प्रत्येक दिवस हा काही ना काही नवीन घेऊन येत असतो व आपली छाप पाडून इतिहासामध्ये अजरामर होत असतो. म्हणून तर प्रत्येक दिवसाची दिन विशेष म्हणून एक नाविन्यपूर्ण नोंद केलेली असते. आपण सहज दिन विशेष कडे नजर टाकली तर काही ना काही नावीन्य व वेगळेपण दिसत असते. केवळ ह्या दिवसाच्या नावीन्यपुर्णाने आपण तो दिवस साजरा करत असतो. हा दिवस साजरा केल्यामुळे आपल्याला प्रेरणा, ऊर्जा, उत्साह व काही तरी नवीन शिकायला मिळून आपल्याला ज्ञान प्राप्त होऊन आपली ज्ञानात अधिक भर पडत असते.
असाच एक ऐतिहासिक दिवस आहे तो म्हणजे ११ मे १८८८ ह्या दिवशी शिक्षण महर्षी ज्योतिराव फुलेंना मुंबईतील मांडावी कोळीवाडा येथे “महात्मा” पदवी देऊन त्यांच्या चाळीस वर्षाच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला होता. महात्मा ही पदवी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी ज्योतिराव फुले यांना दिली. बडोद्याचे राजे महाराज सयाजीराव गायकवाड खुद्द कार्यक्रमाला उपस्थित राहून ज्योतिराव फुल्याना सन्मानित करणार होते परंतु त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नव्हते. पण महात्मा पदवी देण्याची मूळ संकल्पना बडोद्याचे राजे महाराज सयाजीराव गायकवाड यांचीच होती. ज्योतिराव फुले सभास्थानी येताच, उपस्थितांच्या डोळ्यात कृतज्ञता होती तर काहींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. या महान कृतज्ञता सोहळ्यास सत्यशोधक चळवळीचे नेते नारायण मेघाजी लोखंडे, रावबहादूर वांदेकर यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी गौरवपूर्ण भाषण नारायण मेघाजी लोखंडे यांनी केले होते. ते याप्रसंगी म्हणाले होते की ज्योतिबा म्हणजे मानवी हक्काचे दरवाजे उघडणारे हे प्रथम महापुरुष आहेत.
महात्मा म्हणजे “महान आत्मा” ज्यांचा आत्मा महान असतो. जे महान काम करतात त्यांनाच महात्मा ही पदवी मिळते. आपण आज सहज ज्योतिराव फुले यांच्या कार्यावर नजर टाकली तर ते खरंच महान, महात्मा होते हे आढळून येते.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
मानवी स्वभाव आहे, मानव आहे म्हणजे त्याला स्वार्थ हा लागलाच आहे. संसार सुद्धा आला. महात्मा ज्योतिराव फुले हे घरचे चांगले होते. त्यांनी त्यांचा व्यापार केला असता तर ते खूप सुखी जीवन जगू शकले असते. परंतु ते खरंच “महात्मा” होते. म्हणजे काय तर ते महान विचार करत होते. ते स्वयं केंद्रित नव्हते. त्यांना समाजातील गरिबी, अन्याय, अनिष्ट प्रथा बघवत नसत. ते संपूर्ण मानवजाती एक सामान आहेत असे समजत असत. त्यांच्या मध्ये भेदभाव उच्च निच्च बघत नसत कारण की ते खऱ्या अर्थाने महात्मा होते.
महात्मा ज्योतिबा फुल्यानी छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी शोधून काढली. एव्हढेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा सुद्धा लिहिला. हा पोवाडा गाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सर्वांपर्यंत पोहचविले. एव्हढेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा साजरी करायला त्यांनी सुरुवात केली. ही जयंती मोठ्या थाटात २१ दिवस साजरी होत असे. छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती पोवाडा व जयंती साजरी करून प्रत्येकामध्ये शिवाजी जागविण्याचे महान काम महात्मा फुल्यानी केले.
रूढी परंपरा ज्या चांगल्या नाहीत त्याचा कडाडून विरोध केला व जनसामान्यात मोहीम उभारून क्रांती केली. ह्यासाठी त्यांना आपल्या आयुष्यात खूप मोठी किंमत चुकवावी लागली. अपमान सहन करावा लागला. घरातून व गावातून त्यांना बहिष्कृत केल्या गेले. तरी पण ते आपल्या उद्दिष्टांपासून दूर हटले नाही. बऱ्याच वेळा त्याच्यावर संकंटकांनी प्राणघातक हल्ला सुद्धा केला होता. परंतु समाजाने एव्हढा जाच करून सुद्धा त्यांची बदल्याची भावना कधीच नव्हती. उलट जे हल्लेखोर त्यांच्यावर हल्ला करायचे त्याचे उत्तर ते तर्कनिष्ठ पणे देऊन त्यांना वैचारिक चांगला मार्ग दाखवावयाचे व आपल्या सामाजिक कार्यात सहभागी करून घ्यायचे. विशेष म्हणजे हल्लेखोरांना ते पटत असे आणि ते सत्कर्माला लागत असत.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार हा खरोखरच महान होता. ते म्हणायचे की आपण सर्व एकच समान आहोत. सर्व ईश्वराचे लेकरे आहोत. मग भेदभाव कशाला ? निसर्गाच्या सर्व निर्मित वस्तूंवर सर्वांचा समान अधिकार आहे. आपल्याला निसर्गाने हवा, सूर्यप्रकाश व पाणी दिले आहे. हे मानव निर्मित नाही. मानव सुद्धा निसर्ग निर्मितीच आहेत. त्यामुळे पृथ्वीवरील सर्व निसर्ग निर्मित हवा, सूर्यप्रकाश व पाण्यावर सर्व मानवांचा समान अधिकार आहे.
हा विचार कोणीही करूच शकत नाही. हा असा विचार फक्त महात्माच करू शकतात. म्हणून तर त्यांना महात्मा पदवी देण्यात आली होती.
पदवी, डिग्र्या व प्रमाणपत्र हे शाळा, महाविद्यालय व संस्था मधून विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर मिळतात. परंतु महात्मा ही पदवी सामाजिक कार्य व मानवाचे कल्याण केल्यामुळे त्यांना देण्यात आली. विशेष म्हणजे आज जी महिलांनी शिक्षणात क्रांती आणि प्रगती केली आहे ती केवळ महात्मा फुले यांचीच देणं आहे. म्हणून त्यांना आजच्या दिवशी म्हणजे ११ मे रोजी महात्मा पदवी दिली तरी खरोखर सर्वासाठी प्रेरणादायी आहे. ह्या दिवसाचे स्मरण करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. ह्या दिनाला स्मरून आपण सुद्धा महात्मा होण्याचा दिशेने पाऊल टाकूया.
सत्काराला उत्तर देताना महात्मा फुले म्हणाले होते की, ” जनी जनार्दन ! संत बोलती उत्तर ” या वचनाप्रमाणे मी अल्पसे कार्य केले आहे. बघा किती महानता आहे की एव्हढे कार्य करून सुद्धा कृतीत नम्रता आहे. त्यावेळी महात्मा फुलेंच्या जय घोषणे परिसर दुमदुमला होता.
ज्योतिरावांना बडोद्याचे राजे महाराज सयाजीराव गायकवाड व समाजाने महात्मा ही पदवी दिली अपेक्षा करूया त्यांना आपला देश भारतरत्न म्हणून सन्मान देऊन लवकरच गौरवेल अशी सार्थ अपेक्षा करूया.!

– अरविंद मोरे,
नवीन पनवेल (पूर्व) मो. ९८२०८२२८८२.