अमरावती : जिल्ह्यात हरभऱ्याचे पिक हे काही ठिकाणी वाढीच्या अवस्थेत तर काही ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे. काही ठिकाणी घाटे अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने घाटेअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने पुढीलप्रमाणे एकात्मिक व्यवस्थापन सूचविले आहे.
जिल्ह्यात हरभऱ्याचे पिक हे काही ठिकाणी वाढीच्या अवस्थेत तर काही ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे. काही गावांमध्ये या पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीवर दिसुन येत आहे. सद्या वातावरणात बदल झालेला असल्यामुळे घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. घाटेअळी हिरवट रंगाची असुन हरभरा पिकावर सहज दिसुन येत नाही. त्यामुळे हरभरा पिकाचे बारकाईने निरिक्षण करुन घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येताच व्यवस्थापनाचे उपाय योजावे लागतात.
या किडीची मादी पतंग पानावर, कोवळया शेंडयावर, कळ्यांवर व फुलावर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात व त्यातुन 2 ते 3 दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरीतद्रव्य खरडुन खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढरकी होऊन वाळतात व गळून पडतात. थोडया मोठया झालेल्या अळ्या संपुर्ण पाने व कोवळी देठे खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांदयाच शिल्लक राहतात. पुढे पिक फुलोऱ्यावर आल्यावर या अळीचा प्रादुर्भाव वाढतो व अळया प्रामुख्याने फुले व घाट्यांचे नुकसान करतात. मोठया झालेल्या अळया घाटयाला छिद्र करुन आतील दाणे खाऊन घाटे पोखरतात, एक अळी साधारणत: 30 ते 40 घाट्यांचे नुकसान करते.
एकात्मिक व्यवस्थापन : ज्या हरभऱ्याच्या शेतामध्ये मका किंवा ज्वारी नैसर्गीक पक्षी थांबे म्हणुन उपयोग केला नसेल त्या शेतामध्ये प्रति एकरी आठ पक्षी थांबे तयार करुन शेतात लावावे. याकरीता अतिशय स्वस्त पध्दत म्हणजे एक उभी काठी रोवून त्यावर एक आडवी काठी बांधावी. त्यामुळे पक्षांना यावर बसता येते व अळ्या वेचण्याचे काम सोपे होते. अवाजवी किटकनाशकाची फवारणी केल्यास पक्षी किटकनाशकांच्या वासामुळे शेतामध्ये येणार नाहीत. त्यामुळे किटकनाशकांचा जास्त वापर टाळावा. तसेच कामगंध सापळयांचा वापर करावा. यासाठी घाटेअळीचे कामगंध सापळे एकरी दोन प्रमाणे लावावेत, सापळयामध्ये सतत 3 दिवस आठ ते दहा पतंग आढळताच किटकनाशक फवारणी करावी.
हरभरा पिक पन्नास टक्के फुलोरावर आल्यानंतर पहिली फवारणी निंबोळी अर्क 5 टक्के किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के ई.सी. 20 मिली याप्रमाणे फवारावे. या फवारणीनंतर 15 दिवसांनी ईममेक्टिन बेंझोएट 5 टक्के एस.जी. 3 ग्रॅम किंवा इथिओन 50 टक्के ई.सी. 25 मिली किंवा फ्लुबेंडामाईड 20 टक्के डब्ल्यु.जी. 5 मिली किंवा क्लोरेनट्रॅनिपोल 18.5 टक्के एस.सी. 2.5 मिली यापैकी कोणतेही एका किटकनाशकाची फवारणी करावी.
तरी सर्व शेतकरी बंधुनी हरभरा पिकाचे बारकाईने निरिक्षण करुन उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे.