Monday, October 27

बैलांना सजवा पण पळसवृक्ष वाचवा | बैलपोळा सण आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश

बैलांना सजवा पण पळसवृक्ष वाचवा | बैलपोळा सण आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश

येत्या 22 ऑगस्ट ला बैलपोळ्याचा सण आहे. आपला देश हा कृषिप्रधान देश मानला जातो आणि वर्ष भर आपल्या शेतात राबणाऱ्या बैलाप्रति कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आणि छत्तीसगड या भागातील शेतकरी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या दिवशी बैलांना कामापासून आराम देतात. त्यांना नदीवर आंघोळ घालतात. रंगीबेरंगी झुली, मणी, गजरे, बाशिंग, घुंगराच्या माळांनी सजवतात. त्यांची मिरवणूक काढतात. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात. इथपर्यंत ठीक आहे पण…

Palas2ok


या सणाला बहुतेक ठिकाणी मेढीसाठी मोठ्या प्रमाणात पळसाच्या फांद्या तोडल्या जातात, त्याची पूजा केली जाते. मी पंधरा-सोळा वर्षाचा असताना मित्र सोबत पळसाच्या मेढ्या आणायला जंगलात जायचो. दहा बारा मेढ्या घरी आणायचो. गावात प्रत्येक घरी अशा मेढ्या आणून त्या पुजल्या जायच्या. बाबांना मी याबाबत विचारले असता त्यांना त्याचे कारण सांगता येत नसे.! “मेढ्याचा मान असतो त्यामुळे रोगराई येत नाही, बरकत येते. असेच काहीतरी ते सांगायचे पण मला ते पटत नसे. काही वयस्कर माणसा कडूनही मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण आमचे पूर्वज करत आलेत म्हणून आम्ही करतो. कोणालाही याचे शास्त्रीय वा धार्मिक कारण सांगता येत नव्हते.

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!


मेढ्याचे नेमके कारण माहित नाही तरीही प्रत्येक घरासाठी दहा पंधरा मेढ्या तोडून पोळ्याला पळसाची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते. आणि या सणाच्या निमित्ताने पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. माझा जन्म खेड्यातलाच, त्यामुळे लहानपणापासूनच खेड्यात अनेक कामासाठी होणारा पळसाचा वापर मी पाहिला होता. स्वयंपाकासाठी सरपन म्हणून, पत्रावळ्या व द्रोण तयार करण्यासाठी, कुरडया बणवताना मधल्या मोठ्या पानाचा वापर, पळस फुलापासून होळीचे रंग तयार करण्यासाठी, बंजारा जमातीत पळसाच्या डहाळ्यांना लग्नकार्यात फारच महत्त्व आहे. याशिवाय शेतातील झोपडी तयार करण्यासाठी, घराच्या छतासाठी, उघड्या भिंती झाकण्यासाठी डायन म्हणून पळस पानांचा वापर केला जात असे. तसेच पळसाच्या मुळापासून वाक तयार केला जाई. त्याचा वापर दोरीसारखा बांधन्यासाठी तसेच बैलाचे मुसके ,गोंडे तयार करण्यासाठी केला जाई. एवढाच काय तो उपयोग मला माहित होता.


पण कनिष्ठ महाविद्यालयीन सेवेत असताना राष्ट्रीय हरित सेनेचा प्रभार माझ्याकडे आल्यानंतर पोळ्याला मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणाऱ्या पळसा विषयी मी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता. पळस हे मध्यम आकाराचा भारतात आढळणारा एक देशी वृक्ष आहे‌. मध्य आणि दक्षिण भारत तसेच विदर्भात तर तो सर्वत्रच आढळतो. त्याला पलाश, ढाक, केसूला, परसा, आणि त्याला केशरी रंगाच्या फुलांमुळे हे झाड उन्हाळ्यात पेटल्यासारखे दिसते म्हणून त्याला अरण्याग्नी flame of the forest असेही म्हटले जाते हा वृक्ष साधारणतः पळस हा वृक्ष चार रंगात आढळतो सर्वत्र जरी केशरी रंगाचा पळस आढळत असला तरीही नंदुरबार नवापूर या भागात पांढऱ्या रंगाचा पळस आढळतो. तर विदर्भात क्वचितच पिवळ्या रंगाचा पळस आढळतो. काळ्या फुलांच्या पळसाविषयी मी फक्त ऐकले आहे.प्रत्यक्षात कधी पाहिला नाही. तसेच पळस हे अनेक औषधी गुणांनी युक्त असे झाड आहे. त्याची फुले, पाने ,बिया आणि डिंक या सर्वांमध्येच औषधी गुणधर्म असून अनेक रोगावर परिणामकारी असल्याचेही मला कळले साधारणतः डिसेंबर ते जानेवारी या काळात पळसाला फुले येतात. उन्हाळी लागल्यास पळस फुलाच्या काढ्याने लघवीची जळजळ थांबते. उष्णतेमुळे नाकातून रक्त येत असेल तर पाण्यात चार-पाच पळस फुले भिजून त्यात थोडी साखर मिसळून पिल्यास रक्त येणे थांबते. आंघोळीच्या पाण्यात पळसाची फुले टाकून आंघोळ केल्यास शरीरातील उष्णता कमी होते. सुकलेल्या फुलाचे सरबत पिल्याने शरीराला थंडावा जाणवतो. मुतखड्यासाठी सुद्धा पळस फुलाचे चूर्ण अतिशय उपयोगी मानले जाते. डोळ्यांच्या आजारासाठी विशेषता रातांधळेपणावर व मोतीबिंदू वर पळस फुलाचा रस परिणामकारक मानला जातो.

Palas1 ok


पळसाची पाने मधुमेहावर उपयुक्त आहेत. पळसाच्या पानाचे दोन देठ चावून खाल्ल्याने रक्तातील आणि लघवीतील साखरेचे प्रमाण कमी होते‌ मूळव्याधीवर सुद्धा पळसपाने फारच उपयोगी मानली जातात. पळसाची कोवळी पाने सावलीत वाळवायची ते उकडून पिल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होतो. पळस पानामुळे मलबद्धता कमी होऊन पाचन संस्था सुधारते. पळस पानाच्या पत्रावरील जेवण आरोग्यासाठी चांगले मानले जाते . त्याने पानातील आयुर्वेदिक घटक शरीरात जाऊन संधिवात, पायाला मुंग्या येणे, थकवा येणे, यासारखे आजार नष्ट होतात. पळसाच्या काढ्याने गुळण्या केल्यास घशाची खवखव थांबते. तसेच लघवी सुटण्यासाठी पानाने ओटीपोट शेकल्यास लघवी मोकळी होते. विड्याचे पान म्हणूनही कुठे कुठे पळसाची कोवळी पाने वापरली जातात. त्याने दम्याचा त्रास कमी होतो.

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा


पळसाच्या बियांना पळसपापडी म्हणतात. पळस पापडीत एकच बी असते. पळसाच्या बिया त्वचा रोगावर गुणकारी आहेत. त्यात मुडूगा नावाचे तेल असते. कडुनिंबाच्या रसात लावल्याने खरूज,इसब, गजकर्ण,आणि अंजुत यासारखे त्वचाविकार नष्ट होण्यास मदत होते. बियाचे चूर्ण किंवा बिया पाण्यात वाटून मधातून घेतल्यास जंत मरून पडतात. गॅसेसचा त्रास कमी होतो. जखमातील किडे बाहेर काढण्यासाठी सुद्धा पळसाच्या बियाची चूर्ण जखमेवर टाकतात. पळसाच्या बियाने अजीर्ण, अपचन, वात, ढेकर, आणि पोटासंबंधीचे विकार नष्ट होतात .पचनसंस्था सुधारते पळसाचा डिंक लाल रंगाचा असतो. त्यामध्ये गॅलिक आणि टॅंनिक ऍसिड मोठ्या प्रमाणात असते. हा डिंक पाण्यात मिसळून पितात. तो बलवर्धक आणि कामेत्तेजक मानला जातो. पळसाच्या डिंकाने जुलाब थांबते. त्याचा परिणाम सौम्य असल्याकारणाने लहान मुले व नाजूक प्रकृतीच्या स्त्रियांना तो उपयुक्त आहे.


इतके सारे औषधी गुणधर्म असलेल्या पळस वृक्षाला आपण केवळ रूढीपायी तोडतो. सध्य स्थितीत पर्यावरणाविषयी मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा काळात ही वृक्षतोड योग्य आहे का? याचा विचार सर्वांनी करणे गरजेचे आहे. मला तर वाटते कीकेवळ पोळाच नाही तर आपल्या सर्वांनी आधुनिकतेचा विचार स्वीकारून झाडे, फांद्या, पाने तोडणाऱ्या प्रथा बंद करायला पाहिजे. जसे लग्नासाठी हिरवा मांडव, श्रावण सोमवारी बेलाची पाने, दसऱ्याला आपटा, हरतालिकेला पाने, गुढीपाडवा, लक्ष्मीपूजनाला दरवाजावरील तोरणे यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते. मात्र त्या मानाने झाडे लावण्यास कोणीच तयार नाही. मी शालेय सेवेत असताना राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून दरवर्षी रोपवाटिका तयार करायचो त्यातील रोपे विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या वाढदिवसाला भेट द्यायचो. शाळेत होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सुद्धा रोपटे देऊनच केले जाई. प्रत्येक सणाला वृक्षतोड होऊ नये म्हणून ते सण पर्यावरण पूरक पद्धतीने कसे साजरे केले जातील याबाबत विद्यार्थ्यात प्रबोधन केले जायचे. आपण सुद्धा योग्य पर्याय निवडून आपले सण साजरे करावेत. आपले वाढदिवस, घरातील दिवंगत व्यक्तीचे स्मृतिदिन याप्रसंगी एक तरी झाड लावावे त्याचे संवर्धन करून पर्यावरणाचे प्रदूषण टाळावे. अलीकडच्या कोरोना सारख्या महामारीने सर्वांनाच ऑक्सिजनचे महत्त्व पटवुन दिले आहे तेव्हा सर्वांनाहात जोडून विनंती की आपण ऑक्सिजनचा कारखाना मानल्या जाणाऱ्या वृक्षांना अंधश्रद्धेपायी तोडू नका.
आपण श्रद्धा ठेवा–
पण अंधश्रद्धा नष्ट करा
झाडे लावाआणि झाडे जगवा.

-प्रा आर. के. वरघट.(से.नी.)
आदर्श पर्यावरण शिक्षक करजगाव, ता. दारव्हा,जि. यवतमाळ

बैलपोळा #पळसवृक्ष #पर्यावरणसंवर्धन #सणआणिपर्यावरण #पळसाचेऔषधीयगुण #बैलसजावट #पोळासण #झाडेलावाझाडे_जगवा #कृषिप्रधानभारत


·    नम्र निवेदन 

"निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह  पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे..."

लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.

या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.

-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन
QR 1

आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन


Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.