Monday, October 27

बैलपोळा सण : शेतकऱ्यांचा सच्चा मित्र बैल आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शन

बैलपोळा सण : शेतकऱ्यांचा सच्चा मित्र बैल आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शन

सालाबादप्रमाणे वर्षाच्या श्रावण अमावस्येच्या दिवशी म्हणजे पीठोरी अमावस्येच्या दिवशी पोळा हा सण येतो.हा दिवस म्हणजे शेतकऱ्यांना व त्याच्या कुटुंबातील लोकांना अगदी आनंदाचं उधाण आणणारा असतो. भारत हा कृषिप्रधान देश असून ७०% लोकांची उपजीविकेचं साधन हे बहुतांश शेतीवरच अवलंबून आहे. म्हणजे शहरांपेक्षा खेडयाची वसाहत आजही जास्त प्रमाणात आहे.हल्ली शेतीचं बहुतांश ठिकाणी यांत्रिकीकरण झालं असलं तरी बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी अजूनही बैलजोड्या आपलं अस्तित्व म्हणून राखून ठेवल्या आहेत. आणखी हा दिवस बैल पोळा म्हणून ग्रामीण व शहरी भागामधून फार मोठ्या आंनदाने साजरा केला जातो. पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना दररोजच्या शेतीच्या कष्टाच्या, मशागतीच्या कामापासून  थोडा आराम दिला जातो. गावातील कुशल बैलांची शिंगे,खुरं काढणाऱ्या कारागीराला बोलावून त्यांची शिंगे,खुरे काढून ती अवजारानं तासून गुळगुळीत केली जातात. त्या कामाची त्याला धान्य रूपाने वा पैशाच्या स्वरूपात बिदागी दिल्या जाते.पोळयाच्या अगोदरच्या रात्री खांद पुजा व्हायची या रात्री खांद्यावर जू घेवून वर्ष भर आपल्या धन्यासोबत सुखादुखात राबणाऱ्या बैलजोडीच्या खांद्याला साजरं पानावर हळद तुप घेऊन त्याच्या मानेवर चोपडलं जाते.आरतीचा दिवा ओवाळला जातो.त्याला भाकर,पोळी नैवेद्य म्हणून चारली जाते.

आज आमंत्रण उद्या जेवाले येजा हो

गळयातील कसांडी वाजवून अशी हाक मारली जाते यालाच खेड्याकडे आवतन देणं असं म्हणतात. गव्हाणीत कुटार टाकून नंतर कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात बाया माणसं,लेकरंही ताटं वाढून सोबत जेवायची.तो दिवस आजही आम्ही विसरू शकत नाही.

याच दिवसात वावरात कडबा, हायब्रीड भरपूर पेरललं रहायचं.यालाच वापश्याचा महीनाही जुने लोकं म्हणत. या दिवसात कडक जहरी उन तपायचं. एवढं की हायब्रीड निंदतांना आंगाची लाही लाही व्हायची. साऱ्या अंगातून घामाच्या धारा वाहायच्या.याच दिवसात उन्हानं हरणाच्या पाठा काया ठिक्कर पडतात अशी जुनी जाणती लोकं सांगतात. पोळ्याच्या दिवशी दवडीत रात्रीच्या सयपाकातल्या असल्या नसल्या उरलेल्या शिळयापाक्या पोया, कांदा,चटणी भाकरी पालवात बांधून गुराढोरांना घेऊन मस्तपैकी पहाटेच वावरात यायचं. त्यांना चरण्यासाठी सोडायचं. मस्त बारीक हिरवी कणसं पडलेल्या  हायब्रीडची एक मोठी पेंडी कापली म्हणजे बैलांसाठी चाऱ्या पाण्याचा दिवसभर घोर नसायचा.सोबत रिकामी हकालत आणलेली बैलं पावसामुळं निघालेल्या कुरणांच्या लूसलूसीत गवतावर तुटून पडायची. बैल गवत खायला लागली म्हणजे आपणही सावलीसाठी एखादं झाड शोधून सावलीत बसून संग आणलेली शिदोरीतील कांदा,चटणी,भाकर खायची. चरण्यासाठी सोडलेल्या बैलांवर नजर टाकायची.बैल मस्त नदीकाठच्या थडीवर लुसलुशीत हिरवागार चारा खातांना हयद तुपाचा हात लावून त्यांची घोयलेली शिंग उन्हाच्या तीरपानं मस्त चमकायची.

वावराच्या पाठीमागे मोठी शहानूर नदी नितळ पाण्यानं शेतात वाऱ्याबरोबर डुलणाऱ्या पिकांसोबत वाऱ्याचं संगीत घेऊन झूळझूळ वाहायची. सोबत झाडाझुडुपांमधून पशुपक्ष्यांचं सुंदर किलबिलाट ऐकायला मिळायचा. नदीच्या पात्रात खोल पाण्यात मासे पकडण्यासाठी गेलेली कमरेलोक फक्त धोतर खोसलेली उघडेबंब भोई जाळ्यात मासे अडकली म्हणजे मोठमोठ्यानं नदीवर कल्लोळ करायची. बरोबर दहा,अकरा वाजेपर्यंत नदीकाठानं,थडीवर बैल चारायची व नंतर गावाकडे हकालत आणत नदीवर आंघोळीसाठी, चॉंदखेड पेंडावर धुवायला न्यायची.सोबत घासण्यासाठी खरारा,साबण असायचा.किंवा नदीच्या काठावर गाळाची माती बघून सुरू असलेला काळबांडे कुंभार बुढयाचा कौलांचा पजाय दरवर्षी असायचा. त्यामुळे कौलाचा तुकडा सहजच कोठेही सापडायचा.हीच छोटी,छोटी तुकडे आम्ही घमेल्यात भरून बैलांनी मलमुत्र करून पाडलेल्या खड्ड्यात भरायचो.व गोठा स्वच्छ ठेवायचो. बैलांसोबत नदीवर खोल पाण्यात उतरायचो.आम्ही त्याला डोह किंवा शेवडी म्हणायचो.

जवळपास एक मोठा बांबु डूबेल एवढं खोल पाणी रहायचं.बैलांच्या पाठीवर मस्त तरंगत पोहायची मजा काही औरच असायची. खापरानं मस्त घासून बैल स्वच्छ धुवून मस्त लख्खं करायची.व उन्हात बांधून आठवडी बाजारातून आणलेल्या रंगाचा डब्बा उघडून हाताच्या बोटांनं छान शिंगाना रंग द्यायचा.व त्याच लावलेल्या शिंगावर रक्षाबंधनच्या दिवशी बांधलेल्या राख्या सोडून त्याचा चमचम करणारा बेगडी कागद शिंगाले चिपकावयाचा. पोरं मटाटया,कसांडया,नाथा,कासरे, कपड्यांच्या झूला, कवड्याच्या माळा, घुंगरूमाळा, करदोडयाच्या, किंवा वादीचे पट्टे, फुलांच्या माळा,पीतळचे तोळे आंगावर चढवून, त्यांच्या आंगाला गेरू लाऊन आपापल्या ऐपतीप्रमाणे बैलजोड्या सजवल्या जायच्या .घरातील महिलांना फक्त पुरणपोळीच्या स्वयंपाक बनविण्याचं काम रहायचं. आम्ही दरवाज्यातून सयपाक कधी होते म्हणून टूकूमूकू बघत रहायचो. भजे कुरोळयांचा सुगंध साऱ्या घरभर पसरायचा.स्वयंपाक झाला म्हणजे बैलांना एका स्वच्छ ताटात पुरणपोळीचा ,भजे ,कुरोळया, मुगाच्या डाळीच्या वडयांचा नैवेद्य दाखवला जायचा. घरातली पुरूष मंडळी, लहानलहान मुलं हातपाय धुवून नवीन कापडं तर कधीच घालायला मिळाली नाही.किंवा जी काही असलेली ती स्वच्छ धूवून कापडं अंगात घालून ओळीनं ओसरीत जमीनीवर वा पाटावर जेवायला बसायची.मोठे कास्तकार आपल्या घरीदारी वा शेतात राबणाऱ्या गडी माणसांना पोळ्याच्या सणासुदीला नवीन कापडंचोपडं घेऊन त्यांना गोडाधोडाचं जेवायला आदरानं बोलवायची.

बैलपोळा हा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा एक मराठी सण असून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा बैल पोळ्याचा सण आनंदी वातावरणात  घरोघरी साजरा केल्या जातो.एक ग्राम संस्कृती म्हणून पोळा सणाच्या निमित्ताने नोकरी निमित्त बाहेर गावी गेलेली मंडळीही आपल्या लेकराबाळांसहीत  मोठ्या हौशीनं गावाकडे परतताना दिसतात.

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा

आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैल पोळ्याचे महत्व अजूनही ग्रामीण व शहरी भागामधून कायम टिकून आहे.हे बैल वर्षभर शेतकर्‍यासोबत शेतात राबतात.ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. व शेतकऱ्यांचा सच्चा मित्र म्हणून बैलजोडी विषयी आपला आदरभाव व्यक्त करतांना दिसतात. ग्रामीण भागात बैलाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटलं जातं.तीच तर त्याची दौलत असते. ग्रामीण भागात

शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बैल पोळ्याला आजही विशेष महत्व आहे. बैलं हे वर्षभर शेतात राबराब राबतात. शेतीच्या या ढोरमेहनतीत शेतकऱ्यांना या बैलांची साथ असते. म्हणून बैलाला शेतकऱ्यांचा सच्चा मित्र म्हटलं जातं. शेतकऱ्यांच्या जीवनात बैलाचं असं अतूट नातं असतं.त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण सम्पूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. खऱ्या अर्थाने बैलपोळा हा बैलांच्या सन्मानाचा दिवस असतो.नंतर भरदुपारी जेवणं आटोपल्यावर साधारणतः दोन, तीन वाजता बैलांना सजवून गावाबाहेर असलेल्या मैदानावर वा गोठानावर आंब्याचं तोरण बांधलेल्या दोरी खाली रांगेने वाजत गाजत आणलं जाते.

भेंडीच्या पानात किंवा पोथीच्या पानात घाट घेऊन तो घाट प्रत्येक मैदानावर उपस्थित असलेल्या बैलांच्या डोक्याला पुजन म्हणून लावल्या जातो.खेड्यांमधल्या प्रत्येकाच्या घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. त्यामधे मोठमोठ्या खटल्यांमधील  मानाच्या जोड्या ही असतात.अनेक गावांमध्ये पोळ्याला यात्रामेळयाचं आयोजन करण्यात येते.व गावामधे यात्राही भरते. रांगेत सर्व बैलाचं पूजन झाल्यावर पोळा फुटल्या नंतर गावाकडे निघालेल्या बैलजोड्या गावांमधून मिरवणूक म्हणून मिरवत मिरवत  नेल्या जायच्या. उधळलेली नवीन गोऱ्हे आवरता आवरता घरमालक तर पार थंडगार होऊन मेटाकुटीला यायचा. त्यांना प्रत्येक मंदिराच्या आवारात नेवून भक्तीभावाने त्यांच्या डोक्यावर अंगारा लावला जायचा.नंतर घरोघरी पुजन होऊन त्यांच्या खुरांवर पाणी टाकलं जायचं.त्यांना ज्वारीच्या धान्यापासून बनवलेला ठोंबरा मोठ्या प्रेमानं खायला दिला जायचा.

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

मंदिराच्या परिसरात ओट्यावर बसून हा आनंद लोकं आपल्या लहान मुलांसोबत डोळ्यात साठवून ठेवायची. मुलंही आनंदाने न्हाऊन निघायची. हे दृश्य पाहता, पाहता तो पर्यंत अंधार पडून संध्याकाळ व्हायची.रात्री गव्हाणीत चारा टाकून बैलांना गोठ्यात बांधल्या जायचं.चारा खाऊन रवंथ करत बैलजोड्या रात्रीच्या उजेडात आरामात गोठ्यात मस्त विसावायच्या. या लोकसंस्कृतीचे महत्व टिकवून ठेवणाऱ्या पोळा सणाच्या निमित्ताने लहान मुले,मोठी मंडळी आंनदाने हरखून जायची.दुसऱ्या दिवशी लहान मुलांचा तान्ह्या पोळा असायचा. लहान,लहान मुले मातीच्या बैलांना रंगवून, सजवून घरोघरी घेऊन जातात. त्यांना तान्ह्या पोळया निमित्त पोटभर खाऊ, भेटवस्तू, गोळ्या , बिस्किटे मिळायची. सकाळी रात्रीचा उरलेला ज्वारीचा ठोंबरा प्रसाद म्हणून घरातील लोकांना वाटल्या जायचा. रात्री सणासुदीचा उरलेला स्वयंपाक जेवणं करून थकून भागून गेलेला सारा गाव सामसूम व्हायचा. अशा प्रकारे मोठ्यांपासून तर सर्व आबालवृद्धांपर्यंत सर्वांना हवाहवासा वाटणारा ग्रामीण संस्कृतीचे वास्तव दर्शन करणारा पोळा गाव खेड्यातून,शहरांमधून आजही तितक्याच आनंदाने साजरा केल्या जातो.

-विजय जयसिंगपुरे

अमरावती

भ्रमणध्वनी -९८५०४४७६१९


·    नम्र निवेदन 
"निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह  पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे..."

लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.

या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.

-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन
QR 1



Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.