आपल्या पोटात जठर, यकृत, प्लहा, स्वादुपिंड, लहान आतडे, मोठे आतडे, मुत्रपिंड वगैर अवयव आहेत. लहान आतड्याची लांबी २२ फूट आहे. निसर्गाने एवढय़ाशा जागेत एवढे अवयव आणि २२ फूटाचे आतडे कसे बसवले असेल?
अन्नाचा घास येतो तेव्हा आतड्याचा व्यास वाढतो आणि घास पुढे गेला की ते पुन्हा अकुंचन पावते. म्हणजे अन्न पुढे पुढे सरकणे व न पचलेले अन्न शरीराबाहेर पडणे यासाठी आतड्याचे आकुंचन व पसरण होणे आवश्यक आहे. म्हणजे पोट एकदा दाबले जाणे व ताणले जाणे आवशक आहे. नुसत्या चालण्याने ते होत नाही. पण सूर्यनमस्कारात ते होते.
सूर्यनमस्कारात प्रथम खाली वाकतो, तेव्हा पोट दाबले जाते. नंतर डावा पाय दुमडतो व उजवा पाय मागे नेतो, तेव्हा पोटाचा डावा भाग दाबला जातो व उजवा भाग ताणला जातो. नंतर ओणवे होतो तेव्हा पोट सरळ होते. नंतर या स्थितीत धडाचा भाग वर करून आकाशाकडे पाहतो, तेव्हा पोट ताणले जाते. नंतर उठताना उजवा पाय पुढे घेतो तेव्हा पोटाचा उजवा भाग दाबला जातो व डावा भाग ताणला जातो नंतर वाकलेल्या स्थितीत येतो तेव्हा पोट दाबले जाते. नंतर सरळ होतो तेव्हा पोट सरळ होते. या क्रमाने पोट दाबले व ताणले जाते. पोटातील अवयव व्यवस्थित काम करू लागतात. अन्न नीट पचते, शौचास साफ होते, याचा प्रोस्टेट ग्लँडला व स्रियांना गर्भाशय व ओव्हरीला फायदा होतो.