पाऊलवाटा
तेव्हा २००० साली नुकतच एम.ए.मराठी सिताबाई कला महाविद्यालय अकोल्यातून झालो होतो. तेव्हा एम.ए ला फार कमी विद्यार्थ्यांना बी प्लस भेटायचं. तेव्हा एम.ए होऊन एकतर स्पर्धा परीक्षा नाही तर प्राध्यापक होण्यासाठी नेट+सेट पात्रता परिक्षा यु.जी.सी.नं ठेवली होती.परिक्षा काही साधी नव्हती.खुप कमी प्रमाणात निकाल लागायचा. मीही त्या इराद्याने अकोल्याच्या चिवचिव बाजारातून नेट+सेटच्या तयारीसाठी अर्ध्या किमतीत एक जाडजूड पुस्तक विकत घेतलं.जेमतेम २००३ ला काहीतरी करण्याच्या उर्मीनं आम्ही गाव सोडलं. घरची परिस्थिती बेताचीच कोरडवाहू शेती कधी पिकणारी तर कधी न पिकणारी निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेली. शहरात आल्यानंतर सुरूवातीला भाड्याची खोली घेतली.भाडं फक्त दोनशे रुपये होतं पण तेही तेव्हा देण्यासाठी खुप कसरत व्हायची.सोबत तलवारे व खांडेकर नावाचा नालवाडयाचा मित्र होता. तो आपल्या पोट प्रपंच भागवण्यासाठी व नेट सेट चे परिक्षा अर्ज भरण्यासाठी वस्तीत दुध विकायचा. खोली कसली मोठा बंगलाच होता. आजूबाजूचे लोकं आम्ही हापशीवरून पाणी भरतांना आमच्याकडं कौतुकानं बघायचे. नंतर त्यांच्या बोलण्यातून हा भूत बंगला असल्याचं समजलं. आम्ही दोन भूत तीन भूत तिथं रहायचो. भुतांपेक्षा आमचा संघर्ष भुकेचा असल्याने आम्हाला त्या भुताबिताचं काही वावडं नव्हतं.
सोबतची एक दोघ सोबती काही कामानिमित्त गावाली गेली म्हणजे एवढा मोठा भयाण बंगला खायला धावायचा. एवढ्या रात्री खाली येऊन विहिरीवरची मोटर चालू करून आम्ही मस्त फरशीवर प्रशस्त आंगणात आंघोळा करायचो.ती विहीरही खुपचं भयाण होती. विहिरीवरची मोटर बंद करायला पंढरी घबरायची.शपथ घेऊन सांगतो रात्री,बेरात्री एकटाच असतांना आयुष्यात आम्हाले कधी भूत दिसला नाही.घरून आणलेला स्वयंपाकासाठी एक चेपचाप झालेला टपऱ्या गंज व एक पितळी स्टोह एक परात तीच जेवण करण्यास व पीठ भिजवण्यासाठी कामी यायची. आंगोळीसाठी प्लॅस्टिकची बकेट आंगोळ उरकली म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी भरून ठेवायची.आथरायला व तीच पांघरायला एक घरून आणलेली सोलापुरी चादर होती. तेव्हा घासलेट साठी गाडगेनगर जा लागायचं.खुप दूरवर रांग अगोदर राशन कार्ड वाली लोकं आटोपल्यावर उरलेलं तो बिना कार्ड वाल्यांना द्यायचा. नंतर खोलीवर येऊन जेवण बनवा लागायचं. एकदाचं कूलूप लागलं म्हणजे परत खोलीवर दहा वाजताच यायचं. ज्याचं सारं बरोबर आहे अशी मज्जावलेली पोरं सिनेमा बघण्यासाठी थियटरला जायची. पंरतु आमच्या समस्या वेगळ्या असल्यानं आम्ही त्या भानगडीत कधीच पडलो नाही.
वेसंत साहित्याची लहानपणापासून आवड असल्याने तेथे चौकात फिरतांना तुकडोजी महाराजांचा पुतळा दिसला फार बरं वाटलं नंतर पुढे ते राधानगर असल्याचे समजलं.तेव्हा अधूनमधून तेथे संध्याकाळी प्रार्थनेला जायचो.तेथे चौकात असलेल्या एका मोठ्या व्होस्टेलमधे गाव खेड्यातली सर्वसाधारण कुटुंबातील पोरं रहायची. अभ्यास करायची. आम्हीही तेव्हा नेट+सेटचा अभ्यास करायचो. सकाळच्या उरलेल्या वेळात मी राष्ट्रीय अपंग महाविद्यालयाच्या डी.एड कॉलेज म्हणजे अध्यापक विद्यालयात घड्याळी तासिकेवर शिकवण्यासाठी जायचो. महिन्याकाठी काय दोन चार हजार रुपये मिळायचे. तेवढेच काय ते पोटापाण्यासाठी कामी यायचे. तेव्हा गुंड म्हणून आमचे मित्र होते ते शिकवण्या घ्यायचे आता ते वसतीगृह अधिक्षक आहेत. आम्ही दोघे एवढ्या लांब शिकवायला जातांना व सायकलचं पायडल मारतांना घामाघूम होऊन आंगातली बनीयन ओलीचिंब व्हायची. पंरतु महाविद्यालयातील चपराशी पासून तर बाबु लोकांनी आम्हाली दिलेली ‘सर’ ही मानाची वागणूक प्रचंड उर्जा द्यायची.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
मुलंही आदरानं नमस्कार, चमत्कार करायची. तिकडून आल्यावर दुपारच्या उरलेल्या वेळात एक दोन पोळ्या स्टोव्हवर टाकल्या म्हणजे कधी मुगाची दाळ भिजवून तर कधी तिखटासोबत खाण्याची वेगळी मजा होती. फारच झालं तर कधी गाडगेबाबा मंदिराच्या लाईनमधे खड्ड्यात असलेल्या व्हाटेलीत पाच रूपयात सिंगल समोसा व थंडगार प्लेटमधे ताक भेटायचं.कधी त्यावरच दिवस जायचा. खोली वरची सायकल काढली की रात्री आठ वाजेपर्यंत आम्ही विदर्भ महविद्यालयाच्या ग्रंथालयात तर कधी थंडगार बगीच्यात तासनतास अभ्यास व वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत बसलेलो रहायचो. तिकडून ऊशिरा आलो म्हणजे परत घरून थैलीत बांधून आणलेल्या कंट्रोलचा खिचडी भात शिजवून खायचा. माझ्या सोबत चाटे नावाचे आमचे सहकारी होते ते एका विनाअनुदानित शाळेवर शिक्षक होते. लग्नाचं वय पंरतु १२०० रूपये तुटपुंज्या मानधनावर खोली भाड्यापासुन तर जेवणखावणा पर्यंत व्यवस्थीत काटेकोर नियोजन त्यांचं रहायचं.
गोपाल नगर पर्यंत एवढ्या लांब ते सायकलनं शाळेत जायचे.आमच्या बाजूला पुण्याच्या महानगरपालिकेतुन अमरावतीला बदली झालेले एक वयस्क काका खोली करून रहायचे. उरलेले दिवस कसेतरी काढायचे म्हणून शनीवार रविवारी तर पंधरा दिवसांनी गावाकडे म्हणजे पुण्याला लेकरा बाळांची भेट घेण्यासाठी चक्कर टाकायचे. चांगले आदरानं बोलायचे. ख्यालीखुशाली विचारायचे.बाहेर फिरायला गेले म्हणजे तिकडून त्यांनी आणलेलं वर्तमान पत्र आम्ही वाचायचो. कुठे काय जागा, जाहिराती शोधायचो.शहरात घर प्रपंच चालवण्यासाठी पैसा कमवणं किती कठीण असतं तेव्हा समजलं.तेव्हा मीही एमपीएससीची पीएसआयची पूर्वपरीक्षा मोठ्या मुश्किलीनं पास झालो पंरतु मुख्य परिक्षेत मात्र मला यश आलं नाही. नंतर मात्र बी.एडला नंबर लागल्या नंतर ह्या महत्वाच्या परिक्षांपासुन मी कायमचा वंचित झालो.
प्राध्यापक बनण्याची हवा तेव्हा माझ्या डोक्यात शिरली होती. वसतीगृहात सर्वसामान्य कुटुंबातील मुलं असल्यानं चहा नाही ना नाश्ता नाही दिवसभर कट्टमकाट म्हणजे सम्पूर्ण दिवस पाण्यावर काढावा लागायचा.यशोदा नगरात राहणारा इंदूरकर नावाचा एक मित्र तर बस स्टॅण्ड वर दहा वाजेपर्यंत पोतंभर फुलं विकून लायब्ररीत बसायचा. व उरलेल्या पैशातून स्पर्धा परीक्षेचे अर्ज भरून तासनतास आमच्या सोबत अभ्यास करायचा.नंतर मात्र त्याची भेट झाली नाही पुढे बऱ्याच दिवसांनी मी सकाळी असचं फिरायला गेलो असतांना तो रेल्वे प्लॅटफॉर्मवर रूबाबदार पांढऱ्याशुभ्र कपड्यात तो मला दिसला. मी त्याला विचारल्यावर मी या स्टेशनचा स्टेशन मास्टर असल्याचे त्यानं आनंदाने सांगितलं खुप बरं वाटलं.
सम्पूर्ण रेल्वे स्टेशन त्यानं हातात हात घेऊन दाखवलं.एक जिवघेणा संघर्ष संपला होता. त्याच्या सारखीच वसतीगृहात राहून पोरं कमीशन बेसवर सायकलवर बसुन कोणी ओळखू नये म्हणून तोंडाले फडकं गुंडाळून घरोघरी दूध विकायची.व आपला खर्च भागवायची. उन्हाळ्यात घरी न जाता खोलीवरच राहून लग्नसराईत मंगलकार्यालयातली लग्न झोडपायची. लग्नातलं पंचपक्वान्न पोटभर भेटलं म्हणजे खुप बरं वाटायचं. प्राध्यापक पात्रता परिक्षा म्हणजे नेट, सेट परीक्षेचं सेंटर तेव्हा फक्त विदर्भातून नागपूर एकमेव सेंटर होतं. हजारांनी दूरदूरून पोरं यायची. दुपारी एक दिवस अगोदर निघावं लागायचं कारण सकाळी ९.३० ला पेपर सुरू व्हायचा. तेव्हा अमरावती नागपूर दुपारी तीन वाजता पॅसेंजर गाडी होती.तीचं टिकीट तेव्हा अठ्ठावीस रूपये होतं. मोठ्या मुश्किलीनं तिकीटाचे पैसे वगळून दहाविस रूपये फक्त खिशात रहायचे.
नागपुरला रात्री आठ वाजता रेल्वे पोहचली म्हणजे कोणी नातेवाईक ना एवढ्या मोठ्या शहरात कोणी ओळखीचं नाही तेव्हा आम्ही कोणी वाचलेले पेपर घेऊन ते खाली टाकून रात्रभर तेथेच झोपायचो.सकाळी भल्या पहाटे उठून निंबाच्या काडीनं दात घासून झाल्यावर बिना चहापाण्याची आमची पायदळ वारी धनवटे चौकातून फिरत,फिरत राष्ट्रसंत पुतळा चौक,मेडीकल चौक करत कमला नेहरू महाविद्यालयात यायची. रस्त्याच्या कडेला बसलेल्या आजूबाजूच्या छोट्यामोठ्या दुकानदारांकडं बघत बघत जिव रमून जायचा. महाविद्यालयाच्या नळावर हातपाय धुवून यथेच्छ पोटभर पाणी प्यायल्यावर काहीही खाता न पिता ही परिक्षा द्यायचो.
ओळखीचे आणखीन पाच दहा सोबती भेटायचे.बरं वाटायचं.जिवनातली एवढी कठीण परिक्षा मी त्याच परिक्षा केंद्रावरून पास झालो होतो. तेव्हा खुप बरं वाटलं होतं. परिक्षा केंद्रावरील प्राध्यापक लोकांसाठी मंडप टाकून तेथे व्हॉलमधे जेवणं चालायची. आम्ही फक्त त्यांना हातात ताटं घेऊन पाहतांना समाधान मानायचो.परिक्षा झाल्यावरही पुन्हा दहाकोस रेल्वे स्टेशन पर्यंत पायदळच सर्वजण गप्पागोष्टी करीत निघायचो.तर अमरावतीत पोहचल्यावरही रेल्वे स्टेशन पासून तर खोलीपर्यंत पायीच अशी ती आयुष्याची पायपीट होती.पण जिवनात खुप शिकायला भेटलं याचं समाधान होतं हीच आमच्या जिवनाची सर्वात मोठी शिदोरी होती आयुष्यभर कधीही न संपणारी.
विजय जयसिंगपुरे
अमरावती
भ्रमणध्वनी -९८५०४४७६१९.