पावसाळ्यात घाण पाण्यामुळे पायांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून ६ सोपे घरगुती उपाय.. उन्हाळ्याच्या ऋतूनंतर येणारा पावसाळा हा आपल्याला अतिशय आनंद देऊन जातो. परंतु पावसाळ्यात त्वचेवर होणाऱ्या फंगल इन्फेक्शन्सचे प्रमाण हे अधिक असते. पावसाळ्यात पायांची सर्वांत वाईट परिस्थिती होते, त्यामुळे मुख्यत्वे करून पायांची निगा राखणे खूप गरजेचे असते. जर पावसाळ्यात पायांची योग्य निगा राखली नाही तर पायांना अनेक प्रकारचे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात वातावरणात अधिकची आर्द्रता आणि दमटपणा असतो. यामुळेच फंगल इन्फेक्शन्स सारख्या समस्या उद्भवतात. अशा दिवसांत सकाळी अंघोळ करताना पायांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे.
इतर कोणत्याही ऋतूच्या तुलनेत पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण या दिवसांत शरीरात, वातावरणाचा, पर्यावरणात खूप बदल होत असतात. पावसाळयात आपले पाय व पावसाचे पाणी यांचा सर्वात जास्तवेळ संबंध येतो. पावसाळ्याचे घाणेरडे साचलेले पाणी व पायांचा संपर्क आल्यामुळे या अस्वच्छ पाण्यातील बॅक्टेरिया आपल्या पायांच्या नखांना व त्वचेला इजा पोहोचवू शकतात. असे होऊ नये म्हणून पावसाळ्यात पायांची नेमकी कशी काळजी घेतली पाहिजे याबद्दल काही महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवू
पावसाळ्यात पायांची नेमकी कशी निगा राखावी ?
१. फुट सोक :- बादलीमध्ये एक चतुर्थांश गरम पाणी, अर्धा कप जाडं मीठ, १० थेंब लिंबाचा रस टाकावा. जर का आपल्या पायाला जास्त घाम येत असेल तर काही थेंब टी ऑईलचे मिसळू शकता. कारण त्यात जंतुनाशक तत्त्व असतात. ज्यामुळे पायांना येणारा वास दूर करण्यास मदत होते. या मिश्रणात १० ते १५ मिनिटांपर्यंत पाय बुडवून बसावे आणि त्यानंतर पाय स्वच्छ पुसून कोरडे करावेत.
२. हाता – पायांची नखे आकाराने लहान ठेवा :- पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनचा धोका जास्त असतो, त्यामुळे या ऋतूत हात आणि पायांची नखे आकाराने लहान ठेवा. त्यामध्ये साचलेली घाण वेळीच साफ करत राहा. ही घाण एकाच वेळी साफ न केल्यास ती साचत राहते. यामुळे संसर्गासोबतच ते आपल्या नखांचे सौंदर्यही बिघडू शकते.
३. पायांची स्वच्छता राखणे :- पावसाळ्यात बाहेरून येताना ओले शूज आणि चप्पल घालून घरात प्रवेश करू नका. तर शूज, चप्पल, मोजे काढून घराबाहेर ठेवा पाय साबणाने चांगले स्वच्छ धुवा. जर आपले पाय दिवसभर पाण्यात असतील, तर कोमट पाण्यात मीठ घालून काही वेळ पाय पाण्यात बुडवून ठेवा. यानंतर, पाय पुसून चांगले कोरडे करा. पारदर्शक किंवा कुठल्याही रंगाचे नेलपॉलिश नखांच्या कडेला लावल्यास त्यात माती साचून ती पाय दुखत नाहीत. पावसाळ्यात पेडिक्युअर करणेही फायदेशीर ठरते. त्वचा व्यवस्थित स्वच्छ केल्याने फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका टळतो.
४. पायाच्या त्वचेचे स्क्रबिंग आवश्यक आहे :- पाय स्वच्छ, सुंदर आणि मऊ ठेवण्यासाठी आठवड्यातून एक किंवा दोनदा स्क्रबिंग करणे आवश्यक आहे. स्क्रबिंगसाठी, खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये थोडी साखर मिसळा आणि पायाचा वरचा भाग आणि तळवे स्क्रब करा. यामुळे त्वचेच्या मृत पेशी निघून जातात आणि त्वचा मुलायम होते. याचबरोबर पावसाच्या पाण्यामुळे जर पायाची त्वचा खराब झाली असेल तर ती पुन्हा नव्यासारखी करण्यासाठी स्क्रबिंग करणे फायदेशीर ठरते.
५. पाय स्वच्छ करून मगच झोपा :- पावसाळ्यात नेहमी पाय स्वच्छ करूनच मग झोपायला जा. याच्या मदतीने आपण संसर्गाची शक्यता कमी करू शकता. पाय स्वच्छ केल्यानंतर खोबरेल तेल किंवा मॉइश्चरायझर लावून मसाज करा आणि मोजे घाला.
६. मिठाच्या पाण्यात पाय धुवा :- पावसाळ्यात पाय दिवसभर पावसाच्या पाण्यात भिजत असतात. यामुळे बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका वाढतो. हे संसर्ग टाळण्यासाठी पाय मिठाच्या पाण्याने धुवा. यासाठी एका टबमध्ये गरम पाणी घ्या, त्यात दोन चमचे मीठ टाका. सुमारे २० मिनिटे या पाण्यात पाय ठेवा, नंतर साध्या पाण्याने पाय धुवा. असे केल्याने पावसात संसर्गाचा धोका टाळता येतो.