल्या माणसाच्या दहाव्याचा वा तेरवीच्या वेळी नदीवर मुंडन, हजामत कराव्या लागायच्या. विशेष करून आठवडी बाजारात चौथऱ्यावर एखादं पोतं अंथरून वस्तरा घेऊन लोकांच्या हजामती करण्यापासून तर गावातल्या म्हशी भादऱ्यापासूनची सारी जबाबदारी ही न्हाव्याची असे.

कुंभार :

त्यानंतर गावपातळीवरील कामं करणाऱ्या बलूतेदारांमधे कुंभार समाज येतो. गावातल्या लोकांना नदीकाठची गाळाची माती वापरून त्यावर मेहनत घेऊन घोड्याची लीद कालवून त्यापासून लोकांना लागणारी संसारोपयोगी गाडगी, मडकी तयार करून देणे. म्हणून कुंभार सुद्धा बलुतेदारांचा एक घटक होता. त्याशिवाय दिवाळीच्या सणासुदीला मापलं,कवेलू ,मातीची खेळभांडी,पोळ्याला मातीचे बैल,चुली,रांजणं, पाणपोईचे मोठे रांजण, पाण्याची नांद, मातीचे मडके, लग्नघरी सर्व देवकुंडीचं सामान,मातीचे गंगाळ इत्यादी बनवून देण्याची जबाबदारी त्यांची असायची. त्याबद्दल त्यांना धान्य देण्याची प्रथा समाजात अस्तित्वात होती.

गवंडी :

त्यानंतर बलूतेदारांमधे महत्वाचा बांधकाम विभाग म्हणजे गवंडी समाज असायचा.प्रत्येक गावामध्ये हे गवंडी लोकं मोठमोठ्या घरांची,माडी,धाब्यांची उंच गड्या, बुरूजांची,तुळईची बांधकामे करायचा. त्यांच्याकडे माती वाहण्यासाठी गाढवे असत. या गाढवावरून माती वाहण्याचे काम करून त्या मातीपासून वा चुनाभट्टीतील चुन्यापासून घरांच्या भिंती व वास्तू बांधून देत असत.मातीचा गारा करून त्यामध्ये कुटार,गवत सडू देऊन ती माती साजरी तूडवून वा रेडा फिरवून मऊ लोण्यासारखी करून घरांची लिपछाप, डागडुजी करत. त्या मोबदल्यात त्यांना धान्याच्या रूपाने लोकांकडून बलुतं मिळायचं

तेली :

प्रत्येक गावखेडयामध्ये तेली समाजाचे लोक राहत असत यांचा मुख्य धंदा तेलबियांपासून तेल काढून ते लोकांना पोहचविणे. यासाठी प्रत्येक तेल्याकडे मोठ्या दगडाची वा बैलांवर चालणारी लाकडी तेलघाणे असायची. हा समाज चिकाटी व उद्योगी होता. शेतात पिक घेऊन तयार झालेल्या पिकांपासून जसे जवस शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया, सरकी किंवा इतर तेलबिया या लाकडी घाण्यात टाकून घाण्याला बैलाच्या सहाय्याने सतत फिरवून त्यावर दाब पडून त्यापासून तेल काढण्याची पारंपरिक पद्धत तेली लोकांकडे होती. शहरातील मुख्य बाजारपेठेत वा गावातल्या आठवडी बाजारात ते तेलाची व त्यापासून निघालेल्या ढोरांसाठी उपयुक्त असलेल्या पेंडेंची म्हणजे ढेपीची विक्री करत. त्याबदल्यात त्यांना पैसे मिळायचे. आधुनिकीकरणामुळे तेलघाण्याची जागा आता रिफायनरी मशिनरींनी घेतली. तरी अजूनही पारंपरिक तेलघाणे काही प्रमाणात अस्तित्वात आहेत. गावातल्या प्रत्येक देवळामधे पुजा,अर्चा करण्यासाठी, दिवाबत्तीसाठी तेल पोहचण्यासाठी तेल्यांची पिढीजात परंपरा होती. ती त्यांनी गावरहाटी म्हणून शेवटपर्यंत जोपासली.

तांबोळी :

त्यानंतर बलूतेदारांमधे ता़ंबोळी समाज हा महत्त्वाचा घटक होता. त्यांचे नाग वेलींच्या पानांचे तांडे होते.
बारा बलुतेदार म्हणून त्यांना समाजात मान्यता होती. गावामध्ये असणाऱ्या लग्नसमारंभ सण,पोथीपारायणांचं उद्यापणं,धार्मिक पूजा, उत्सव, यात्रा,चातुर्मास, अधिकमास इत्यादी धार्मिक कार्यासाठी नागवेलीच्या म्हणजे कात, चुना टाकून खाण्याचा विडा किंवा पानांची मोठ्या प्रमाणावर विक्री करून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्या समाजाला विशेष महत्त्व होते. त्याचप्रमाणे अनेक सण समारंभात, लग्नकार्यांत जेवणानंतर विड्याची पाने खाण्याची म्हणजे तांबुलविडा खाण्याची प्रथा अस्तित्वात होती व अजूनही आहे. देवीला सुद्धा तांबूलविडा देण्याचं पारंपरिक काम या समाजाकडे आवर्जून होतं. त्यासाठी विड्याची पाणी पुरवण्याचे काम हे तांबोळी समाजाला करावं लागायचं. गावापातळीवर मोठमोठया खटल्यात वा लोकांच्या घरोघरी पानांची पेटारे डोक्यावर घेऊन खाण्याची पानं पुरविणं वा बाजारहाटी विकणे यावर त्यांचा प्रपंच चालायचा. यासाठी त्यांना वर्षभरातून एकदा धान्यरूपाने बलुते द्यावे लागत असे.

BT3OK

मातंग :

गावा गावामध्ये विविध कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या संदर्भात दवंडी देण्याचे कामे मातंग समाजातील लोकांना करावं लागत असत. त्याशिवाय गावातली मेलेली ढोरांच्या चामड्यापासून वाद्य बनविणे, शेतात सोकारी म्हणजे रखवाली करणे, केकताडा पासून फडे बनविणे व ते बाजारात विकणे. आंब्याची पाने सणासुदीला गावात देऊन त्याबदल्यात धान्य घेऊन आपल्या परिवाराची गुजराण करत.मयतांची लाकडे फोडून देण. ई कामे देखील ते करत असत.

महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला अवस व ग्रहण मांगण्याची प्रथा होती. त्यासाठी मातंग समाजातील स्त्रींया गावातील घराघरांमध्ये येऊन शिळेपाके अन्न, धान्य घेऊन जात असत. गावपातळीवर मातंग समाज हा महत्त्वाचा घटक होता. वर्षाच्या सणासुदीला पोळ्याच्या दिवशी तसेच दसरा, दिवाळीला गावातील प्रत्त्येक घराघरां समोर वाद्य वाजवून गावसंस्कृती जोपासल्या जात असे.गावातील लग्न कार्य प्रसंगी हलगी डफ, वाजंत्री वाजवण्याचे काम सुद्धा ते करत असत.

गुरव :

गावपातळीवर महत्वाचा दुसरा घटक म्हणजे गुरव समाज होता. त्या काळात गावागावांमध्ये देवळे, मंदिरं होती. विशेष करून शंकराची दररोज पूजा अर्चा करण्याचे काम गावातील गुरवांना करायला लागायचे. त्याचप्रमाणे मंदिराची संपूर्ण देखभाल,आरती , दिवाबत्ती करण्याची व घरोघरी बेलपत्री वाटण्याची जबाबदारी ही मुख्यत्वे गुरवांकडे होती. गुरुवांना सुद्धा अनेक गावागावांमध्ये इंग्रज काळात जमीनदारांनी देवळाची साफसफाई पुजा,अर्चा, मंदिराची दिवाबत्ती करण्यासाठी इनाम जमिनी दिल्या असल्याची दप्तरी नोंद सापडते.

महार :

गावपातळीवरील महत्वाची सेवा पुरविणारा समाजघटक म्हणजे महार होतं. ते शरीराने धष्टपुष्ट व काटक असल्यामुळे गाव संरक्षणाची जबाबदारी त्यांची असायची. गावात जर कुणाचा मृत्यू झाला तर त्या माणसाच्या नातेवाईकांना बाहेरगावी कुठलीही दळणवळणाची साधनं उपलब्ध नसतांना पायदळ जाऊन रातोरात सांगावा देण्याचे काम महार करत असत. त्याचप्रमाणे गावातील मेलेले जनावर दूर ओढून नेण्याचे काम ते करत असत.
त्यावेळी हा समाज खूपच उपेक्षित व अज्ञानाच्या गर्तेत होता. त्यांना सुद्धा वर्षाकाठी बलूते देण्याची पद्धत होती.

काही महाराकडे उपजीविकेचं साधन म्हणून पारंपरिक वाडवडीलापासून घरी शेती होती ते शेती करत असत. बैल, म्हशी गाय, गुरेढोरे जनावरे पाळत असत. त्यांनी केलेल्या पराक्रमाचं बक्षीस म्हणून इंग्रज काळात इंग्रजांनी शेतजमिनी सुद्धा दिलेल्या होत्या. त्याला महार वतन असे म्हणत.पंरतु बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करून बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी समाजाला शिक्षणाचा व शिकण्याचा मूलमंत्र देऊन गावरहाटीची ही कामे नाकारून शिका, संघटित व्हा संघर्ष करा असा मूलमंत्र देऊन त्यांच्यामध्ये आत्मभान जागृत केले व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले.

पाणाडी कोळी :

तसेच या बलूतेदारांमधे सेवा देणारा पाणाडी समाज होता. म्हणजेच कोळी समाज होता.तो गावरहाटीचा प्रमुख पाणीपुरवठा विभाग होता. लग्नकार्य प्रसंगी म्हणा ना दैनंदिन जीवनात म्हणा रेड्याच्या किंवा म्हशीच्या पाठीवर पखाल टाकून गावाला पाणीपुरवठा करण्याचं काम हा समाज वर्षानुवर्षे निमूटपणे करायचा. तसेच गावच्या नदी,नाल्यामधे जाळे टाकून मासे पकडून ती बाजारहाटात विकून चार,दोन पैसे कमविणे व आपला उदरनिर्वाह चालवून गावगाडयाची सुद्धा सेवा करणे इ. महत्वाची कामे होती.

गावरहाटीतील असाच महत्वाचा घटक म्हणून परीट म्हणजे धोबी समाज हा एक बलुतेदारापैकीच आहे. त्याला गावातील लोकांची घरोघरीचे कपडे गोळा करून ते धुऊन, इस्त्री करून, घड्या घालून घरोघर पोचवणे हे महत्त्वाचे काम होते.

धोबी :

गावातल्या मोठ्या जमिनदारांपासून तर गावातील इतर मोठ्या लोकांचे घरी, लग्नाच्या व मरणाच्या कार्य प्रसंगी त्यांच्या घरी जाऊन किंवा नदीघाटावर कपडे धुण्याचे व ते वाळविण्याचे काम परीट किंवा धोबी करीत असे. यासोबतच लग्न, कार्यक्रम प्रसंगी महत्वाची कामेसुद्धा धोबी समाजाकडे होती. वाढत्या लोकसंख्येमुळे, शहरीकरण व आधुनिकीकरणामुळे आणि यंत्र,तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे परीट किंवा धोबी समाजाची पारंपरिक कामे हद्दपार झाली अथवा या व्यवसायावर त्याचा प्रभाव किंवा परिणाम झाल्याचे आपणास दिसून येते. त्यामुळे खेडे सोडून त्यांनी शहराला प्राधान्य दिल्याचे चित्र दिसते.


ग्रामीण जनजीवनाशी निगडित असलेली बलुतेदारी ही पद्धत गावगाडयाची प्रमुख रक्तवाहिनी होती. त्या काळात शेती हीच लोकांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असल्याने शेतकरी स्वतासाठी पिकवून उर्वरित वाटा हा या बलूतेदारांमधे वाटला जात असे. अन्नधान्य, भाजीपाला इतरांना देऊन किंवा उसनवारी करून गावगाडयातील लोक त्या बदल्यात सेवा म्हणून त्यांच्याकडून महत्वाची शेतीची कामे करून घेत असत. पैशाच्या रूपाने म्हणा किंवा धान्याच्या रूपाने तेवढाच घरप्रपंच व दैनंदिन चरितार्थ चालवण्यासाठी त्यांनाही या गोष्टींचा आधार असायचा.अडल्या,नडल्याच्या जिवनावश्यक गरजा गावातच भागल्या जात होत्या.सर्व समाजाशी एकमेकाविषयी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामध्ये प्रेम,आपुलकी समाजात एकमेकांच्या विषयी आदर होता.

त्यामुळेच भारतीय समाजात बलुतेदारी पद्धत आपल्याकडे शतकानुशतके टिकून व शाबूत राहिली. आजही समाजात बऱ्याच ठिकाणी बलूते दारी पद्धती अजूनही काही प्रमाणात अस्तित्वात आहे फक्त त्याचे स्वरूप बदलले आहे.

Vijay Jaysingpure

– विजय जयसिंगपुरे, अमरावती.
भ्रमणध्वनी -९८५०४४७६१९


·    नम्र निवेदन 

"निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह  पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे..."

लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.

या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.

-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन
QR 1


आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.