Sunday, October 26

ग्रामीण भागातील जिद्दी तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरणारी कादंबरी…आणि रामा कलेक्टर झाला.!

ग्रामीण भागातील जिद्दी तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरणारी कादंबरी…आणि रामा कलेक्टर झाला.!

ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना प्रेरणा देऊन त्यांच्यातील विजिगीषु वृत्ती जागृत करणारी ‘ आणि रामा कलेक्टर झाला ‘ ही कादंबरी नुकतीच माझ्या वाचनात आली.मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये क्लिअरिंग एजंट म्हणून काम करणाऱ्या अशोक पवार या हरहुन्नरी तरुणाने या प्रेरणादायी कादंबरीचे लेखन केलेले आहे.दुष्काळ पाचवीला पुजलेल्या पारनेर सारख्या दुष्काळी भागातील एका छोट्या गावातील एका जिद्दी तरुणाची ही कथा आहे.खरं तर स्पर्धा परीक्षा हे एक मृगजळ आहे.१०..१५ वर्षांपूर्वी शहरातील तरुणांचीच ती मक्तेदारी होती.पण हळूहळू ग्रामीण भागातील तरुणांना या परीक्षेने भुरळ घालायला सुरुवात केली.दुर्दम्य इच्छाशक्ती,जबर मेहनत करण्याची वृत्ती आणि ध्येयवेडे होऊन यशाला गवसणी घालणारा टोकाचा आत्मविश्वास या बळावर ग्रामीण भागातील तरुणांनी केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली.प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात त्याप्रमाणे ग्रामीण भागातील शेतकरी,कष्टकरी वर्गातील तरुण आयएएस, आयपीएस, आयआरएस म्हणून चमकू लागले.


या कादंबरीचा नायक राम हा असाच एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा.१० वर्षांपूर्वी १२ वीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला.दुष्काळी पट्टा आणि कोरडवाहू जमीन यामुळे त्याचे वडील संसाराचा गाडा हाकताना मेटाकुटीला आलेले होते. इच्छा असूनही त्यांनी आपल्या मुलाला पुढे शिकविण्यास असमर्थता दर्शविली.मुंबईला मशीद बंदर नाक्यावर हमाली करणारा रंगा नावाचा मित्र रामाला मुंबईला नेतो.हातगाडी ओढून आपले भविष्य उज्ज्वल होणार नाही याची जाणीव रामाला स्वस्थ बसू देत नव्हती. मग रंगा त्याला एक सातारी मुकदमाची भेट घालून देतो.मुकादम त्यांच्या ओळखीने एका रात्रशाळेत प्रवेश मिळवून देतो.तेथे पदवी प्राप्त करतानाच त्याला युपीएससी परीक्षेविषयीची जुजबी माहिती मिळते.दरम्यानच्या काळात ज्युबिनभाईच्या गोडाऊन मध्ये लिखापढीचे काम मिळते.दिवसभर काम आणि रात्रीचा अभ्यास..राम जिद्दीला पेटतो.घरच्या हलाखीच्या परिस्थितीने अनेक वेळा नाउमेद होतो पण ध्येयापासून तो परावृत्त होत नाही.

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा


या प्रवासात तो रात्रंदिवस कष्ट करणारे वडील,अपार माया करणारी आई,आज्जी, भाऊ,बहीण यांना कधीही विसरत नाही.ज्या देवमाणसांनी या प्रवासात त्याला साथ दिली त्याचे ऋण कधीही विसरत नाही.आज खेडेगावातील अनेक तरुण गुणवत्ता असूनही केवळ न्यूनगंडा मुळे आपयशाचे धनी होतात.शहरातील महागडे क्लास,राहण्याची व खाण्याची आबाळ,घरचे पाठबळ नसणे,योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे ५…६ वर्षे प्रयत्न केल्यानंतर अनेक तरुण हा नाद सोडतात.आयुष्यभर कुठेतरी कारकुनी करत राहतात.काही तरुणांच्यावर घरून लग्न करून संसार थाटण्याचाही सारखा दबाव असतो.


दैवायत्तम कुले जन्म:, मदायत्तम तू पौरुषम..या सुभाषिताचा प्रत्यय ही कादंबरी वाचताना पदोपदी येतो.मानवी नात्यातील विविध पैलू लेखकाने अगदी ताकदीने हाताळले आहेत. कष्टकरी समाजाच्या व्यथा,वेदना वाचताना आपल्या डोळ्यांतील अश्रू नकळत टपकतात.ग्रामीण पारनेरी बोलीभाषा,मुंबईची टपोरी आणि गुजराती भाषा यांच्या खुमासदार संवादानी कादंबरी खूपच वाचनीय झालेली आहे.ग्रामीण भागातील निसर्गाचे आणि मुंबईतील वेगवेगळ्या स्थळांचे लेखकाने जे बारकावे टिपलेत ते वाचून आपण थक्क होतो.आयकर उपायुक्त विष्णू औटी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे लेखकाने पदोपदी वास्तवाचे भान ठेवले आहे.त्यामुळे कुठेही कल्पनाविलास जाणवत नाही.

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!


शाळा,कॉलेज यामध्ये या कादंबरीची पारायणे व्हायला हवीत.अनेक वर्षे प्रयत्न करूनही ज्या तरुणांना यश हुलकावणी देत आहे,जे गरिबीच्या परिस्थितीने हवालदिल झाले आहेत,त्या तरुणांनी या कादंबरीचे नक्की वाचन करावे.या कादंबरीचा नायक राम हा त्यांच्यासाठी नक्कीच प्रेरणास्रोत असेल.जिद्दीच्या जोरावर राम कलेक्टर झाला तर आपणही होऊच शकतो असा आशावाद प्रत्येक ध्येयवादी तरुणाच्या मनात जागविल्याशिवाय ही कादंबरी राहणार नाही.


लेखकाची ही पहिलीच कादंबरी असली तर साहित्य क्षेत्रात ती मैलाचा दगड ठरेल याविषयी अजिबात संदेह नाही.जीवनाचे सोपे परंतु अनमोल तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोहचविण्यात हा लेखक कमालीचा यशस्वी झाला आहे.

BS


डॉ. बाळासाहेब शिंगोटे

(लेखक हे आदर्श शिक्षक,प्रबोधनकार व शिवव्याख्याते आहेत.)

पुस्तकाचे नाव : आणि रामा कलेक्टर झाला.
लेखक : अशोक किसन पवार
प्रकाशक : पारनेर साहित्य साधना मंच
मुद्रक : यशोदीप पब्लिकेशन,पुणे
किंमत : ३५० रु.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.