लट्ठपणा विविध व्याधींना निमंत्रण देतो. आयुर्वेदात स्थूलपणावर काही उपाय सांगण्यात आले आहेत. संतुलत आहार आणि व्यायाम यांची योग्य सांगड घातली तर आयुर्वेदिक उपायांनी बरेच लाभ होऊ शकतात. शरीरात आमामुळे स्थूलपणा वाढतो. चुकीची जीवनशैली, प्रदूषण आणि अन्नपचन योग्य पद्धतीने न झाल्यामुळे शरीरात आम या विषारी घटकाची निर्मिती होते. आमामुळे शरीराच्या विविध कार्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे स्थूलपणा कमी करण्यासाठी आमाचं निर्मूलन करण्यावर आयुर्वेदाचा भर असतो. शरीरात आम असताना वजन कमी करणं जवळपास अशक्य होऊन बसतं, असं तज्ज्ञ सांगतात. म्हणूनच आहारावर नियंत्रण आणूनही अनेकांचं वजन कमी होत नाही. त्यामुळे आमाचं प्रमाण कमी केल्यानंतरच वजन कमी करण्याची प्रक्रिया सुरू करायला हवी.
काही आयुर्वेदिक औषधी आमावर प्रभावी ठरतात. त्यात हळद, त्रिकातू, दारूहळद (बार्बेरी), त्रिपबला आणि गुग्गुळ यांचा समावेश करावा लागेल. स्थूल लोकांनी हलका आहार घेण्याचा सल्ला आयुर्वेदिक तज्ज्ञ देतात. पचनतंत्र सुधारण्यासाठी गुग्गुळासारख्या औषधाचा वापर करता येईल. दिवसातून तीन वेळा एक छोटा चमचा गुग्गुळ घेता येईल. आलं आणि मध घातल्याने गुग्गुळ आमावर अधिक प्रभावी ठरेल.आम कमी करण्यासाठी फायबरयुक्त आहार घ्यावा. तसंच फार प्रक्रिया केलेलं अन्न खाऊ नये.