औरंगाबाद : या वर्षी होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार आहे. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी आज औरंगाबादमध्ये ही घोषणा केली. कोरोनाची परिस्थिती निवळल्यामुळे साहित्य संमेलन भरवण्याबाबतचा निर्णय महामंडळाने घेतल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. या वर्षी होणारे साहित्य संमेलन हे 94 वे असेल. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची घोषणा 24 जानेवारीला करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे या वर्षीचे साहित्य संमेलन होणार की नाही, झाले तरी कुठे आणि कसे होणार याविषयी अनेक चर्चा होत्या. मात्र आज साहित्य महामंडळाने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. कोरोनाचे संकट येण्यापूर्वीच परभणी जिल्ह्यातील सेलू, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, नाशिक आणि पुण्याच्या सरहद संस्थेकडून राजधानी नवी दिल्लीत संमेलन घेण्याविषयीचे प्रस्ताव महामंडळाकडे आल्याचे कौतिकराव ठाले-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर सेलू आणि अमळनेर येथील आयोजक संस्थांनी साहित्य संमेलन भरवण्यासाठी असमर्थता दर्शवली. पुण्याच्या सरहद या संस्थेनेही दिल्लीत कोरोनामुळे साहित्य संमेलन आयोजित करत नसल्याचे कळवले असल्याचे ठाले-पाटील यांनी सांगितले. त्यामुळेच नाशिकमध्ये यावर्षीचे साहित्य संमेलन भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकच्या लोकहितवादी संस्थेकडे साहित्य संमेलनाचे आयोजकत्व देण्यात आले आहे.
Related Stories
December 2, 2023